पद्मश्री मिळालेला गुंगा पैलवान दिल्लीत आंदोलनाला बसलाय

नुकतंच देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण झालं. देशातले समाजसेवक, अभिनेते, खेळाडू आणि इतर दिग्गजांचा यावेळी सन्मान झाला. पद्मश्री मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एक नाव होतं विरेंदर सिंह.

रुंद छाती, धिप्पाड शरीरयष्टी, फुटलेले कान हे त्याचं रूप बघून कुणालाही सहज समजेल की हा पैलवान आहे. देशाला अनेक मेडल्स मिळवून देणाऱ्या विरेंदरचा पद्मश्री पुरस्कारानं यथोचित सन्मान झाला.

कुस्ती क्षेत्रात विरेंदरला ‘गुंगा पैलवान’ म्हणून ओळखतात. याचं कारण म्हणजे तो मूकबधिर आहे. वयाच्या नवव्या वर्षापासून कुस्ती खेळायला लागलेल्या विरेंदरनं आपल्या कुटुंबाला असलेला कुस्तीचा वारसा चांगलाच जपलाय.

पद्मश्री पुरस्कार मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी विरेंदरला आंदोलन करावं लागलं. यामागचं कारण काय होतं ते सांगतो.

विरेंदरनं पद्मश्री जिंकल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही ट्विट करत विरेंदरचं अभिनंदन केलं. ते ट्विटद्वारे म्हणाले, ‘हरियाणाचे सुपुत्र आणि फ्री-स्टाईल पॅरा रेसलर विरेंदर सिंहजी यांना पद्मश्री पुरस्कार मिळणं ही पूर्ण हरियाणासाठी गर्वाची बाब आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा.’

मुख्यमंत्र्यांच्या या ट्विटला उत्तर देताना विरेंदर म्हणाला, ‘मुख्यमंत्रीजी जर तुम्ही मला पॅरा खेळाडू मानत आहात, तर पॅरा खेळाडूंसारखा अधिकार का देत नाही. मी गेल्या चार वर्षांपासून स्ट्रगल करतोय. आजही मी ज्युनिअर कोच आहे. अजूनही मला यथोचित सन्मान मिळालेला नाही. मी याबाबतीत कालच नरेंद्र मोदींशी बोललो आहे, आता निर्णय आपल्याला घ्यायचा आहे.’

यानंतर आपला पद्म पुरस्कार, २०१५ साली मिळालेला अर्जुन पुरस्कार आणि जिंकलेली सर्व मेडल्स घेऊन विरेंदर दिल्लीतल्या हरियाणा भवन बाहेर उपोषणाला बसला. याची माहितीही ट्विटरद्वारे देत त्यानं मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना लक्ष्य केलं.

‘मी तुमच्या दिल्लीतल्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाला बसलो आहे. तुम्ही जोवर मूकबधिर खेळाडूंना पॅरा खेळाडूंचा दर्जा देत असल्याचं जाहीर करत नाही, तोवर मी इथून हटणार नाही. जर केंद्र सरकार आम्हाला पॅरा खेळाडूंसारखे अधिकार देत असेल, तर राज्य सरकार का नाही?’ असं ट्विट त्यानं केलं आहे.

विरेंदर सिंह म्हणजेच गुंगा पैलवाननं मिळवलेलं यश-

मूकबधिरांसाठी होणाऱ्या ‘डिफलिंपिक्स’मध्ये त्यानं चार गोल्ड मेडल्स मिळवली आहेत. त्यानं २००९ मध्ये ब्रॉंझ, तर २००५, २०१३ आणि २०१७ मध्ये गोल्ड मेडलला गवसणी घातली आहे. प्रतिष्ठेच्या वर्ल्ड डिफ रेसलिंग चॅम्पियनमध्ये २००८ मध्ये सिल्व्हर आणि २०१२ मध्ये ब्रॉंझ जिंकल्यानंतर, २०१६ मध्ये त्यानं गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

त्याला याआधी अर्जुन पुरस्कार आणि राजीव गांधी राज्य क्रीडा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये भारताची मान उंचावणाऱ्या आणि पद्म पुरस्काराला गवसणी घालणाऱ्या मल्लाला आपल्या हक्कांसाठी आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे, असं म्हणावं लागेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.