….म्हणून ती झाली ८ अनाथ लेकरांची ‘माय’…!!!

 

आपल्या जिवलग माणसांच्या ख्याली-खुशालीसाठी आपण काय काय नाही करत..? कुणीतरी खूप जवळचं माणूस संकटात सापडलं तर त्याला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी काहीही करण्याची, आपलं सर्वस्व अर्पण करण्याची देखील आपली तयारी असते. काहीही होवो, फक्त आपली प्राणप्रिय व्यक्ती सुखरूप राहो, हीच भावना त्यामागे असते. रशियातही अशीच एक घटना घडलीये. आपला मुलगा गंभीर अपघातातून बरा व्हावा, यासाठी एका महिलेनं देवाला साकडं घातलं आणि  त्यातून तो सुखरूप वाचल्यानंतर आपल्या नवसाला पावलेल्या देवाला दिलेल्या शब्दाखातर ती आता ८ अनाथ लेकरांची माय झालीये. विशेष म्हणजे ही सगळी मुलं केवळ अनाथच नाहीत, तर ते दिव्यांग देखील आहेत. त्यांच्यावर खास उपचाराची गरज आहे. या सगळ्यांच्या उपचाराची जबाबदारी देखील या महिलेनं घेतली आहे.

घटना आहे दक्षिण रशियातील डॅगेस्तान प्रदेशातील. ‘मदिनात शक्बुलटोव्हा’ नावाची महिला आपल्या मुलासह डॅगेस्तान प्रदेशातील एका गावात राहतेय. तीचा एक मुलगा आहे, रमजान त्याचं नांव. रमजान एका कायद्याशी संबंधित कामे करणाऱ्या स्थानिक संस्थेत काम करतो. प्रत्येक आईला आपला मुलगा जसा प्राणप्रिय असतो, तसाच रमजान देखील मदिनात यांच्यासाठी प्राणप्रिय. एके दिवशी रमजानचा अतिशय गंभीर अपघात होतो. अपघात इतका गंभीर असतो की त्यातून रमजान वाचण्याची शक्यता जवळजवळ नसते. रमजानला वाचविण्यासाठी  डॉक्टर आपले संपूर्ण प्रयत्न करत असतात.

Madinat Shakhbulatova
मदिनात शक्बुलटोव्हा

डॉक्टरी ‘दवा’ तर सुरुच असतात पण मदिनात यांनी देवाकडे आपल्यावर कृपा करण्यासाठी ‘दुआ’ देखील मागितलेली असते. आपला मुलगा जर या अपघातातून सुखरूप वाचला, तो बरा झाला तर आपण अनाथांची ‘नाथ’ होऊ असा शब्द मादिनात यांनी देवाला दिलेला असतो. खूप साऱ्या डॉक्टरी प्रयत्नांना यश येते, आणि रमजान जीवघेण्या अपघातातून सुखरूप वाचतो. आता वेळ असते मदिनात यांनी देवाला दिलेला शब्द पाळण्याची. यात त्या बिलकुल माघार घेत नाहीत, तर दिलेल्या शब्दाला जागत ८ अनाथ लेकरांना दत्तक घेतात. अनाथांची ‘माय’ होऊन त्यांचा आधार होण्याचा आपला शब्द पाळतात.

“मी अल्लाहकडे साकडं घातलं की जर माझा मुलगा बरा झाला तर मी अनाथ मुलांना दत्तक घेईल” मादिनात सांगतात. दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याविषयीची  माहिती देताना मादिनात म्हणतात की, “आधी आम्ही ३ मुलं दत्तक घेतली. त्यांना घरात कसं वाटतंय ते बघितलं. त्यानंतर ३ महिन्यांनी आम्ही परत ३ मुलं दत्तक घेतली. काही दिवसांनी अजून एक मुलगी आणि छोटं मुल दत्तक घेतलं”

गेल्या दीड वर्षांपासून ही मुलं मादिनात यांच्या बरोबर राहताहेत. आपल्या नवीन आयुष्यात ते खुप आनंदी आहेत, असं मादिनात सांगतात. काही लोकं त्यांना अनाथालयात परत जाण्याविषयी विचारतात. पण त्यावर नकारघंटा वाजवत ही मुलं आपल्या ‘आई’ जवळच राहायचा हट्ट धरतात. मादिनात यांचा मुलगा रमजान हा देखील आईच्या निर्णयाने आनंदी आहे. “आईने आपला शब्द पाळून खूप मोठा निर्णय घेतलाय, मी तीच्या या निर्णयात तीच्यासोबत आहे” असं रमजान सांगतो.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.