५०० रुपये घेऊन मुंबईत आलेल्या शेतकऱ्याच्या पोराने जगातली सगळ्यात मोठी लॅबोरेटरी उभारली.
थायरॉईड सारखा गंभीर आजार आणि त्याचा खर्च सर्वसामान्यांना परवडावा म्हणून थायरोकेअर हि जगातली सगळ्यात मोठी कंपनी उभारणाऱ्या डॉ. अरोकियास्वामी वेलूमणी यांची यशोगाथा आज आपण पाहूया. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने हा अचाट करणारा पराक्रम कसा केला आणि व्यवसायाला कल्पकता आणि आधुनिकतेची जोड देऊन कसा आपला व्यवसाय वाढवला ते आपण बघूया.
तामिळनाडूतील कोइम्बतुर सारख्या ठिकाणाहून डॉ. वेलूमणी यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. वडील शेतकरी आणि आई गृहिणी होती. विज्ञान विषयात पदवी मिळवून ते मुंबईत बेरोजगारीवर मात करण्यासाठी आले. मुंबई युनिव्हर्सिटीतून त्यांनी थायरॉईड बायोकेमिस्ट्री मध्ये पदव्युत्तर शिक्षण मिळवलं. पुढे त्यांना भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरमध्ये [ barc ] सरकारी नोकरी मिळाली.
barc च्या मुलाखतीत वेलूमणी याना विचारण्यात आलं होतं कि थायरॉईड ग्रंथी कुठे असतात आणि त्याच उत्तर वेलूमणी याना आलं नव्हतं. पुढच्या दहा वर्षात हि नोकरी करत असताना त्यांनी थायरॉईड या विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यांचं आयुष्य नीटनेटकं सुरु होतं. त्यांनी barc मध्ये तब्बल १४ वर्षे नोकरी केली.
एक दिवस बॉसबरोबर कुठल्यातरी मुद्द्यावरून वेलूमणी यांचे मतभेद झाले आणि बॉसने त्यांना ठणकावून सांगितलं कि इथला मालक मी आहे तुम्हाला जितकं सांगितलं तितकंच काम तुम्ही करा. या वाक्यावर त्यांनी १४ वर्षांच्या प्रदीर्घ कामाचा राजीनामा मालकाला सुपूर्द केला आणि ते घरी आले.
वयाच्या ३७व्या वर्षी त्यांनी नोकरी सोडली. आता त्यांच्याकडे उरलं होत फक्त पीएचडी डिग्री आणि पीएफचे मिळालेले २ लाख रुपये. त्यावेळी थायरॉईड टेस्ट खूप महाग होत्या. वेलूमणी यांनी विचार केला कि जर या टेस्ट मोठ्या प्रमाणात केल्या गेल्या तर त्या स्वस्तात उपलब्ध करून देता येईल असा विचार त्यांच्या डोक्यात येऊन गेला.
यावर त्यांनी भायखळ्यातील एका दोनशे स्क्वेअर फूटच्या दुकानात त्यांनी थायरोकेअरची स्थापना केली. त्यांच्या या कामात त्यांना मदत करता यावी म्हणून त्यांच्या पत्नीने स्टेट बँकेतली चांगली नोकरी सोडली. आजच्या काळात थायरोकेअर हि जगातली सगळ्यात मोठी थायरो टेस्टिंग लॅब आहे. नवी मुंबईत त्यांनी जगातली सगळ्यात मोठी आणि आधुनिक लॅब बनवली आहे. या लॅबमध्ये दररोज दोन लाख टेस्ट केल्या जातात.
थायरोकेअरची जेव्हा स्थापना झाली तेव्हा टेस्टिंग मशीन जास्त महाग होत्या. वेलूमणींकडे त्यावेळी पैसे नव्हते मात्र त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली कि लॅबमध्ये टेस्टिंग मशीन हि बराच वेळ वापर न होता तशीच उभी असते आणि मोजून त्यावर चार किंवा पाच टेस्ट केल्या जातात. तेव्हा वेलूमणी यांनी इतर लॅबशी संपर्क साधून त्यांच्या मशीन स्वतःकडे मागवून घेतल्या आणि मशीनच्या मालकांना ऑर दिली कि या मशीनच भाडं आणि तुमच्या टेस्ट मी मोफत करून देत जाईल पण हि मशीन माझ्याकडेच ठेवावी लागेल. हि ऑफर बऱ्याच लोकांना पटली आणि त्यांनी ती ऑफर स्वीकारली.
