तिनं सिनेमाचं तिकीट ब्लॅक करून घर बांधलं, मला व्हाईट हाऊस पेक्षा भारी वाटलं

सिनेमाच्या बाबतीत मला स्वताबद्दल एक पक्का समज आहे. मी अमुक अमुक सिनेमे न बघता वेगळ्या प्रकारचे बघितले असते तर वेगळा झालो असतो का? तर हो.

आणि हीच गोष्ट आपल्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांबद्दल सुद्धा म्हणता येईल. हे फक्त आई, बहिण, मैत्रीण, बायको किंवा आजूबाजूला बघत असलेल्या प्रसिद्ध-अप्रसिद्ध स्त्रियांबद्दल मर्यादित नाहीये. 

मी चाकणला जॉब साठी असताना एक बाई पाहिली आहे. पारंपरिक फुटपट्ट्या लावून बघायचं ठरवल्यास अगदी कुरूप आणि त्याहून जास्त भेसूर. भसाड्या आवाजाची. शे सव्वाशे किलीचो देहयष्टी. चेहऱ्यावर असंख्य खड्डे, अनिल कपूरच्या मिशीपेक्षा जाड भुवया, गालापासून मानेपर्यंत पसरलेला काळा पट्टा. कुणीतरी ऑइलपेंट फेकून ॲबस्ट्रॅक्ट डिझाइन तयार केल्यासारखा. आणि त्या काळ्या पट्टयावर उगवलेले अस्वलासारखे केस.

तिचा बॅकग्राऊंड, संघर्ष किंवा जो काही आधीचा माजोरडेपणा असेल तो मला अजिबात माहिती नाही.

पण पदरात पडलेल्या ह्या नकोश्या देणगीच्या जोरावर ही बाई संपुर्ण खराबवाडी-चाकणच्या इंडस्ट्रीमधून दादागिरी करून भंगार गोळा करायची. अर्थात पैसे देऊन माल उचलायची. पण कुणीही बाहेर भंगार विकू शकणार नाही, आणि तसा प्रयत्न केला तर वन मॅन शो नडायची तिची धमक आख्ख्या परिसरात फेमस.

अतिशयोक्ती वाटेल पण त्या ओसाड माळरानावर जेव्हा ती बाई उन्हातान्हात एकटी फिरायची तेव्हा मला स्वतःचं आयुष्य एकदम झाट मे झिंगा वाटायचं. नाशिकपासून जास्त लांब राहण्याची सवय नसल्याने तिथे काम करणं अवघड होतं. पण जे एक वर्ष तिथे धीर धरत काढलं ते फक्त त्या बाईच्या हिमतीकडे बघून! माझ्याकडे हिचा फोटो नाहीये. आत छापली गेलीये कायमची. 

नाशिक ला रात्री-अपरात्री एका टपरीखालून विडी-सिगारेट विकणारी एक मुलगी आहे. बरीच वर्ष झाली तिचं हे काम चालुये. ज्या लोकांना माल रात्री कुठे मिळतो ते जातात आणि फक्त टपरीच्या खालच्या कोपच्यातून बाहेर येणाऱ्या हातात पैसे ठेवतात. पैसे आत घेऊन तो हात परत बाहेर येतो फक्त सिगारेट घेऊन. पायाळू बाळ जन्माला येताना आधी पाय कसा बाहेर येतो ते अजून मी पाहिलेलं नाहीये. पण हिचा हात पाहिलाय. तो याहून वेगळा नसावा.

आणि हो, सांगायचं राहिलं. ती मुलगी अपंग आहे. हिचा फोटो ठरवलं तर काढता येऊ शकतो. पण नकोय मला. तो हात जास्त जीवघेणा आहे. ऑन दि टॉप असलेल्या गर्लफ्रेंडने केसातून चायनीज स्टिक काढावी आणि सहजपणे आपल्या गळ्यात बाजूने आत सरकवत रक्ताचा कारंजा काढावा इतका जीवघेणा. तरी हवाहवासा.

बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट. 

