अपघातात पाय गमावणारी मानसी जोशी आज बॅडमिंटनमध्ये वर्ल्ड चॅम्पियन झालेय..

नुकतच पीव्ही सिंधूने बॅडमिंटन मधील वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत इतिहास रचला. संपूर्ण देश तिच्या यशाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला होता. पण याच्या आदल्याच दिवशी आणखी एका बॅडमिंटन पटूने जग जिंकल होतं, तीच नाव मानसी जोशी.

बासेल येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये फायनल मध्ये भारताच्याच पारुल परमारचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरले. यापूर्वी तीनवेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या पारुलवर मानसीने 21-12, 21-7 च्या फरकाने विजय मिळवला. हे मानसीच पहिलं विश्वविजेतेपद आहे.

पण या विजयासाठीचा तिचा प्रवास खूप खडतर होता.

साल होत २०११. मुंबईची एक सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करणारी मानसी जोशी सकाळी लवकर आपल्या स्कुटीवरून ऑफिसला निघाली होती. गर्दीचा रस्ता, नेहमी प्रमाणे सिग्नल काम करत नव्हते. इतक्यात अचानक एक वेगवान ट्रक कोणालाही काही कळायच्या आत येऊन मानसीच्या गाडीला धडकला. चालू नसलेल्या त्या सिग्नलवर एकही पोलीस नव्हता.

ट्रक तिच्या डाव्या पायाचा चेंदामेंदा करून गेला. मानसी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. ऑफिसच्या गडबडीत जाणारे तिला पाहून पुढे जात होते पण कोणी थांबायला तयार नव्हत. मानसी बेशुद्ध झाली नव्हती. तिला सगळ दिसत होत. काही जण तिच्या शेजारी गोळा झाले पण कोणाला तिला मदत कशी करावी हेच कळत नव्हत. 

अॅम्ब्युलन्सला कोणीतरी फोन केला होता. पण तिची येण्याची काही चिन्ह दिसत नव्हती. शेवटी मानसीने स्वतःचं घरी फोन करून जे काही घडलय ते सांगितलं. घाबरलेले तिच्या घरचे तिला शोधण्यासाठी निघाले.

एक अतिशहाणा मानसीचा हेल्मेट तिच्या डोळ्या देखत घेऊन गेला तर आणखी एक जण तिच्या या अवस्थेचं मोबाईलवर शुटींग करत होता. मानसी फक्त ओरडत होती,

“भैया कोई तो मुझे हॉस्पिटल ले चलो.”

तिथे तिला फक्त वाईटच अनुभव आले असं नाही. एक मुलगी मानसीचा अॅक्सिडेंट बघून चालत्या बस मधून उतरली. तिने तिथून जाणाऱ्या प्रत्येक कारला, गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला पण कोणीही थांबले नाही. मानसीचं रक्त बघून आपली गाडी खराब होईल याचीच सगळ्यांना जास्त काळजी होती.

अजूनही अॅम्ब्युलन्स आली नव्हती. रोड वर पडून पडून मानसीच्या पाठीवर ताण येत होता. एक मोटारसायकल वाला तरुण थांबला. त्याने रोडवर पडलेल्या मानसीला आधार देऊन बसवलं आणि तिच्या पाठीशी अर्धा तास उभा राहिला. त्या पुढे तिला बसवेना. त्यावेळी एका झोपडपट्टीतल्या आजोबांनी एका स्वच्छ लुंगीवर तिला झोपवले.

अखेर तिला एका जवळपासच्या हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं. तिथे तिच्यावर उपचार करतील असे डॉक्टर नव्हते. तिथून मानसीला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं. तेव्हा सुद्धा अॅम्ब्युलन्स नसल्यामुळे आणखी वेळ गेला. शेवटी एक छोटी मारुती व्हॅन आली. जवळपास पावणे सहा फुट उंच असलेली मानसी त्या छोट्या गाडीत बसू शकत नव्हती. तरीही पाठीमागचे दरवाजे उघडून कसेबसे तिला पुढच्या हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले.

सकाळी साडे आठ वाजता अॅक्सिडेंट झालेल्या मानसीवर ऑपरेशनला सुरवात झाली होती तेव्हा संध्याकाळचे साडे सहा वाजले होते. योग्य उपचाराला झालेल्या अक्षम्य वेळेमुळे मानसीला आपला पाय गमवावा लागला आणि हे सगळ घडलं होत भारतातल्या सर्वात प्रगत शहरात, मुंबईमध्ये.

