अभिमान वाटला पाहिजे, गेल्या ५ वर्षात महिला पोलिसांची संख्या दुप्पट झालीये..

पोलीस म्हंटल कि, प्रत्येकालाचं घाम फुटतो. त्यातल्यात्यात महिला पोलीस म्हंटल कि काय विचारायलाचं नको. पण आपण काही वर्ष मागे गेलो तर पोलीस खात्यात पुरुषांचं वर्चस्व असायचं, म्हणजे आधी पोलीस ऐकला कि खाकी वर्दीतले, टाईट कॉलरचे आणि धिप्पाड असे पुरुष आठवायचे. पण जमाना हळू- हळू बदलत गेला आणि आज ट्रॅफिक पोलीस ते आयपीएस ऑफिसर पर्यंत  महिलांनी सुद्धा बाजी मारलीये.

लांब कशाला काही दिवसांपूर्वीच यूपीएससी आणि एमपीएससीचा निकाल लागला, यातही पुरुषांच्या बरोबरीने महिला अधिकाऱ्यांनी वर्णी लावलीये. तसं पाहिलं तर गेल्या काही वर्षांत पोलिसांमध्ये महिलांचा सहभाग सातत्याने वाढतोय. म्हणजे गेल्या चार-पाच वर्षांचा आकडा पहिला तर  देशभरात महिला पोलिसांची संख्या जवळपास दुप्पट झालीये.

ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटने नुकताच पोलीस विभागाच्या आकडेवारीचा डेटा जाहीर केला. त्या आकडेवारी नुसार  २०१४ मध्ये देशातल्या सिव्हिल, डिस्ट्रिक्ट आर्म्ड रिझर्व,  स्पेशल आर्म्ड, आयआरबीची एकूण संख्या १,१०,८७२ होती, जी २०१९ मध्ये वाढून २,१५,५०४ झाली आहे.

बीपीआरडीच्या मते, २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये देशात पोलिसांमध्ये महिलांचा वाटा १६.५ टक्क्यांनी वाढला आहे. तर एकूण आकडेवारीच्या हा एकूण १०.३ टक्के आहे.

राज्यनिहाय आकडेवारीत बिहार पोलिसांमध्ये महिलांचा सर्वाधिक वाटा आहे, जो २५.३ टक्के आहे. बिहार पोलिसांमध्ये नागरी पोलीस, जिल्हा सशस्त्र राखीव, विशेष सशस्त्र पोलीस आणि भारत राखीव बटालियन यांचा समावेश आहे.

बिहारपाठोपाठ हिमाचल प्रदेशचा नंबर लागतो, जिथे महिला पोलीसांचा वाटा १९.१५ टक्के आहे. त्यानंतर चंदीगड १८.७८ टक्क्यांनी तिसऱ्या आणि तामिळनाडू १८.५ टक्क्यांनी चौथ्या नंबरवर आहे.

तर जम्मू -काश्मीर पोलिसांमध्ये महिलांचा वाटा सर्वात कमी म्हणजेच ३.३१ टक्के आहे. त्यानंतर तेलंगणा ५.११ टक्के आहे.

दरम्यान, महत्त्वाचे आहे की ही आकडेवारी १ जानेवारी २०२० च्या अंदाजावर आधारित आहे. अहवालानुसार, एनआयएमध्ये ३७ महिला आहेत, जी त्याच्या एकूण  संख्येच्या ४.६४ टक्के आहे. त्याचबरोबर केंद्रीय अन्वेषण ब्युरोमध्ये (सीबीआय) ४७५ महिला आहेत, ज्या एकूण संख्येच्या ७.९६ टक्के आहे.

तर, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात महिलांचा वाटा फक्त २.९ टक्के आहे. ९.९ लाख केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये महिलांची एकूण संख्या २९,२४९ आहे, त्यापैकी CISF मध्ये ८,६३१ महिला, CRPF मध्ये ७,८६० आणि BSF मध्ये ५,१३० महिला आहेत.

राष्ट्रीय स्तरावर वाहतूक पोलिसांमध्ये महिलांची संख्या ५,९७९ इतकी आहे, तर गुप्तचर बाबींशी संबंधित विशेष शाखेत ३,६३२ आणि दहशतवादाशी संबंधित आणि तर गंभीर प्रकरणांमध्ये ५१६ महिला तैनात आहेत.

आता या आकडेवारीवरून एवढं तरी स्पष्ट होतयं की, जुने रितीरिवाज, बंधने मोडीत काढतं, आज महिला पुरूषांच्या बरोबरीने पोलीस विभागात काम करत आहेत.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.