राजकारणात महिलांच नाणं खणखणीत वाजवलं ते या चौघींनी.

शूरवीर महिलांची महाराष्ट्राला परंपरा आहे. शिवरायांच्या मनात स्वराज्याच स्फुल्लिंग जागृत करणाऱ्या जिजाऊपासून ते होळकरांच राज्यशकट हाकणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाईपर्यंत. औरंगजेबाच्या नाकी नाऊ आणणाऱ्या कोल्हापूरच्या ताराराणी सरकार यांच्या पासून आपल्या मुलाला पाठीशी बांधून इंग्रजांशी लढणाऱ्या रणझुंझार झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंपर्यंत इतिहासातल्या अनेक महिलांनी राज्यकारभार चालवला, राज्य घडवलं.

इथेच भारतातली पहिली मुलींची शाळा सुरु झाली. इथेच सावित्रीबाईनी महिलाशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. देशभरात पहिलं महिला धोरण महाराष्ट्रात लागू झालं. महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं पुरोगामी राज्य म्हणून ओळखल जात. 

इतकं असूनही दुर्दैव म्हणजे अजूनही राज्याला एकही महिला मुख्यमंत्री मिळालेला नाही. 

स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणात अनेक महिला नेत्या होऊन गेल्या ज्यांनी आपली छाप पाडली. सत्तरच्या दशकात तर अनेक महिला राजकारणी महाराष्ट्रात कार्यरत होत्या. सर्वात जास्त महिला आमदार याच काळात होऊन गेले. केंद्रात सुद्धा इंदिरा गांधींच्या रुपात एक महिला देशाच नेतृत्व करत होती. महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री होण्यासाठी सर्वात जास्त सुवर्णसंधी याच काळात होती. पण वेगवेगळ्या कारणाने ते घडल नाही.

१. प्रेमलाकाकी चव्हाण. 

कराडच्या प्रेमलाकाकी चव्हाण. याच गावाने राज्याला यशवंतरावांच्या रूपाने पहिला मुख्यमंत्री दिला. प्रेमलाकाकीचे यजमान दाजीकाका चव्हाण हे शेकापकडून पहिल्यांदा खासदार झाले. पण नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते स्वतः चार वेळा कराडमधून खासदार होते. नेहरूंपासून ते लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी अशा प्रत्येक पंतप्रधानांच्या मंत्रीमंडळात ते होते. १९७३ साली त्यांचा मृत्यू झाला.

दाजीकाकांच्या पश्चात इंदिरा गांधीनी त्यांच्या सुविद्य पत्नींना म्हणजेच प्रेमलाकाकीना कराडच तिकीट दिल. त्या तिथून बिनविरोध निवडून आल्या. पुढे आणीबाणीनंतरही प्रेमला काकी निवडून आल्या होत्या. १९८० साली मात्र कॉंग्रेसच्या विभाजनानंतर यशवंतरावांचे उमेदवार यशवंतराव मोहिते तिथून खासदार झाले.

प्रेमलाकाकींच दिल्लीत चांगले वजन होते. इंदिरा गांधी यांच्या खास वर्तुळात त्यांना स्थान होते.

म्हणूनच जेव्हा आणीबाणी नंतर महाराष्ट्रात मोठी उलथपालथ झाली, काँग्रेस फुटली, पवारांनी पुलोदचे सरकार स्थापन केलं तरी प्रेमलाकाकींनी काँग्रेस सोडली नाही.

त्यांच्या निष्ठेचे फळ म्हणून त्यांना महाराष्ट्र काँग्रेसच अध्यक्ष पद मिळालं. पहिल्यांदाच एक महिला प्रदेशाध्यक्षपदी आली होती. याकाळात त्यांनी मोडकळीस आलेली संघटना मजबूत केली. गावोगावच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसशी जोडले.

जेव्हा इंदिरा गांधीच पुनरागमन झालं तेव्हा शरद पवारांचं सरकार बरखास्त करण्यात आलं. तेव्हा झालेल्या निवडणुका प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रेमलाकाकींच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. पवारांच्या पक्षाचा पराभव करत काँग्रेसनं बहुमत प्राप्त केलं. त्यावेळी प्रेमला काकी चव्हाण याचं नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत होतं. पण इंदिरा गांधीनी त्यांना प्रतीक्षा करण्यास सांगितलं.

पण तो योग आला नाही.

त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या. नंतर परत दोनवेळा लोकसभेवर निवडून गेल्या. महाराष्ट्रातून सर्वाधिक काळ खासदारपदी राहिलेल्या महिला असा विक्रमही त्यांच्या नावे राहिला. पण सर्वोच्चपद त्यांना मिळाले नाही. पुढे हा अधुरा राहिलेला योग त्यांचा मुलगा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यामुळे पूर्ण झाला.

२. प्रतिभा ताई पाटील. 

