भारतच नाही तर चीन, जपान, थायलंडमध्ये प्राचीन काळापासून गणपती पुजला जातो…
गणेशोत्सव हा केवळ महाराष्ट्रापुरता आणि भारतापुरताच मर्यादित कधीच नव्हता. जगभर मोठ्या उत्साहात गणपतीचं आगमन होतं आणि मोठ्या धडाक्यात हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात जस वेगवेगळ्या गावांचे अष्टविनायक, पुण्य मुंबईतल्या महाकाय मुर्त्या, देखावे असतात तसंच जगात इतर देशात गणपतीबद्दल लोकांच्या काय भावना असतात आणि जगात कुठंकुठं गणपती आहे याबद्दल आपण जाणून घेऊया.
दक्षिण आशिया, पूर्व आशिया या भागांमध्ये गणपती जाण्याचं कारण म्हणजे भारतात दुसऱ्या देशांशी असलेला व्यापार. या व्यापाऱ्यांमुळे गणपती उत्सव जगभर पोहचला तेही मोठ्या थाटामाटात. श्रद्धेच्या भावनेने लोकं गणपतीची मूर्ती आपल्यासोबत बाळगायचे आणि यामुळे इतर लोकांमध्येसुद्धा गणपती बाप्पाबद्दल कुतूहल आणि श्रद्धा तयार झाली.
अफगानिस्तान, ईरान, म्यानमार, श्रीलंका, नेपाल, थायलँड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, मंगोलिया, जापान, इंडोनेशिया, ब्रुनेई, बल्गेरिया, मेक्सिको अशा अनेक देशांमध्ये गणपतीच्या मुर्त्या आढळून आल्या आहेत. या सगळ्या देशांमध्ये गणपतीची पूजा आणि गणपतीची नावं वेगवेगळ्या पद्धतीने घेतली जातात. जपानमध्ये कांगितेन, थायलँडमध्ये फिकानेत आणि श्रीलंकेमध्ये पिल्लयार म्हणून गणपतीला नावाने पुजलं जातं.
तिबेटियन बौद्ध धर्म
भारतीय बौद्ध भिक्षुकांनी ११ व्या शतकात तिबेटियन बौद्ध धर्मात गणपतीला परिचित केलं. यांनाच तिबेटमध्ये गणपती पंथाची सुरवात करण्याचे प्रणेते मानलं जातं. गयाधरा हे काश्मीरमधून आलेले होते आणि तिबेटमध्ये गणेश पंथाची सुरवात त्यांनी केल्याचं सांगितलं जातं. तिबेटमध्ये गणपती हे वाईट शक्तींना पळवून लावणारा आणि सुखाचं प्रतीक मानला जाणारा देव आहे.
नेपाळमध्ये गणपती मंदिराची स्थापना केली ती सम्राट अशोकच्या मुलीने केली होती. नेपाळमधील लोक गणपतीला श्रद्धेचं आणि संकटमोचनाचं प्रतीक मानतात. अडचणींपासून दूर राहण्यासाठी तिथे गणपतीला पुजलं जातं. चीनमधल्या प्राचीन हिंदू मंदिरांमध्ये चारही बाजूला प्रवेशद्वारावर गणपती मूर्ती असल्याचं आढळून येतं.
जपान
जपानमध्ये गणपतीला कांगितेन या नावाने ओळखलं जातं जे जपानी बौद्ध धर्माशी संबंधित आहे. दोन शरीर असलेला हा गणपती चार हातांच्या रूपात रंगवला जातो.
श्रीलंका
तामिळ बहुल क्षेत्रात काळ्या दगडांमध्ये तयार केलेली भगवान पिल्लयार [ गणपती ] ची पूजा केली जाते. श्रीलंकेत गणपतीची १४ प्राचीन मंदिरं आहेत. कोलंबोजवळच्या केलान्या नदीच्या तीरावर प्राचीन गणपती मुर्त्या आढळून येतात.
इंडोनेशिया
असं सांगितलं जातं कि इंडोनेशियावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव हा पहिल्या शतकापासून आहे. इंडोनेशियातल्या भारतीयांसाठी खास भारतातून गणेश मुर्त्या पाठवल्या जातात. इथल्या नोटेवरसुद्धा गणपतीचा फोटो आहे. इंडोनेशियात गणपतीला ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं.
थायलँड
गणपती फ्रा फ़िकानेत या नावाने थायलंडमध्ये परिचित आहे. इथं गणपतीला प्रत्येक संकटाला पराभूत करणारा आणि यशाची देवता म्हणून पुजलं जातं. नवीन व्यवसाय आहे लग्नाच्या मुहूर्तावर गणपतीची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीसोबतच गणेशोत्सवसुद्धा थायलँड मध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
अशा अनेक देशांमध्ये गणपतीची मोठ्या श्रद्धेने लोकं पूजा करतात. महाराष्ट्रात गणेशोत्सव म्हणजे धूम असते, देशभरात गणपती म्हणजे एक पर्वणी असते पण जगभरात विविध देशांमधली लोकं त्यांच्या पद्धतीने आणि मोठ्या जोशमध्ये गणेशोत्सव साजरा करतात हे हि विशेषच म्हणावं लागेल.
हे हि वाच भिडू :
- गेल्या तीन पिढ्या गणपती बाप्पाला सुबक आणि सुंदर बनविण्याचे काम मुकेरकर परिवार करत आहे.
- औरंगजेबाच्या हल्ल्यानंतर सुद्धा गणपतीच्या या स्वयंभू मूर्तीला धक्का पण लागला नाही
- काम पाहिजे असेल तर मला मत द्या, भाषण ऐकायचं असेल तर बापूसाहेबांना गणपतीमध्ये बोलवू…
- त्याचं नाव जॉन, ते जन्माने ख्रिश्चन आहेत अन् ते दरवर्षी उत्साहात घरी गणपती बसवतात