पोटच्या पोरीला आईनं २५ वर्ष कोंडून ठेवलं, जेव्हा ती जगासमोर आली तेव्हा बोलणं देखील विसरलेली

१९०१ चं साल होतं. पोलीस स्टेशनमध्ये एक चिठ्ठी आली. पोलिसांनी चिठ्ठीवर नाव बघितलं मात्र त्यावर तसं काहीच नव्हतं. अनामिक चिट्ठी ती. म्हणून पोलिसांनी अजूनच सावधपणे ती उघडली. चिठ्ठीमध्ये एका घराचा पत्ता लिहिला होता आणि सोबत असा मजकूर होता जो वाचून पोलीस एकमेकांकडे बघू लागले. क्षणात पोलिसांच्या एका गटाने गाड्या काढल्या आणि चिठ्ठीत लिहिलेलं ठिकाण गाठलं.

ठिकाण एक घर होतं. पोलिस घरात शिरले आणि त्यांनी घराचा तपास सुरु केला. तिथे कोचांड्यात त्यांना एक खोली दिसली. जसं जसं पोलिसांनी त्या खोलीकडे आपली पाऊलं उचलली, तसं तसं त्यांना त्या खोलीकडे जाणं असह्य होऊ लागलं. एक प्रचंड उग्र आणि घाण वास त्या खोलीकडून येत होता. पोलिसांमध्ये अजूनच अघटिताची शंका बळावू लागली.

अखेर पोलीस तिथे गेले आणि त्यांनी ती खोली उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा इतका जाम झाला होता की त्याला धक्के मारून खोलावं लागलं. जसा दरवाजा उघडला तसे सगळे जण खोलीपासून जवळपास ५ मीटर दूर पळत गेले, कारण दरवाजा उघडताच तो वास इतक्या आक्रमकपणे बाहेर आला की काही सेकंदांसाठी सगळ्यांना श्वासंच घेता आला नाही.

लवकरच परिस्थिती सावरत पोलिस खोलीत काय आहे हे बघण्याचा प्रयत्न करू लागले. जेव्हा त्यांना खोलीतील दृश्य दिसलं ते बघून तिथे उपस्थित सर्वजण सुन्न पडले… 

खोलीत जिकडेतिकडे मानवी विष्ठा, मांसाचे तुकडे, भाज्या, मासे आणि सडलेल्या भाकरीचे तुकडे पडलेले होते. संपूर्ण खोली उंदीर आणि कीटकांचा अड्डा बनली होती. खोलीत प्रकाश येण्यासाठी किंवा वास जाण्यासाठी साधी जागा देखील नव्हती आणि अशा सगळ्या घाणीत एक मानवी शरीर तिथे पडलेलं होतं. त्याच्या अंगावर घाणेरडी आणि पूर्ण फाटलेली चादर होती. 

ती एक नग्नावस्थेत निपचित पडलेली मुलगी होती. जिवंत होती. पण जिवंत असून मेल्यासारखी होती, कारण तिच्या अंगात त्राणचं नव्हते. 

मुलीचं नाव – मैडेमोसेले ब्लैंच मोनियर, घटनेचं ठिकाण – फ्रांस

१८७६ साली एक २५ वर्षांची ब्लैंच अचानक गायब झाली. गेल्या २५ वर्षांपासून ती कोणालाच दिसली नव्हती आणि जेव्हा जगासमोर आली तेव्हा तिची अवस्था पाहून सगळेच हादरले होते. याचं कारण म्हणजे ब्लैंचला तिच्या स्वत:च्या घरातील एका खोलीत २५ वर्ष डांबुन ठेवण्यात आलं होतं.

सगळ्यात भयानक तथ्य म्हणजे तिच्यासोबत हे काम खुद्द तिच्या आई आणि भावाने केलं होतं. का? कारण ब्लैंचला एका मुलावर प्रेम झालं होतं आणि तिच्या घरच्यांना हे मान्य नव्हतं.

त्याहूनही भयानक गोष्ट म्हणजे त्यांच्या शेजाऱ्यांना याची जाणीव होती. ब्लैंच मदतीसाठी खोलीतून ओरडायची पण तिच्या किंकाळ्यांकडे शेजाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, तिची मदत केली नाही. त्याचं कारण म्हणजे ब्लैंचच्या घरच्यांनी शेजाऱ्यांना सांगितलं होतं की, ती वेडी झाली आहे. आणि त्याकाळी मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या लोकांना खोलीत कैद करून ठेवणं सामान्य होतं. 

ब्लैंचच्या आईने तिला अशा खोलीत कैद केलं होतं जिथे प्रकाशही येत नव्हता. त्याच खोलीत तिला अन्न आणि पाणी देण्यात होतं. तेही दरवाजा न उघडता एका छोट्याच्या फटीतून. ब्लैंच कधी आंघोळही करत नव्हती. ना तिला कपडे देण्यात आले होते ना तिची खोली कधी साफ केली गेली. लघवी आणि शौच ती त्याच खोलीत तिच्या अंथरुणात करायची. 

१९०१ मध्ये जेव्हा पोलिसांनी तिला रेस्क्यू केलं तेव्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार… त्या खोलीत श्वास घेणंही कठीण होतं. अशा परिस्थितीत तात्काळ खिडकी तोडण्यात आली. ब्लैंचला रुग्णालयात नेण्यासाठी कपडे घातले गेले. ती २५ वर्षांपासून प्रकाशाच्या संपर्कात नव्हती, त्यामुळे तिला पूर्णपणे झाकण्यात आलं. 

असं म्हणतात की, इतक्या वर्षांत ती बोलायला देखील विसरली होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर मोठ्या मुश्किलीने ती छोटी छोटी वाक्यं बोलायला शिकली.

मात्र ब्लैंचची अशी अवस्था करणाऱ्या तिच्या भावाला आणि आईला हवी तशी शिक्षा झालीच नाही!

जेव्हा ब्लैंच सापडली तेव्हा तिच्या आईला आणि भावाला अटक करण्यात आली मात्र तोपर्यंत त्याची आई खूप म्हातारी झाली होती आणि अटकेनंतर १५ दिवसांतच तिचा मृत्यू झाला. 

भावाबद्दल सांगायचं तर त्याने कोर्टात असं सांगितलं होतं की, त्यांच्या घरात आईचंच चालायचं. म्हणून आईने कधी मदत करू दिली नाही. मात्र तरी मी माझ्या परीने ब्लैंचला जमेल तेवढी मदत करायचो. त्याच्या या स्पष्टीकरणानंतर त्याला केवळ १५ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. 

१९०१ मध्ये ब्लैंचची सुटका करण्यात आली होती. मात्र त्यानंतर ती फक्त १२ वर्ष जगू शकली. १९१३ मध्ये तिचा मृत्यू झाला!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.