चहा विकणाऱ्या माणसाला आयडिया सुचली आणि जगाला नादावणाऱ्या कॅडबरीचा जन्म झाला..

आपल्या देशात टीव्हीवर सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीच्या जाहिराती दाखवत असतील तर त्या कॅडबरीच्या. व्हरायटी आहे पण सगळ्यांची एकच फेव्हरेट आहे ती म्हणजे डेरी मिल्क. कॅडबरी म्हणजे डेरी मिल्क असं समीकरणचं झालं आहे. घरात कुठलीही आनंदाची गोष्ट घडली तरी डेरी मिल्क, गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायचं असेल तर अजून महागातली डेरी मिल्क, घरातल्या लहान मुलांना सुद्धा आपण विशेष करून डेरी मिल्क कॅडबरीचं देतो.

जगभरात प्रस्थ असणाऱ्या या डेरी मिल्क कॅडबरीचा नक्की जन्म कसा झाला , कुठून सुरवात झाली आणि जगातली सगळ्यात जास्त विकला जाणारा ब्रँड का म्हणून कॅडबरी ओळखली जाते हे सगळं आज आपण बघणार आहोत.

१८२४ मध्ये जॉन कॅडबरी यांच्या वडिलांचं बर्मिंघम मध्ये रस्त्याच्या कडेला एक छोटं चहाचं दुकान होतं. जॉन हे आपल्या वडिलांना दुकानात मदत करायचे. पुढे दुकानाची सूत्र हाती आल्यावर जॉन कॅडबरी चहा , कॉफी आणि इतर काही गोष्टी विकू लागला.

त्यावेळी चॉकलेट ड्रिंक नावाचं पेय नवीनच बाजारात आलेलं होतं. भाजलेल्या कोको बिया त्याची पावडर करून दुधामधून मिक्स करून ते विकलं जायचं. लोकांमध्ये हे चॉकलेट ड्रिंक चांगलंच प्रसिद्ध होतं आणि त्याची मागणीही वाढती होती. त्यावेळी जॉन यांनी विचार केला कि माझ्या दुकानात सध्या मी चहा वगैरे विकतोच आहे तर चॉकलेट ड्रिंकही विकायला सुरवात करू.

वेस्ट इंडिज वरून येणाऱ्या उच्च दर्जाच्या कोको बिया जॉन यांनी आपल्या चॉकलेट ड्रिंकमध्ये वापरायला सुरवात केली. स्वतःच्या पद्धतीने त्यांनी ते चॉकलेट ड्रिंक अजून काही सामान घालून इंटरेस्टिंग बनवलं. लहान मुलांमध्ये या पेयांची क्रेझ जास्त होती. हळूहळू मोठ्या लोकांमध्येही ते आवडीने प्यायलं जाऊ लागलं.

या प्रकारामुळे त्यांच्या दुकानाचं गिऱ्हाईक हे दुप्पट झालं. त्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली झाली.

जॉन कॅडबरिंच्या दुकानातील हे चॉकलेट ड्रिंक इतकं प्रसिद्ध झालं कि त्याची कीर्ती थेट राणी व्हिक्टोरिया पर्यंत पोहचली.

१८५४साली जॉनला त्याच्या चॉकलेट ड्रिंककरिता राणी व्हिक्टोरियाने रॉयल वॉरंट देऊ केलं. व्हिक्टोरिया राणी सुद्धा जॉनच्या दुकानातील चॉकलेट ड्रिंक्सची चाहती होती.

हे रॉयल वॉरंट त्याकाळी मोजक्याच लोकांना मिळायचं ज्यांच्या उत्पादनात चांगली गुणवत्ता असेल.

आपल्या दुकानातील चॉकलेट ड्रिंक्सचे त्यांनी जवळपास १६ व्हरायटी फ्लेवर तयार केले. भावाच्या मदतीने संपूर्ण ब्रिटनमध्ये कॅडबरी यांच्या चॉकलेट ड्रिंक्सचा बोलबाला होता. १८६० साली व्यवसायातील वादातून भाऊ बेंजामिन जॉन पासून वेगळा झाला. आपल्या कमी होत चाललेल्या वयानुसार जॉन कॅडबरीने आपल्या दुकानाची जबाबदारी आपल्या दोन मुलांवर टाकली.

रिचर्ड आणि जॉर्ज या दोघांनी आपल्या कॅडबरी ब्रँडमध्ये काळानुसार अनेक प्रयोग आणि बदल करून पाहिले. १८७० मध्ये कॅडबरीचं उत्पादन बाहेरच्या देशात निर्यात केलं जाऊ लागलं. १८८९ साली कॅडबरीचा जनक असलेला जॉन कॅडबरीचं निधन झालं. आणि पुढच्या दहा वर्षांनी रिचर्ड याचही निधन झालं.

जॉर्जने मात्र नेटाने आपली कंपनी वाढवली, दूरवर तिचा विस्तार केला. जॉर्जने असं प्रॉडक्ट शोधून काढलं ज्याने कॅडबरी ब्रँड जगभरातल्या घराघरात पोहचला. १९०५ साली जॉर्जने जगप्रसिद्ध डेरी मिल्क कॅडबरीचा चमत्कार घडवून आणला. जॉर्ज हा सुरवातीपासूनच डार्क चॉकलेट वर प्रयोग करून काहीतरी नवीन बनवू पाहत होता. चॉकलेट पावडर मध्ये दूध आणि साखर मिसळून त्याला मिश्रणाला वाळवलं गेलं आणि त्यानंतर त्याची टेस्टिंग केली तेव्हा त्याची चव अप्रतिम होती.

आणि हि सुरवात झाली होती कॅडबरीची डेरी मिल्क बनण्याची. १९४८ साली कॅडबरी भारतात आली तीही उत्तम क्वालिटी आणि टेस्टमुळे. पुढे भारतात ती प्रमाणापेक्षा पसंद केली जाऊ लागली. कॅडबरीने भारतात बिस्कीट, पेयं आणि कॅण्डी यांचा चांगला प्रचार आणि प्रयोग केला जो मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला. तब्बल ५० हुन अधिक देशात कॅडबरी ब्रँड हा विकला जातो.

मार्केटिंग आणि गुणवत्तेच्या जोरावर कॅडबरी जगभरात आवडीने खाल्ली जाते. सुरवातीला महाग असलेली कॅडबरी हळूहळू इतक्या कमी किमतीत उपलब्ध होऊ लागली कि कुठल्याही वर्गाला ती परवडू लागली. भेटवस्तू म्हणून मिठाईच्या स्वरूपात ती सगळीकडे उपलब्ध होऊ लागली.

जाहिरातीवर तब्बल ४० % खर्च डेरी मिल्क करते. भारतात याचं प्रमाण अधिक आहे कारण भारतातल्या सणउत्सवात डेरी मिल्कचं प्रोडक्शन सगळ्यात जास्त असतं. आज घडीला ६,७४६ कोटींची उलाढाल कॅडबरी जागतिक बाजारपेठेत करते आहे. 

एका साध्या चहाच्या दुकानातून सुरु झालेला हा प्रवास जगातला सगळ्यात हाय सेलिंग कॅडबरी ब्रँड बनला.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.