जेव्हा शरद पवारांचं पुलोद सरकार पडल तेव्हा प्रेमला काकींच्या बरोबर आणखी एका महिला नेत्याच नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आघाडीवर होतं. ते म्हणजे प्रतिभा पाटील.

वयाच्या अवघ्या २७ वर्षी त्या जळगावमधून आमदार बनल्या. त्यानंतर सलग ४ वेळा एदलाबाद येथून विजय मिळवला. त्यांना वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात शिक्षण राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. साधारण याच काळात पवारांच्या पासून सुशीलकुमार शिंदेपर्यंत अनेक तरुण नेते राजकारणात येत होते.

पण काहीच वर्षात पवारांनी वसंतदादांच्या सरकारमधील आमदार फोडत स्वतःचा पुलोद प्रयोग करत मुख्यमंत्री बनले. त्यावेळी सगळेच विरोधी पक्ष त्यांच्या सरकारात सामील झाले होते. राज्यातला सर्वात मोठा विरोधी पक्ष होता इंदिरा काँग्रेस आणि विरोधी पक्ष नेते पद होतं उच्चशिक्षित व अभ्यासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतिभा पाटील यांच्याकडे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता महिला असाव्यात हा दुर्मिळ योगायोग होता.

पुढे जेव्हा पवारांचं सरकार पडल तेव्हा प्रदेशाध्यक्ष प्रेमलाकाकी चव्हाण दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांची यादी घेऊन गेल्या त्यात तीन नावे होती,

जूने जाणते वसंतदादा, श्रेष्ठींच्या मर्जीतले अंतुले आणि तरुण तडफदार प्रतिभा पाटील.

यापैकी प्रतिभाताई या खरे तर वसंतदादांच्याच गटातल्या. या दोघांनी समजूतदार भूमिका घेतली होती आपल्या पैकी एकालाही मुख्यमंत्रीपद मिळाले तरी दुसर्याला पाठिंबा द्यायचा. इंदिराजींनी अंतुले याचं आमदारकीच तिकीटच रद्द केल्यामुळे त्यांचा चान्स गेल्यात जमा होतं.

वसंतदादाचं वय पाहता यावेळी प्रतिभा ताई पाटील यांनाच संधी मिळणार अशीच चर्चा सगळीकडे सुरु होती.

इंदिरा गांधींच्या मनात हेच होते मात्र ऐनवेळी संजय गांधी यांनी हट्ट धरला की मुसलमान मुख्यमंत्री करायचा आणि मग म्हणून अंतुलेंची आमदार नसतानाही निवड झाली. इकडे दादा आणि प्रतिभा ताई दिल्लीमध्ये मोर्चाबांधणी करत होते तेव्हा अंतुलेंनी मुंबईत बाकीच्या आमदारांचा पाठिंबा मिळवला देखील.

प्रतिभाताईंची संधी हुकली. पुढे त्या बराच काळ महाराष्ट्राच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष होत्या पण मुख्यमंत्रीपदाने कायमची हुलकावणी दिली होती. काही वर्षांनी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनण्याचा मान मात्र त्यांना मिळाला.

३.मृणाल गोरे. 

सत्तरच्या दशकात महाराष्ट्रात गाजणारा आवाज म्हणजे मृणाल गोरे. राष्ट्र सेवादलातून त्यांची समाजकारणाशी ओळख झाली. मुंबईमध्ये गोरेगावचे पाणी आंदोलन करून त्यांनी राजकारणात उडी घेतली.

थेट इंदिरा गांधींशी भिडणाऱ्या नेत्या म्हणून त्यांना ओळखल जायचं.

इंदिराजींच्या लोकप्रियतेच्या शिखरावर असण्याच्या काळात त्यांना महागाईवरून घेरण्यात मृणाल गोरे सर्वात आघाडीवर होत्या. मृणाल गोरेनी केलेल्या लाटणे आंदोलनावरून त्यांची ओळख लाटणेवाली बाई अशी झाली होती. त्यांना पाडण्यासाठी खुद्द इंदिराजींनी मुंबईत सभा घेतली पण मृणाल गोरे तरीही निवडून आल्या होत्या.

पुढे आणीबाणीवेळी देखील हुकुमशाही व दडपशाही बद्दल राज्यभर त्यांनी प्रचाराच रान उठवलं. इंदिरा गांधींच्या पराभवानंतर राज्यातही काँग्रेसची छकले झाली. १९७८च्या निवडणुकीत तीन तीन काँग्रेस लढत होत्या. कोणालाच स्पष्ट बहुमत नव्हते. एसएम जोशींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या जनतापक्षाने सर्वात जास्त म्हणजे ९९ जागा जिंकून आल्या होत्या पण बहुमतासाठी अपक्षांची साथ हवी होती.

ऋषितुल्य एसएम जोशीना सत्तेची आस नव्हती. ते जर मुख्यमंत्रीपदी बसण्यासाठी आक्रमकपणे तयार नसतील तर त्यांच्या ऐवजी मृणाल ताईंच नाव पुढे करण्यात आलं होत.

