सरदारजींचा वूडलँड ब्रँड एवढा चालला की लोकं अमेरिकेच्या एका भारी ब्रँडलाच कॉपी म्हणायला लागले

भारतीयांना ब्रॅण्ड्सची भलतीच हौस. परदेशी कंपन्या मग नुसत्या नावावर भारतात येऊन हवा करतायत. इंडियन्सच्या या ब्रँड प्रेमाचा सगळ्यात जास्त फायदा उठवतात फर्स्ट कॉपीवाले. ब्रॅण्डच्या नावात हलकासा बदल करून हे डुप्लिकेटवाले लोकांना सपशेल गंडवतात.  PUMA चं POMA, REEBOK चं REBOOK करून विकलेल्या डुप्लिकेट वस्तूंमुळं आपल्यापैकी बऱ्याच जणांना चुना लागला असेल.

पण  एका भारतीयानं काढलेला ब्रँड असा ही होता की ज्यानं जवळपास सारखंच नाव आणि लोगो असलेल्या अमेरिकी ब्रॅण्डला भारतातून गाशा गुंडाळायला भाग पाडलं होतं.

तर ज्या ब्रँडनं असा पराक्रम करून दाखवलाय त्याचं नाव आहे वुडलँड. 

वूडलँड ब्रॅण्डच्या जन्माची गोष्ट पण इंटरेस्टिंग आहे. तर वूडलँड हा ब्रँड एरो ग्रुपचा. ज्याची स्थापना पंजाबमधून कॅनडामध्ये स्थायीक झालेल्या अवतार सिंग यांनी १९८० च्या दशकात कॅनडातील क्यूबेक येथे केली होती. त्यावेळी एरो ग्रुप कॅनडा आणि रशियासाठी कड्याक्याच्या थंडीत कामाला येतील असे मजबूत बूट बनवत असे.

रशिया हे त्यांचं सगळ्यात मोठं मार्केट होतं. हॅन्डमेड आणि त्यातही टॉपची क्वालिटी देणारी ऐरो अल्पावधीतच रशियात लोकप्रिय झाली होती.

सगळं काही सुरळीत चालू असताना जुन्या रशिया म्हणजेच सोव्हिएत रशियाचा १९९०मध्ये विघटन झालं.

रशियाचं मार्केट रात्रीत पडलं होतं. ऐरो ग्रुपसाठी हा मोठा धक्का होता. आता त्यांना रशियासारख्याच मोठ्या मार्केटची गरज होती.  

त्याचवेळी म्हणजे ९०च्या दशकातच भारतात आर्थिक सुधारणांमुळं बाजरपेठ खुली होत होती. भारतात बिझनेस करणं आता पूर्वीपेक्षा सोप्पं झालं होतं. तसेच भविष्यात भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल असे अंदाज बांधण्यात येत होते. 

अवतारसिंग आणि त्यांचा मुलगा हरकिरातसिंग यांनी ही संधी बरोबर ओळखली आणि रशियाला पर्याय म्हणून भारतीय बाजारात उतरण्याचं ठरवलं.

पण भारतीयांचा ‘अंथरून पाहून पाय पसरण्याचा ‘ स्वभाव. त्यामुळं भारतीयांना खिशाला परवडतील अशा किंमतीत हरकिरातपाजींना त्यांचे बूट भारतात उपलब्ध करून द्यावे लागणार होते. मग क्वालिटी आणि किंमत यांचा सुवर्णमध्य साधत सरदारजी बाप-बेट्यानं भारतात ‘वूडलँड’ हा नवीन ब्रँड लाँच केला. अस्सल चामड्याचा वापर, टिकाऊ आणि मोठा सोल आणि तरीही घालायला आरामदायक असणारे वूडलॅंडचे बूट भारतात लवकरच लोकप्रिय झाले.

विशेषतः ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आणि वूडलँड हे आता कॉम्बिनेशनचं झालयं.

पण अशीच एक बूट कंपनी अमेरिकत जवळपास शंभर वर्षांपासून काम करत होती. 

तिचं नाव होतं टिंबरलँड. या कंपनीचं लोगो ही वूडलँडसारखाच.

 उलट वूडलँडचा लोगो त्यांच्यासारखा आहे असं म्हटलं पाहिजे. भारतीय बाजारात येण्यापूर्वी ही कंपनी जगभरात ब्रँड म्हणून फेमस होतीच. त्यामुळं भारतात  आपण अस्स मार्केट मारू असं टिंबरलँडच्या मॅनेजमेंटला वाटत होतं. मात्र भारतात परिस्तिथी वेगळीच.

 ‘हाजीर तो वजीर’ प्रमाणं वूडलँडनं आधीच मार्केट काबीज केलं होतं. 

टिंबरलँडचे बूट जेव्हा बाजारात आले तेव्हा लोक त्याला वूडलँडची डुप्लिकेट कॉपीच म्हणू लागले . वूडलँड आमच्यासारखाच नाव आणि लोगो वापरतंय म्ह्णून टिंबरलँडन वूडलँडला कोर्टात पण खेचलं. पण त्याचा काय फायदा झाला नाही. करोडो रुपये जाहिरातीवर खर्च करूनही टिंबरलँडला डुप्लिकेटची प्रतिमा बदलता आलीच नाही आणि शेवटी या कंपनीला भारतातून गाशा गुंडाळावा लागला.

हे ही वाच भिडू:

 

  

Leave A Reply

Your email address will not be published.