मानसीचे वडील एक निवृत्त सरकारी कर्मचारी होते. मानसी लहान असताना पणापासून त्यांची इच्छा होती की मानसीने बॅडमिंटन खेळावे. शाळा कॉलेज स्तरावर ती  चांगलं बॅडमिंटन खेळायची. पण तिला कधी आपण यातच करीयर करावं अशी महत्वाकांक्षा नव्हती. 

ती अभ्यासात हुशार होती. सोमय्या कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पूर्ण केलं आणि एका नावाजलेल्या सॉफ्टवेअर कंपनीत जॉबला लागली. तिथे छंद म्हणून इंटर कंपनी बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेत भाग घेऊ लागली. तिथे गोल्ड मेडल मिळवलं.

अगदी पुस्तकात लिहिल्याप्रमाण सगळ एकदम व्यवस्थित चालल होत.पण अचानक हा अपघात झाला आणि वयाच्या बाविसाव्या वर्षी तिच्या आयुष्याला एक मोठ वळण आणलं.

पुढे काय हा प्रश्न मानसीला सतावत होता. किती वेळा रडली असेल, आयुष्य संपवण्याची इच्छा मनात येऊन गेली असेल माहित नाही. या काळात तिच्या घरच्यांनी तिला आधार दिला. तिच्या उपचाराचा खर्च मोठा होता. पण मानसीच्या मध्यमवर्गीय वडिलांनी तिला आपल्या पायावर उभा करण्यासाठी खस्ता खाल्ल्या.  तिच्या कंपनीने तिच्या उपचारासाठी पैसे उभा केले, तिला कृत्रिम पाय बसवण्यात आला. मानसी हळूहळू चालू लागली. परत नोकरीला सुद्धा जाऊ लागली.

याच दरम्यान मानसी पूर्वी ज्या इंटरकंपनी बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेत भाग घ्यायची त्या स्पर्धेच्या वेळापत्रकाची नोटीस लागलेलं तिन पाहिलं.या वर्षी सुद्धा आपण भाग घ्यायचा तिने निश्चय केला.कधी नव्हे ते जिद्दीने ती तयारीला लागली. दोन तीन महिने केलेल्या सरावानंतर एक कृत्रिम पाय असलेली मानसीने त्याच स्पर्धेत परत सुवर्ण पदक मिळवलं. हे तिला स्वतःसाठी सुद्धा आश्चर्यकारक होते.

एका मुलाखतीमध्ये ती म्हणते,

“त्या दिवशी मी आनदाने वेडी व्हायची बाकी होते.त्या विजयाने मला माझा हरवलेला आत्मविश्वास मिळवून दिला आणि  अनेक संधीच आकाश उघडून दिल. “

त्यानंतर पुढे दोन वर्षे तिने बॅडमिंटनचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग घेतले. अपंगांसाठी असलेल्या स्पर्धेत २०१४ पासून भाग घेणे सुरु केले. राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवल्यावर तिला अंतराष्ट्रीय लेव्हल सुद्धा संधी मिळाली. सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू अशा जबरदस्त बॅडमिंटनपटूना घडवणारे महान बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली तिने सराव केला.

२०१५ साली जागतिक बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेत मानसीने रौप्यपदक मिळवले. त्यानंतर अनेक स्पर्धा तिने गाजवल्या, अनेक मेडल मिळवले.  एवढच नाही तर वर्ल्ड चॅम्पियनदेखील झाली. काही दिवसांपूर्वी या दिव्यांग खेळाडूच्या अविश्वसनीय प्रवासाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने एकलव्य पुरस्कार देऊन तिचा सन्मान केला होता. 

पण ती एवढ्यावर खुश नाही. देशाला पॅराओलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देणे हे तिचं स्वप्न आहे.

आज ती एकोणतीस वर्षाची आहे. पण आजही ती रोज नोकरी सांभाळून चिकाटीने पॅराओलिंपिक स्पर्धेची तयारी करते आहे. आपल्या जिद्द आणि पॅशनच्या जोरावर देशाच नाव गाजवणार आणि करोडो भारतवासीयांना प्रेरणा देत राहणार यात शंका नाही.

 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.