हिंद केसरी होणं सोप्पं नाही, कुस्तीसाठी मागची १७ वर्षे अभिजीत आईपासून लांब राहतोय…
हिंद केसरी म्हणजे कुस्ती जगातील भारतातली सगळ्यात मोठी स्पर्धा. ही कुस्ती स्पर्धा जिंकणं हे प्रत्येक कुस्तीपटूचं स्वप्न असतं. हे स्वप्न अगदी प्रत्येकाचच पुर्ण होतं असं नाहीये… पण ज्यांचं पुर्ण होतं त्यांचा आनंद गगनात मावत नाही.
यंदाचा हिंद केसरी किताब पटकवलाय तो पुण्याच्या मराठमोळ्या अभिजीत कटकेनं.
अभिजीतनं तिकडे हिंद केसरीची गदा जिंकली आणि इकडे पुण्यातल्या वाघोलीमध्ये त्याच्या घरी त्याची आई आणि नातेवाईकांनी जल्लोष साजरा केला.
अभिजीतनं आतापर्यंत महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरी हे दोन्ही किताब पटकवलेत. २०१७ साली अभिजीतनं महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकत मानाची गदा पटकवली होती. त्यानंतर त्याचं लक्ष होतं ते हिंद केसरीचा किताब जिंकणं आणि त्याचं हे ही स्वप्न आता त्याने सत्यात उतरवलंय.
अंतिम सामन्यात अभिजीत समोरच्या पैलवानावर पुर्णपणे हावी होता.
काल पार पडलेल्या अंतिम सामन्यात अभिजीतची लढत ही हरियाणाच्या सोमवीरसोबत झाली. या सामन्यात अभिजीत सोमवीरवर पुर्णपणे हावी होता. सामना तर त्याने जिंकलाच, पण या सामन्यात त्याने सोमवीरला एकही पॉईंट स्कोअर करू दिला नाही.
सामना संपतेवेळी फायनल स्कोअर हा ४-० असा होता.
दोनदा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकलेला अभिजीत कटके आता हिंदकेसरी झालाय.
याआधीही तो हिंद केसरी स्पर्धेत सहभागी झाला होता. परंतू, फायनलमध्ये जाऊन त्याचा पराभव झाला होता असं स्वत: अभिजीतनं माध्यमांशी बोलताना सांगितलं. याशिवाय, मेहनत आणि सातत्य या दोन गोष्टींमुळेच आज तो हिंद केसरी स्पर्धा जिंकू शकला असंही तो म्हणाला.
अभिजीतने त्याच्या वडिलांची इच्छा पूर्ण केली.
हिंद केसरीची गदा जिंकल्यानंतर कसं वाटतंय असं विचारल्यावर अभिजीतने हिंद केसरीचा किताब मिळवणं ही खरंतर वडिलांची इच्छा होती असं म्हटलंय. अभिजीत म्हणालाय,
“हिंद केसरीची गदा मिळवणं ही खरंच खूप मोठी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. माझे वडीलही त्यांच्या काळात खूप चांगले कुस्तीपटू होते. हिंद केसरी स्पर्धा जिंकणं ही खरंतर त्यांची इच्छा होती आणि आज मी त्यांची इच्छा पूर्ण केलीये त्यामुळे मला खूप आनंद होतोय.”
अभिजीतनं आज हे जे यश मिळवलंय त्यात त्याच्या परिवाराचाही मोठा वाटा होता. आता असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे, अभिजीतच्या परिवारात मागच्या साधारण ३-४ पिढ्यांमध्ये कुस्तीपटू होते आणि त्यांच्या घरातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचा एकतरी कुस्तीपटू व्हावा अशी त्यांच्यी संपूर्ण घराण्याची इच्छा होती अशी प्रतिक्रिया अभिजीतच्या चूलत भावाने दिलीये.
अभिजीत मागचे १७ वर्ष आईपासून लांब राहून करतोय तालीम.
चिकाटी आणि संयम या दोन गोष्टी कोणत्याही यशाच्या मागचं फार महत्वाचं कारण असतात. अभिजीतची चिकाटी आणि संयम या दोन्ही गोष्टींबाबत सांगायचं झालं तर, त्याच्या आईने ज्या भावना मांडल्यात त्या फार महत्वाच्या आहेत. अभिजीतनं हिंद केसरी किताब पटकवल्यानंतर त्याची आई मीडियशी बोलताना म्हणाली,
“मागची १७ वर्षे अभिजीत माझ्यापासून दूर राहतोय. लांब पुण्यात राहून तो त्याची तालीम करतोय. कित्येकदा मी पुण्याला गेली तरी त्याला भेटणं टाळते कारण मला भेटल्यावर त्याचं कुस्तीवरचं लक्ष कमी होऊन आईचा लळा लागेल. आज त्याच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश मिळालंय. त्याला हिंद केसरी झालेला बघून फार आनंद होतोय.”
अभिजीतची तालीम नेमकी कशी चालायची?
इतक्या मोठ्या स्तरावर जर आपल्याला खेळायचं असेल आणि जिंकायचं असेल तर, त्यासाठी संयम गरजेचा असतो. खाण्यापिण्यावर मर्यादा येतात, बऱ्याचदा आपल्या आवडत्या गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतात. याशिवाय, प्रचंड सरावही गरजेचा असतो. अभिजीतनं स्वत: याबाबत सांगितलंय. तो म्हणाला,
तो दररोज सकाळी साडे तीन तास आणि संध्याकाळी साडे तीन तास तालीम करतो.
प्रोटीन्स घेणं हे एक व्यसन असल्याचंही तो म्हणाला.
जीमला जाऊन बॉडी बिल्डींग साठी प्रोटीन्स घेणाऱ्या तरुणांना अभिजीतने सल्ला दिलाय. बॉडी बिल्डींगसाठी प्रोटीन्स घेणं हे चुकीचं आहे. ते एक प्रकारचं व्यसनच आहे. आमच्यासारख्या कुस्तीपटूंच्या अंगावर काही प्रमाणात चरबीही दिसते. कारण, आम्ही प्रोटीन्स वगैरे घेऊन बॉडी बनवत नाही.
आता अभिजीत कुस्ती खेळताना तर दिसेलच. शिवाय, तो पुण्यातील आणि महाराष्ट्रातील कुस्तीतल्या नवख्या मुलांना तयार करतानाही दिसू शकेल. तसे संकेत त्याने मीडियाशी बोलताना दिलेच आहेत.
पुण्याच्या शिवराम दादा तालमीत तयारी करणाऱ्या या अभिजीत कटकेने हिंद केसरीची गदा जिंकून पुण्यासह महाराष्ट्राचं कुस्ती क्षेत्रातलं नाव आणखी मोठं केलंय.
हे ही वाच भिडू:
- कुस्ती पंढरीला महाराष्ट्र केसरीचा मान मिळवायला २१ वर्षे का लागली ?
- आधुनिक भारतात कुस्ती आणि व्यायाम क्षेत्रात क्रांती करण्याचं श्रेय एका मराठी माणसाला जातं
- युपीचा गडी कोल्हापूरचा पैलवान बनला, महाराष्ट्राला हिंदकेसरीची गदा जिंकून दिली.