गेल्या ११७ वर्षांपासून सुरु असलेल्या या बल्बच्या फ्युजा अजून उडालेल्या नाहीत !

सीएफएल बल्ब सोडला दुसरे बल्ब फार-फार तर वर्षभर चालतात. वर्षभरापेक्षा अधिक काळ चालणारा बल्ब आपल्याकडे असण्याची शक्यता कमीच. तुम्हाला जर आम्ही सांगितलं की जगात एक बल्ब असा देखील आहे, की जो गेल्या ११७ वर्षांपासून सुरूच आहे आणि त्याच्या फ्युजा अजून उडालेल्या नाहीत तर..? बातमी ऐकून तुमच्या फ्युजा मात्र उडू  शकतात, पण ही बातमी अगदी शंभर टक्के खरी आहे.

नेमका आहे कुठे हा बल्ब…?

हा बल्ब आहे अमेरिकेतील कॅलीफोर्निया प्रांतातील लिवरमोर या शहरात. शहरातील एका अग्निशमन केंद्रात हा बल्ब ठेवण्यात आलेला असून, तो सर्वप्रथम १९०१ साली या केंद्रात बसविण्यात आला होता. त्यावेळी एका व्यापाऱ्याने या केंद्राला हा बल्ब भेट म्हणून दिला होता. १९०१ साली बसविण्यात आलेला हा ४ वॅटचा बल्ब अजून देखील सुस्थितीत आहे. फक्त सुस्थितीतच नाही, तर तो चालू देखील आहे. विशेष म्हणजे तो दिवसाचे २४ तास चालू असतो.

बल्ब कधीच बंद नाही पडला..?

बसवण्यात आल्यानंतर बल्ब सर्वात प्रथम बंद करण्यात आला तो १९३७ साली. बल्बला विद्युत पुरवठा करणारी लाईन बदलायची असल्याने त्यावेळी बल्ब बंद करण्यात आला होता. त्यानंतर बल्ब बंद पडला ते थेट २०१३ सालात. अग्निशमन कर्मचाऱ्यांना वाटलं की झालं, एकदाच्या बल्बच्या फ्युजा उडाल्या. पण त्यावेळी देखील असं काहीच झालं नव्हतं.

bulb 1

यावेळी बल्ब बंद पडला तेव्हा देखील कारण तेच होतं. बल्बला विद्युत पुरवठा करणारी लाईन खराब झाली होती, त्यामुळे बल्ब बंद पडला होता. ज्यावेळी ही लाईन व्यवस्थित करण्यात आली, त्यावेळी बल्ब परत चमकायला लागला. दरम्यानच्या काळात २००१ साली अग्निशमन केंद्राकडून बल्बचा १०० वा वाढदिवस देखील साजरा करून झाला होता.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद

लिवरमोर शहरातलं अग्निशमन केंद्र, जिथे हा बल्ब बसविण्यात आलाय, ते आता एक म्युझियम बनलंय. लोकं उत्सुकतेने हा बल्ब बघायला या केंद्रात येतात. लोकांना बल्ब बघता यावा, यासाठी बल्बसमोर एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आलेला असून, त्याद्वारे येणाऱ्या लोकांसाठी प्रकाशमान बल्बचे थेट प्रक्षेपण करण्यात येते.

स्वतःच्या फायद्यासाठी बल्ब बनविणाऱ्या कंपन्यांनी रचलं कारस्थान

स्पॅनिश भाषेत बल्बविषयी एक डॉक्युमेंटरी बनविण्यात आलीये. इंग्रजीमध्ये ती ‘द लाईट बल्ब कॉन्स्पीरसी’ या नावाने रिलीज झाली. या डॉक्युमेंटरीमध्ये  बल्ब बनविणाऱ्या कंपन्यानी कशा  पद्धतीने या बल्बचं उत्पादन थांबवलं याविषयीच्या कारस्थानाबद्दल सांगण्यात आलंय.

या डॉक्युमेंटरीनुसार बल्ब बनविणाऱ्या कंपन्यांनी विचार केला की जर सर्वच बल्ब अशा पद्धतीनेच दीर्घकाळ चालायला लागले तर ग्राहकांना नवीन बल्बच विकत घ्यावा लागणार नाही आणि या कंपन्यांचा धंदाच बसेल.

१९२४ साली बल्ब बनविणाऱ्या कंपन्यांची एक गुप्त बैठक पार पडली आणि त्यात सर्वानुमते बल्बचं आयुर्मान घटविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळेच आजकाल आपल्याला बाजारात जे बल्ब मिळतात ते फार-फार तर १००० तास चालतात.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.