नाशिकला MIDC त एका कंपनीत नवीनच कामाला लागलेलो. तिथला एक प्रेस मशीन वर काम करणारा ऑपरेटर, ऑपरेटर कसला? हेल्परच. कॉन्ट्रॅक्ट वर काम करायचा. उंची साडेचार फूट. बरच वय असून सुद्धा दिसायला लहान मुलासारखा. पगार 200 रुपये रोज. प्रत्येकजण त्याच्याशी हेटाळणी करून त्याच्याशी बोलायचा, कुत्सितपणे वागायचा. त्याची अत्यंत कमी उंची, भिकाऱ्यासारखं वाटणारं राहणीमान हे कारण तर होतच, पण आपली हीच लायकी आहे आणि सगळे जे वागताय ते बरोबर आहे अशी त्याने मनाची समजूत घातली होती.

त्याचा केविलवाणा चेहरा बघितला की हा एवढं भयाण हसण्यापेक्षा रडत का नाही असं कायम वाटायचं. माझ्या लग्नाच्या सुट्ट्या संपवून मी परत कामावर जॉईन झालो तेव्हा त्या बारक्या ला बघून अवाक झालेलो. भरपूर तेल लावून केस विंचरलेले. कंपनीत जे सेफटी शूज घालतात त्याला खालून अडीच इंचाचं रबरी सोल लावलेलं. कंपनीत जे वापरतात ते एप्रोन याच्या अंगावर पहिल्यांदा धुतलेलं बघितलं. बहुतेक माझ्या शर्ट इतकच स्वच्छ.

माहिती काढल्यावर समजलं. – याच्या घरासमोर एक कचरा वेचायला एक मुलगी यायची. यांच्यात काय झालं आणि कुठल्या कारणाने एकत्र आले माहीत नाही. दोघांनी लग्न पण केलं. माझ्या लग्नात मी 2000 लोकांना जेवण खाऊ घालत होतो अगदी त्याच दिवशी. बायकोने याला पुरता बदलून टाकला. जात धर्म कधी बदलला माहीत नाही, दर रविवारी मास साठी चर्च मध्ये जायला लागला. पार्ट चेक करायला तो ऑपरेटर माझ्याकडे यायचा तेव्हा इतका सुंदर दिसायचा की आमच्यात हेल्पर कोण आणि इंजिनिअर कोण हे कळू नये. मी दरवेळी त्याच्या बायकोसमोर मनोमन हात जोडायचो. मी कंपनी सोडली तोपर्यंत त्याची बायको कचरावेचक होती! मी तिला आजवर प्रत्यक्ष पाहिलेलं नाही. फोटोचा प्रश्नच नाही.

महिला दिनाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे इंदिरा गांधी पासून ते सिंधुताई सपकाळ पर्यंत असंख्य फोटोज, स्टोरीज सोशल मिडीयावर फिरत आहे. अर्थात हि चांगलीच गोष्ट आहे. मला ज्या स्त्रियांबद्दल बोलायचं आहे तिचा मात्र माझ्याकडे एकही फोटो नाही, कुठल्याही सरकार दरबारी, वर्तमान पत्रात  किंवा सिनेमागृहाच्या डोक्युमेंटेशन मध्ये नोंद नाही.

आणि असावी तरी कशासाठी?

थेटरच्या बाहेर तिकीट ब्लैक करणारी बाई प्रेरणादायी थोडीच असेल. थेटरच्या वाऱ्या केलेले नाशिकचे जुने जाणते लोकं तिला ‘मामी’ म्हणून ओळखतात.

विजयांनाद-दामोदर च्या बाहेर ती अनेक वर्ष तिकीट ब्लॅक करायची. किती वर्ष याचा काही हिशोब नाही. माझी आई जुन्या नाशकातल्या कथड्यावरची. लहान असल्यापासून ती ‘मामी’ ला थेटर बाहेर तिकीट ब्लॅक करताना बघत आलीये. 2000 सालानंतर एकट्याने पिक्चर ला जाऊन बसण्याच्या बाबतीत मी सुसाट झालो होतो. मामी ला मी जवळून बघत आलोय ते तेव्हापासून.