महाराष्ट्रात पहिल्यांदा महिला मुख्यमंत्री होतील अशी शक्यता निर्माण झाली होती. पण शरद पवारांनी चाणक्यनीती वापरून दोन्ही काँग्रेसमध्ये दिलजमाई घडवून आणली व वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले. पुढे काही दिवसांनी त्यांच सरकार पवारानीच पाडलं. जनता पक्ष, कम्युनिस्ट पार्टी, जनसंघ यांची पुलोदची मोट बांधली. तेव्हाही जर पवारांचं नेतृत्व इतरांना मान्य नसेल तर मृणाल ताईनां मुख्यमंत्री करा अशी मागणी पुढे आली. पण अखेर पवारच मुख्यमंत्री बनले.

४.शालिनीताई पाटील. 

पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार उद्योगावर जबरदस्त पकड असणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्या त्या द्वितीय पत्नी. दोघांचे लग्न होण्यापूर्वीच त्या राजकारणात आल्या होत्या. खर तर राजकारणात असल्यामुळेच त्यांची दादांशी ओळख झाली होती. त्यांच्या पतींच निधन झालं होत. उच्चशिक्षित, हुशार, राजकारणातील खाचाखोचा समजणाऱ्या, प्रशासनात मदत करणाऱ्या शालिनीताईशी दादांनी लग्न केले.

दादांच्या पत्नी म्हणून सगळ्यांना त्यांची ओळख झाली पण वसंतदादांच्या सावलीशिवाय शालिनीताई यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्व होतं. एकदा तर यशवंतराव चव्हाणांच्या विरुद्ध साताऱ्यामधून शालिनीताईनी निवडणूक लढवली होती.

अंतुलेचं मुख्यमंत्री होणं वसंतदादांच्या समर्थकांना न आवडलेली गोष्ट होती. पण शालिनीताई त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होत्या. पण अखेर अंतुलेना राजीनामा द्यावा लागला याला कारणीभूत शालिनीताई पाटीलच ठरल्या. कोल्हापूरमध्ये एका मुलाखतीमध्ये त्यांनी थेट अंतुलेच्यावर थेट टीका केली की,

“सुलतान अंतुले शेतकर्यांचे पैसे परत द्या.”

मुख्यमंत्री अंतुले हे सहकारी कारखाने वगैरेंची कामे करून द्यायची असतील तर त्यांना आपल्या ट्रस्टला देणगी द्यायची जबरदस्ती करतात असा आरोप यामागे होता. यातून बराच वाद झाला अखेर काही दिवसांनी अंतुले पाय उतार झाले. त्यानंतरही दादांना संधी देण्याऐवजी इंदिरा गांधीनी अननुभवी बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. पण त्यांचीही थोड्याच काळात गच्छन्ती झाली.

आता संघटनेवर पकड असणाऱ्या वसंतदादा पाटील यांना संधी देण्यावाचून दिल्लीतल्या श्रेष्ठींना पर्याय नव्हता. मात्र शालिनीताई पाटील यांची महत्वाकांक्षा तो पर्यंत वाढली होती.

त्यांनी माध्यमांमध्ये बातमी पेरली की दादा आजारी असल्यामुळे त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री करावे. महिला आरक्षणाच वादळ निर्माण करून शालिनीताई राज्यभर पोहचल्याच होत्या. आता त्या थेट दादांना आपला स्पर्धक समजू लागल्या होत्या.

पण तसे घडले नाही. वसंतदादा मुख्यमंत्री झाले. दादांच्या गटात ही शालिनीताईनां मानणारा वेगळा गट होता. पुढे अनेक वर्ष मुख्यमंत्रीपदाची नावे चर्चली जायची त्यात शालिनीताईंच नाव आघाडीवर असायचं. पण वेगवेगळ्या कारणांनी ते मागे पडत गेल.

खुद्द वसंतदादाशी त्यांचे वाद झाले. त्यांचा गट वेगळा पडला. मराठा आरक्षणाचा मुद्दा पहिल्यांदा चर्चेत आणणाऱ्या शालिनीताई पाटील क्षमता असूनही कधी मुख्यमंत्री बनू शकल्या नाहीत.

या चौघी सोडून अजुन काँग्रेसच्या दीर्घकाळ प्रदेशाध्यक्षपदी राहिलेल्या प्रभा राव यांचं सुद्धा नाव बऱ्याचदा मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत असायचं. पण राज्यातल्या आमदारांचा पाठिंबा नसल्यामुळे दिल्लीतल्या श्रेष्ठींची मर्जी असूनही त्यांना संधी मिळाली नाही.

सध्याच राजकारण बघितल तर भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे या दोघी महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत आहेत. पण या दोघीनाही त्यांच्याच पक्षातून मोठे मातब्बर विरोधक आहेत. यामुळे या निवडणुकीनंतर तरी एखादी महिला मुख्यमंत्रीपदी बसतील का हा प्रश्नच आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.