ज्याची बॉडी बघून सगळ्या पिढीनं जिम लावली, तो भिडू म्हणजे संग्राम चौगुले

हे वर्ष संपायला दोन-तीन दिवस बाकी आहेत. ३१ च्या रात्री कुठे बसायचं हा तुमचा प्लॅन झाला असेल किंवा नसेल पण एक गोष्ट मात्र तुमच्या डोक्यात फिक्स वादळ घालत असणार. ‘एक जानेवारीपासून जिमला जायला पायजे राव.’ दरवर्षी एक जानेवारीपासून जिमला जाणारच, हा संकल्प आपण करतो. फुल्ल फॉर्ममध्ये येऊन जिमची फी, नवे बूट, ट्रॅक पॅन्ट, जिमवाला बनियन अशी भरमसाठ खरेदी करतो.

घरी डायटबद्दल तोंड वर करुन सांगतो, पहिले दोन दिवस इमानइतबारे जिमला जातो आणि अंग दुखायला लागल्यावर जिमला जी कल्टी बसते, ती थेट वर्षभरासाठी. आता जी लोकं हा संकल्प फॉलो करतात.. त्यांना आमच्याकडून प्रोटीनचे डब्बे भरुन शुभेच्छा.

दरवर्षी डिसेंबर संपत आला, की आपल्या डोक्यात जिमचं खूळ शिरतं. सध्या फिटनेस इंड्रस्टी हा काय छोटा विषय राहिलेला नाही आणि फिट राहणं लय गरजेचं आहे. आज प्रत्येक चौकात आपल्याला एक तरी बिल्डर पोरगं दिसतंच. ज्याला आपण लांबून दिसला तरी हाक मारतो… ‘काय बिल्डर.’

या बिल्डर लोकांसाठी ट्रेंड सेटर कोण? तर संग्राम चौगुले.

कुस्तीच्या मैदानात जर कोल्हापूरचा तगडा पैलवान भिडत असेल, तर त्याच्या एंट्रीला हमखास आरोळी येते.. कोल्हापूरचा ढाण्या वाघ. संग्रामला पाहिलं की ढाण्या वाघ कसा दिसत असेल हे लगेच आपल्या डोळ्यांसमोर येतं.

एखादं लहानं बाळ निवांत झोपू शकेल असली रुंद छाती, पोरांच्या मांड्या असतात तेवढाले दंड आणि सनी देओलला काय घेऊन बसलात असला तगडा बायसेप. अंगावर चरबी ही फक्त नावाला आणि पोटावरच्या बिस्किटांना सिक्स पॅक ॲब्स म्हणतात हे शिकवणारा कार्यकर्ता म्हणजे संग्राम चौगुले.

अंगावरची एक शीर दिसणारी त्याची बॉडी आणि दरारा बघून कित्येकांच्या डोक्यात बॉडीबिल्डर होण्याचं खूळ शिरलं. संग्राम मूळचा कोल्हापूरचा. आई-वडील शिक्षक त्यामुळे घरात कडक शिस्तीचं वातावरण. मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या संग्रामनं प्राथमिक शिक्षण गावातल्या शाळेतून पूर्ण केलं. पुढं त्यावेळच्या ट्रेंडनुसार इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा केला आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी तो पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमध्ये आला.

कोल्हापूरच्या मातीतली पोरं शरीर घोटवून घेण्यात कमी पडत नसतात. संग्रामनं बॉडी बिल्डींगची आवड, जपली मात्र पुण्यात. त्याचं तगडं शरीर पाहून त्याला बॉडी बिल्डिंगमध्येच करिअर करण्याचा सल्ला मिळू लागला. त्यानं महाराष्ट्र इंटर कॉलेज स्पर्धेत भाग घेतला आणि मराठा श्री किताबावर आपलं नाव कोरलं. या विजयामुळं मिळालेल्या आत्मविश्वासानं त्याच्यासाठी पुढचा मार्ग क्लिअर केला. पुढं द ग्रेट मराठा श्री, पुणे श्री आणि सगळ्यात प्रतिष्ठेची महाराष्ट्र श्री अशा अनेक स्पर्धांमध्ये एकच नाव गाजत होतं… संग्राम चौगुले.

जसजसं कॅलेंडर बदलत गेलं, तसतशी संग्रामची बॉडी आणखी वाढीव झाली आणि करिअर तर विचारुच नका. २०१० मध्ये संग्रामच्या नावामागं एक लय भारी पदवी लागली, ती म्हणजे मिस्टर इंडिया. आपल्या मराठी पोरानं देश जिंकला, सगळ्या महाराष्ट्रात काय देशात त्याच्या नावाची चर्चा होत होती, आता वेळ होती जग जिंकायची.

बहारीनमध्ये झालेल्या ‘एशियन बॉडी बिल्डर्स चॅम्पियनशिप’मध्ये संग्रामला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. पण अपयशानं तो खचला नाही, त्यानं सलग तीनवेळा मिस्टर इंडिया स्पर्धा जिंकली, २०१२ मध्ये त्यानं स्वतःचं आणि सगळ्या देशाचं स्वप्न पूर्ण केलं. संग्राम चौगुले मिस्टर वर्ल्ड झाला आणि मिस्टर युनिव्हर्सही.

आतापर्यंत त्याच्या नावामागं ६ मिस्टर इंडिया टायटल आहेत, १ मिस्टर युनिव्हर्स आणि १ मिस्टर वर्ल्ड आहे, पाचवेळा तो महाराष्ट्र श्री देखील ठरलाय, पण त्याची सगळ्यात मोठी कामगिरी काय तर, त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या कित्येक घरांमध्ये बिल्डर घडले. 

जिममध्ये घाम गाळून भविष्याचं काय होणार, असे प्रश्न विचारणाऱ्या आगाऊ लोकांना उत्तर द्यायला एकच नाव पुरेसंय… फक्त कोल्हापूरचा नाही महाराष्ट्राचा ढाण्या वाघ… संग्राम चौगुले.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.