या पुणेकर भिडूने सलग ७५ तास टाळ्या वाजवण्याचा विक्रम केला होता.

तर भावड्यानो आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जाहीर केलेल्या जनता कर्फ्यु मध्ये सामील झालाय की नाही? कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगावर सध्या तरी हाच सर्वोत्तम उपाय आहे.

या मेडिकल इमर्जन्सीच्या काळात भारतातील 130 कोटी जनता सुरक्षित रहावी म्हणून अनेक डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई करणारे, पोलीस, आर्मीचे जवान सतर्कपणे लढा देत आहेत.

त्यांच्यासाठी आज बरोबर 5 वाजता आपल्याला टाळ्या वाजवून किंवा थाळी वाजवून कृतज्ञता व्यक्त करायची आहे.

आम्ही भिडू पण घरी थांबलोय. पण तुम्हाला नवनवीन माहिती तर द्यावी लागणार आहे. बाल्कनीत उभं राहून विचार करत होतो तर आमच्या शेजारचे लेले काका पण त्यांच्या बाल्कनीत उभं होते.

काका ज्वाजल्य अभिमान असणारे पक्के पुणेकर आहेत. त्यांच्या कडे हजारो स्टोऱ्या आहेत. त्यांना खडा टाकायला म्हणून सहज विचारलं,

काय काका 5 वाजता टाळ्या वाजवायची प्रॅक्टिस करताय काय?

मग काका स्टार्ट झाले. टाळ्या वाजवायच महत्व त्यांनी सांगितलं. बोलता बोलता त्यांनी एक गंमत सांगितली,

आमच्या या पुण्यात एक भिडू होता ज्याने सलग 75 तास टाळ्या वाजवण्याचा जागतिक विक्रम केला होता. नाव धनंजय कुलकर्णी.

अनेक लोकांना वेगवेगळे छंद असतात. आमच्या पुणेकरांना अपमान करायचा छंद आहे, तसेच धनंजय कुलकर्णी यांना जागतिक विक्रम करायचा छंद होता.

त्यांनी फक्त 75 तास टाळ्या वाजवण्याचाच नाही तर एकाच वेळी 194 कप चहा पिण्याचा, एका पायावर 35 तास उभे राहण्याचा, भरधाव धावत्या डेक्कन क्वीन ट्रेन मधून डोंबिवली स्टेशनवर उडी मारण्याचा विक्रम केला होता.

त्यांनी अनेक अचाट विक्रम केले त्यामुळे त्यांना विक्रमादित्य धनंजय कुलकर्णी अशी ओळख मिळाली होती.

यात सर्वात सुप्रसिद्ध होता काचा खाण्याचा विक्रम. लंडन मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी जुने ट्यूब लाईट, बल्ब फोडून तब्बल 2.6 किलो काच खाण्याचा विक्रम केला होता.

एवढंच नाही तर ज्या गिनीजबुकात त्यांचं नाव नोंदल गेलं होतं त्या गिनीज बुकाचे 760 पाने खाऊन तो देखील विक्रम त्यांनी आपल्या नावे नोंदवला होता.

पुणेकरांसाठी त्यांची प्रसिद्धी एखाद्या सुपरहिरो पेक्षा कमी नव्हती. त्यांना पुढचा विक्रम अमेरिकेतील नायगरा धबधब्यात उडी मारण्याचा करायचा होता.

पण दुर्दैव अस की जून 2005 साली सांगली येथे हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. ते तेव्हा फक्त 51 वर्षांचे होते.

अस सांगितलं जातं की पोस्टमार्टेमवेळी त्यांच्या आतड्यामध्ये काचा सापडल्या होत्या. विक्रम करण्याच्या वेडापायीच त्यांनी आपला जीव गमावला होता.

आज त्यांच्या मृत्यू ची बातमी आणि काही जणांनी लिहिलेली ब्लॉगपोस्ट वगळता धनंजय कुलकर्णी यांच्या बद्दल इंटरनेटवर कोणतीही माहिती नाही. पुणेकरांनी दंतकथांमधून या आपल्या हिरोला जपले आहे.

तरी वर्क फ्रॉम होमच्या गडबडीत आम्ही आपल्या पर्यंत ही स्टोरी आणली. त्यामुळे काही संदर्भ चुकले असतील तर आम्हाला आणि आमच्या लेले काकांना माफ करा. आणि तुमची काही धनंजय कुलकर्णी यांच्या बद्दल आठवण असेल तर जरूर शेअर करा.

हे ही वाच भिडू.