वेलूमणी यांनी एमबीए केलेलं नव्हतं पण ते असं सांगतात कि, टाइम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक टाइम्स वाचून मी बिजनेस शिकलो.
इथपर्यंत त्यांनी टेस्टिंग मशीन चांगल्या वापरात आणून आपली कंपनी व्यवस्थित मार्गावर आणली मात्र त्यांच्या डोक्यातला बिजनेसमन त्यांना शांत बसू देत नव्हता. त्यांना एक आयडिया सुचली जेव्हा थायरॉइडची एक टेस्ट हि सहाशे रुपयांना केली जायची तेव्हा वेलूमणी यांनी केवळ शंभर रुपयात टेस्ट करून देणं सुरु केलं. त्यांची बायको दिवसा आणि ते रात्री लॅबमध्ये काम करायचे यामुळे ते ग्राहकांना दुसऱ्याच दिवशी रिपोर्ट देऊ लागले. यामुळे त्यांच्या थायरोकेअर कंपनीचे चांगलेच नाव झाले.
त्यांच्या या आयडियाने सप्लायर्स लोकांचा त्यांच्याकडे ओढा वाढला आणि ते नेहमी सांगतात कि फायदा हा सप्लायर्सकडून मिळवायला शिकले म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायात एक पाऊल पुढे आहात. वर्तमानपत्र आणि बातम्यांच्या वितरणाचा फंडा त्यांनी त्यांच्या व्यवसायात आणला आणि एकाच ठिकाणाहून तो जगभरात कसा पोहचवायचा याचं प्रात्यक्षिक त्यांनी अमलात आणलं आणि यशस्वीही करून दाखवलं.
मुंबईतल्या वाशीमध्ये देश परदेशातून थायरॉइडचे सॅम्पल्स लॅबमध्ये टेस्टसाठी येतात. रातोरात टेस्ट करून दिवसा ते ऑनलाईन प्रदर्शित केर्ले जातात. तंत्रज्ञानाचा अत्यंत खुबीने वापर करून वेलूमणी यांनी स्पर्धकांना त्यांच्या जवळही फिरकू दिले नाही. वेलूमणी सांगतात कि,
माझा व्यवसाय हा मॅकडोनल्डसारखा आहे आणि तो जगभरात पसरलेला आहे, ज्याप्रमाणे मॅकडॉनल्ड केवळ एकाच पदार्थावर फॉकस करते त्याचप्रमाणे आम्ही फक्त थायरॉईड टेस्ट वर लक्ष देऊन आमचा व्यवसाय वाढवला.
अनुभव नसल्यामुळे वेलूमणी याना अनेक ठिकाणाहून काढून टाकण्यात आलं होत मात्र त्यांनी स्वतःच्या कंपनीत अनुभवी लोक न निवडता सगळी फ्रेशर्स लोक घेतली आहे. १००० लोकांचं त्यांचं व्यावसायिक कुटुंब आहे. त्यांच्या कंपनीत काम करण्याऱ्या प्रत्येकाचा हा पहिलाच जॉब असतो. कंपनीतल्या लोकांसोबत चर्चा करणे , त्यांच्यासोबत जेवणे यामुळे त्यांचे कर्मचाऱ्यांशी आपुलकीचे संबंध आहे.
वेलूमणी यांच्या कष्टाने थायरोकेअर हा ब्रँड बनला आहे. सुरवातीला केवळ ५०० रुपये घेऊन मुंबईत आलेल्या या गड्याने आज ३३०० करोडची सगळ्यात मोठी कंपनी काढली आहे.
हे हि वाच भिडू :
- ३० एकर जमिनीतून सुरवात करत ५०० कोटींचा व्यवसाय करणारा ब्रॅण्ड म्हणजे ‘सुला वाईन’
- हा शेतकरी वर्षाला ३० लाख रुपये इन्कम टॅक्स भरतोय….
- ते वार्षिक अडीच हजार कोटींची उलाढाल करणारे भारताचे पहिले दलित उद्योजक आहेत