बरोबरचे बाकी मुलं म्हणायचे की मामी हिजडा आहे. कारण मामीचं ब्लाउज लो कट असायचं आणि त्यात जी छाती दिसायची ती अगदीच कमी आणि टणक असल्यासारखी. तिकीट ब्लॅक करून जे बक्कळ पैसे कमावलेले असल्याचे ते दोन्ही बाजूला ब्लाउज मध्ये कोंबलेले. तरीही फक्त पैसे वर फुगलेले. आणि छाती तशीच. स्थिर. टणक. तोंडात तंबाकू किंवा मावा. दिसायला राकट. दहा बोटांच्या 8 गॅप मध्ये नोटा उभी घडी करून कोंबलेल्या. 5-10-20-50-100-500 च्या वेगवेगळ्या स्लॉट मध्ये. पोलीस स्टेशन मध्ये तिचा हप्ता जायचा हे आई ने सांगितलेलं. त्यामुळे सगळे जण तिच्याशी टरकून असायचे.

आम्हा मुलांकडे कमी पैसे असायचे. कभी खुशी कभी गम पाहायला गेलो तेव्हाची गोष्ट.

दामोदर. हाऊसफुल्ल थेटर. पुढच्या 3 दिवसांचं तिकीट मिळत नव्हतं. मला तर त्याच दिवशी पाहायचा होता. 30 चं तिकीट ती 80 रुपयाला द्यायला तयार नव्हती. 100 म्हणजे 100! त्या दिवशी काही 7-8 जण नेव्ही वाले असतात तशा युनिफॉर्म मध्ये आलेले. व्हाइट. आर्मी की NCC मला कळत नव्हतं. सगळ्यांनी केसांचा मिलिटरी कट केलेला. तिकीट त्यांनाही मिळालं नाही. मामी ने आमच्यासमोर त्या ग्रुप ला 150 रुपयाला एक ह्या वाढवा दराने तिकीट विकलं. तेव्हा सिंगल स्क्रीन ला सहपरिवार फिल्म बघायला येणारा मोठा वर्ग असायचा. मुलींचे घोळके सुद्धा. मामीने आम्हाला तिकीट दिलं नाही तरी आशाळभूतपणे आम्ही तिथेच थांबलेलो. तिला कुणीच गिऱ्हाईक भेटणार नाही अन आम्हाला ह्या भावात तिकीट देईल या आशेवर.

थेटरमध्ये तिकीट फाडून एन्ट्री करताना मुलींच्या त्या घोळक्यातील एका मुलीवर ह्या व्हाइट युनिफॉर्म वाल्याने मागून हात लावला. थोडी गडबड आरडाओरड झाली आणि मी दरवाज्यापर्यंत पोचलो तेव्हा बघितलेलं. ती मुलगी मोठयाने आवाज करून रडत होती. तिची समजूत घालण्याचा तिच्या मैत्रिणींने बराच प्रयत्न केला असावा. पण ते आत न जाता बाहेरच पायऱ्यांवर बसले. युनिफॉर्म आणि त्यात 7-8 जणांचा ग्रूप पाहून सगळेच टरकेलेले. हाऊसफुल थेटरबाहेर रांगेत उभे राहिलेले सगळे.

जवळचे तिकीट विकले जाईस्तोवर गर्दी अन तिथल्या गोंधळाची पर्वा न करता मामीने आपला गेट अन धंदा काय सोडला नाही. गर्दी पांगल्याननंतर बाहेर थांबलेल्या मुलींजवळ निवांत जाऊन मामीने झालेल्या प्रकाराबाबत विचारलं. त्या मुलीचा हात धरून ती मामी सिनेमागृहात गेली. पिक्चर सुरू झालेला. ज्या घाणेरड्या शिव्या देऊन तिने आत बोलायला सुरुवात केली त्या बाहेरपर्यंत आम्हाला ऐकू येत होत्या.

