गेल्या २३ वर्षांपासून गांगुलीचा हा विश्वविक्रम कोणीच मोडू शकलेलं नाही

आज भारतीय क्रिकेट संघाचं जागतिक क्रिकेटमध्ये जे काही स्थान आहे, त्याची पायाभरणी झाली ती सौरव गांगुलीच्या दादागिरीच्या काळातच. विराट कोहलीने मैदानावर कितीही आक्रमकपणा दाखवू देत नाहीतर इतर कोणी कितीही शतकं ठोकूदेत.

भारतीय क्रिकेटचा आक्रमक चेहरा म्हणून आपल्यासमोर आजही जे पहिलं नांव येतं ते सौरव गांगुलीचंच असतं.

लॉर्डसच्या गॅलरीत, साहेबांच्या घरात गांगुलीने फिरवलेला टी-शर्ट कोट्यावधी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या हृदयात  कोरला गेलाय तो कायमचाच. ही दादागिरी फक्त गांगुलीच करू शकत होता.

गांगुलीच्या एका असा विश्वविक्रम, जो निवृत्तीनंतरच्या इतक्या वर्षांनंतर देखील त्याच्याच नावावर जमा आहे.

खरं तर क्रिकेटमध्ये दिवसागनिक नवे विश्वविक्रम होतात आणि काही काळातच ते मोडले जाऊन नवीन विश्वविक्रमाची भर पडते.

परंतु सौरव गांगुलीने १९९७ साली आपल्या नावावर केलेला विश्वविक्रम २३ वर्षांनतर देखील त्याच्याच नावे जमा आहे. हा विश्वविक्रम मोडणं दूरच, त्याची बरोबरी करणं देखील कुठल्याच क्रिकेटरला जमलेलं नाही.

तर हे वर्ष होतं १९९७.

कॅनडातील टोरेंटो येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान ‘शारजाह फ्रेंडशिप कप’चे आयोजन करण्यात आलं होतं. रमीझ राजा पाकिस्तानच्या कर्णधारपदी होता, तर भारतीय संघाची धुरा सचिन तेंडूलकरच्या खांद्यावर होती.

भारत-पाक या दोन्ही संघादरम्यान खेळवल्या गेलेल्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील ५ पैकी ४ सलग सामन्यात सौरव गांगुली ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला होता.

एका सिरीजमध्ये सलग ४ सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरण्याचा विक्रम त्यावेळी त्याच्या नावे जमा झाला होता.

अर्थातच त्याच्या या कामगिरीमुळे तो ‘मॅन ऑफ द सिरीज’ देखील राहिला होता. सिरीजमधली पहिली मॅच सोडली तर पुढच्या चारही मॅचमध्ये दादागिरी करत गांगुलीने ही सिरीज भारताला ४-१ अशी जिंकून दिली होती.

पहिल्या मॅचमध्ये देखील गांगुलीने ‘ऑल-राउंडर’ खेळीचं प्रदर्शन करत बॅटिंग करताना १७ रन्स आणि बॉलिंग करताना २ विकेट्स मिळवत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता, परंतु या सामन्यात अजय जाडेजाच्या झुंझार आणि आक्रमक ४९ रन्सच्या खेळीमुळे तो ‘मॅन ऑफ द मॅच’चा मानकरी ठरला होता. हा सामना भारताने २० रन्सनी जिंकला होता.

सिरीजच्या दुसऱ्या सामन्यात गांगुलीने आपला ‘ऑल-राउंडर’ फॉर्म कायम राखत आधी बॉलिंग करताना २ विकेट आणि नंतर पाकिस्तानच्या ११६ धावांचा पाठलाग करताना ३२ रन्सची खेळी साकारत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.

Saurav Ganguly Birthday

त्यानंतरच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम बॅटिंग करताना पाकिस्तानसमोर १८२ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. १८२ रन्सचं टार्गेट तुलनेत छोटं होतं, त्यामुळे हा सामना जिंकून पाकिस्तान सिरीजमध्ये टिकून राहील असंच वाटत होतं.

परंतु गांगुलीच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानी फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली आणि पाकिस्तानचा संघ ३७ ओवर्समध्ये फक्त १४८ रन्स करू शकला. भारतीय संघाने ३४ धावांनी विजय मिळवत सिरीजदेखील खिशात घातली. सौरव गांगुलीने या सामन्यात १० ओवर्समध्ये १६ रन्स देत ५ विकेट्स मिळवल्या होत्या.

गांगुलीच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील त्याची बॉलिंगमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

चौथ्या सामन्यात देखील गांगुलीची कामगिरी ‘ऑल-राउंडर’ स्वरुपाची राहिली. पावसामुळे २८ ओवर्सचा करण्यात आलेल्या या सामन्यात प्रथम बॉलिंग करताना २ विकेट्स आणि नंतर पाकिस्तानच्या १५९ रन्सचा पाठलाग करताना नाबाद ७५ धावांच्या खेळीने भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्सनी सहज विजय मिळवला.

सिरीजच्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम बॅटिंग करताना गांगुलीच्या शानदार ९६ रन्सच्या खेळीच्या जोरावर निर्धारित ५० ओवर्समध्ये पाकिस्तानसमोर २५१ रन्सचं लक्ष्य ठेवलं. पण पाकिस्तानने सांघिक कामगिरीच्या जोरावर ४२ व्या ओवरमध्येच ५ विकेट्स गमावून हे लक्ष्य पार केलं. या सामन्यात देखील गांगुलीने २ विकेट्स मिळवल्या.

त्यामुळे भारतीय संघ पराभूत होऊन देखील गांगुली सलग चौथ्या सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’चा मानकरी ठरला.

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.