मराठीमधलं पहिलं छापील पुस्तक कोणतं होतं आणि कुठं छापलेलं माहीत आहे ?

भगवद्गीता म्हणजे जीवनाचं सार सांगणारा ग्रंथ. हा ग्रंथ पूर्वी देवनागरीत नव्हता पण सांगलीतल्या मिरजेमध्ये पहिल्यांदा देवनागरी भाषेत हा ग्रंथ मुद्रित करण्यात आला. तर जाणून घेऊया या मुद्रणकलेचा इतिहास आणि मिरजेतल्या देवनागरीमध्ये छापलेल्या भगवद्गीतेचा. 

महाराष्ट्रातला सांगली जिल्हा हा कलावंतांची भूमी म्हणून ओळखला जातो. पण याच सांगलीत मुद्रणकलेचा सुद्धा इतिहास आहे. सांगली जिल्ह्यातील मुद्रणकलेला २१० वर्षांचा इतिहास आहे. १८२१ साली सांगलीत चिंतामणराव पटवर्धनांच्या प्रयत्नांनी छापखाना सुरू करण्यात आला. यात धर्मग्रंथ तसेच वैद्यकीय ग्रंथ इ. छापण्यात आले होते. १८८१, १८८३ व १८९५ साली अनुक्रमे तासगाव, इस्लामपूर व तासगाव येथे अनेक वर्तमानपत्रे व मासिके छापणे सुरू झाले. १८८० सालापासून सांगली जिल्ह्यात मुद्रणकला अधिक विकसित झाली.

पूर्वीच्या काळात ही गीता हस्तलिखीत स्वरूपात होती. नंतर मुद्रणकलेचा शोध लागल्यानंतर ती अनेक भाषेत मुद्रित झाली. पूर्वी रोमन लिपीत असणारी ही गीता १८०५ मध्ये देवनागरी भाषेत मुद्रित झाली. पहिली देवनागरी भाषेतील मुद्रित गीतेची प्रत मिरजेत असून त्याला तब्बल २१५ वर्षे झाली आहेत. 

या भगवद्‌गीतेच्या शेवटच्या पानावर मुद्रणाच्या स्थळ काळाचा उल्लेख केला आहे. देशातील पहिले देवनागरी मुद्रण १८०५ मध्ये मिरज येथे झाले. या पहिल्या मुद्रणाने जिल्ह्यात मुद्रणकलेची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर जिल्ह्यात विविध भागात मुद्रणालये स्थापित झाली. भारतीय मुद्रण कलेचा अमूल्य ठेवा असणाऱ्या या ग्रंथाच्या अभ्यासासाठी महाराष्ट्रासह जर्मनी, जापान, फ्रान्स, अमेरिका या भागातून अभ्यासक भेट देतात. मिरज इतिहास संशोधन मंडळाकडे असलेली ही दुर्मिळ प्रत यापुढेही वर्षानुवर्षे जपण्याची गरज आहे.

ही गीता १६६ पानांची असून शेवटच्या पानावर मुद्रणाच्या स्थळ काळाचा उल्लेख केला आहे. मिरजेचा उल्लेख मार्कंडेय मुनीक्षेत्रे  असा केला असून शके १७२७ क्रोधननाम संवत्सरे असा कालोल्लेख आहे. शके १७२७ म्हणजे इसवी सन १८०५ होते. दोनशे वर्षापेक्षा अधिक काळ हा अमूल्य ठेवा मिरजेत जपून ठेवला आहे.

संशोधक मानसिंग कुमठेकर हे म्हणतात की, मिरज संशोधन मंडळाकडे असलेली गीतेची ही भारतातील देवनागरी लिपीतील पहिली प्रत आहे. हा राष्ट्रीय ठेवा आहे. जगभरातील अनेक संशोधक ही प्रत पाहण्यासाठी येतात. यापुढेही अभ्यासकांना ती उपयोगी पडणार आहे. 

इसवीसन १८०५ मध्ये बंगालमध्ये श्रीरामपूर येथे विल्यम कॅरे याने देवनागरी लिपीमध्ये ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज प्रसिद्ध केले होते. याच वर्षी पुणे येथे सवाई माधवरावांच्या दरबारात असलेला इंग्रज वकील चार्लस् मॅलेट याने येथील एका तांबट कारागिराला तांब्याच्या पत्र्यावर मुद्रण करण्यास शिकविले. त्याच्याकडून त्याचवर्षी देवनागरी लिपीतून छपाईस प्रारंभ होणार होता.

हे समजल्यावर या कारागिराला मिरजेचे तत्कालीन संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन उर्फ पहिले बाळासाहेब यांनी मिरजेत बोलावून घेतले. त्याच्याकडून देवनागरीतील पहिला मुद्रित ग्रंथ म्हणून भगवद्गीतेची छपाई करवून घेतली. एकप्रकारे १८०५ मध्येच छपाई झालेला हा ग्रंथही देवनागरीतील पहिला मुद्रित ग्रंथ ठरला. 

मिरजमध्ये १८०५ मध्ये  श्रावण महिन्यामध्ये ब्राह्मण भिक्षुकांना दान देण्यासाठी १०० प्रती छापल्या होत्या. त्यातील ९९ प्रती नष्ट झाल्या आहेत. ( त्या प्रती कुठे आहेत त्याची कल्पना कुणालाच नाही ). त्या १०० प्रतींपैकी शेवटची भगवद्‌गीतेची प्रत सध्या मिरज इतिहास संशोधन मंडळाकडे आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.