एकेक रांग करत तिने त्या मुलीला घेऊन संपूर्ण थेटर पिंजून काढलं आणि त्या युनिफॉर्म मध्ये असलेल्या धडधाकट तरुणाला गचांडी धरत बाहेर ओढलं. त्याच्यासोबतचा एकही जण मध्ये पडला नाही. मुलीला सांगितलं की तू फटके मार याला. रडवेल्या पोरीचा हात काही उठेना. मामीने त्याच्या कपाळावर बांगड्या फोडत व्हाइट युनिफॉर्म लाल करून टाकलेला. तोंडातून एक शब्द न काढता तो ग्रुप पिक्चर सोडून गेलेला. दिलेले तिकीट मामीने परत हिसकावून घेतले.

हात साफ करणाऱ्या मामीकडे आम्ही परत गरीब तोंड घेऊन गेलो की, ‘आता तरी द्या तिकीट. याहून जास्त पैसे खरच नाहीये. पुढच्या वेळी नक्की आणून देऊ.’ तसं मामीने ‘घ्या गांडीत घालून, राहूदे पैसे’ म्हणत जवळ असलेले 7-8 तिकीट आमच्यावर फेकले. अजूनही 56 इंच छाती वैगरे वलग्ना कुठे ऐकल्या की मला मामीची ती टणक छाती अन एकहाती पांढऱ्याचा लाल केलेला युनिफॉर्म आठवतो.

एखादी गोष्ट मला चुकीची वाटली तर स्थळ-काळ विसरून मी तिथे नडायला बघतो. माझ्यात आलेल्या ह्या हिमतीमागे सनी देओल चा जेवढा वाटा आहे त्याहून मोठा त्या बांगड्या फोडलेल्या हातांचा हात आहे!

सिंगलस्क्रीन ने जीव सोडला तसं हाऊसफुल्ल शो आणि तिकीट ब्लॅक चे धंदे बंद झाले आहेत. मी मामी ला शेवटचं तिकीट ब्लॅक करताना बघितलंय ते ‘शिवाजीराजे भोसले बोलतोय’ च्या वेळी. बऱ्याच वर्षात तिला बघितलेलं नाही. आई कडून मागे कळलंय की तिकीट ब्लॅक करून कमावलेल्या पैशाने मामी ने सिडकोत स्वतःची घर घेतलय. म्हटलं तर पत्र्याची खोली. म्हटलं तर अँटीलिया ला लाजवणारा महाल.

मी ज्या क्लास मधून आलोय त्या लुंपेन क्लास चे स्वतःचे वेगळे प्रोब्लेम्स अन स्वतःचे वेगळे हिरो असतात. मला किरण बेदी प्रेरणा न देता तिकीट ब्लॅक करणारी बाई देत असेल तर तो माझ्या बॅकग्राऊंड चा प्रॉब्लेम. स्वतःचा व्यवसाय सुरू करत संसार सांभाळत नेटाने उभं राहणाऱ्या माझ्याही क्लास मध्ये आहे याचं मला कौतुक वाटतं. प्रसंगी आपल्या कुरूप-भेसूर चेहऱ्याचं भांडवल करत का असेना भिडत असलेल्या बायांबद्दल मला अतीव आदर आहे.

रात्री खोपट्यातून बाहेर येणारा हात मला जास्त हिम्मत देतो. अन कचरावेचक चं काम कर करताना भरकटलेल्या माणसाला ताळ्यावर आणणारी बाई जास्त वंदनीय वाटते. ज्या प्रभात थेटरच्या बाहेर पॉर्न फिल्म सुटल्यावर बाहेर उभ्या असलेल्या वेश्यांना आतली पब्लिक बाहेर घेऊन जायची, त्याच एरियात एक बाई तिकीट ब्लॅक करते काय अन त्या पैशावर स्वतःच घर घेते काय! सगळ्यांना कडक सॅल्युट ठोकावा एवढं आभाळासारखं कर्तृत्व.

महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे फोटो फिरवायला माझ्याकडे नाही याचं आता वाईट वाटत नाही. एक दिवस, एक मेसेज याहून फार मोठं देणं लागतो मी त्यांचं.

Leave A Reply

Your email address will not be published.