वो पहली बार, मुसु मुसु हासी गाण्यांमुळे लक्षात राहणारी रिंकल खन्ना नाव बदलल्याने ‘फ्लॉप’ ठरली?

सिनेमा सारख्या बेभरवशाच्या दुनियेत जिथे रावाचा रंक व्हायला काही वेळ लागत नाही त्या मुळे तिथे लोक कमालीचे अंधश्रधाळू बनतात. याच कारणाने गंडे, दोरे, श्रद्धा, नवस, बाबा, बुवा, तारीख, वार, नंबर यावर यावर नको इतका विश्वास ठेवू लागतात.

या उद्योगात खूप मोठ्या पैशाची गुंतवणूक आणि अनेकांचे भविष्य यातून ठरत असल्याने फूंक फूंक कर कदम रखे जाते है!  त्या मुळे इच्छा नसली तरी या अंधश्रद्धेच्या नियमानुसार ते वागत राहतात. अर्थात असे वागून यश मिळेल याची अजिबात खात्री नसते.

मग त्याला नशिबाची प्राक्तनाची जोड दिली जाते आणि मागील पानावरून पुढे असा खेळ चालूच रहातो! काही निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटाच्या नावाच्या आद्याक्षरा मध्ये विशिष्ट अक्षर हवे असते. जे ओम प्रकाश यांचे सर्व चित्रपट ‘अ’ ने सुरु होतात. 

आपले मराठी नाटककार बाल कोल्हटकर यांच्या सर्व नाटकांची नावे नऊ अक्षरांची असायची! (देव दिनाघरी धावला, दुरितांचे तिमिर जावो, दिवा जळू दे सारी रात,सीमेवरून परत जा….) अशी अनेक उदाहरणे मायानगरीत सापडतात.मग संख्याशास्त्र, वास्तुशास्त्र या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येऊ लागल्या.

असाच एक किस्सा राजेश खन्नाच्या मुलींबाबतचा आहे.

राजेश खन्नाच्या ट्विंकल खन्ना आणि रिंकल खन्ना या दोन मुली. ट्विंकल बॉबी देओल सोबत ‘बरसात’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आली. ती फार काही अभिनयाचे रंग दाखवू शकली नाही. अक्षय कुमार सोबत लग्न करून तिने तिचे करिअर चेंज केले.

डिंपल कपाडियाचे वडील चुनीलाल कपाडिया मोठे व्यापारी होते. त्यांच्या खानदान मध्ये एक अंधश्रद्धा होती. त्यांच्या घरात जन्माला आलेल्या मुलीच्या नावाचे  शेवटचे अक्षर ‘ल’ पाहिजे. म्हणजेच इंग्रजी स्पेलिंग मध्ये’le‘ एल इ असणे गरजेचे होते. 

डिंपल ला पहिली मुलगी झाली. घराण्याच्या रीती रिवाजानुसार तिचे नाव ट्विंकल ठेवले. तिला दुसरी मुलगी झाली तेव्हा तिचे नाव रिंकल ठेवले यथावकाश मुली मोठ्या झाल्या आणि रुपेरी पडद्यावर अभिनेत्री म्हणून आल्या. रिंकल जेंव्हा  सिनेमात आली तेंव्हा  सर्वांनी तिच्या नावाबद्दल शंका उपस्थित केली.

रिंकल हे नाव फिल्मी दुनियेमध्ये चालणार नाही असे सांगितले.

तिचे वेगळे फिल्म बारसे करावे असे ठरले. पण डिम्पल कपाडिया ने “ तुम्ही तिचे काहीही फिल्मी नाव ठेवा पण नावाच्या शेवटी ‘ल’ आले पाहिजे!” असा हट्ट धरला. अशा नावाचा खूप शोध झाला पण एकही नाव त्यांना पसंत पडत नव्हते. चित्रपट देखील पूर्ण होत आला तरी नावाचा पत्ता नाही. शेवटी चित्रपट पूर्ण झाला पण नाव काही सापडले नाही.

अनेक जण म्हणाले “कुठे नावाच्या भानगडीत पडता? या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. जे नाणे खणखणीत आहे ते वाजणारच!”  त्यामुळे शेवटी रिंकल चे नवे नाव रिंकी खन्ना असे ठरले. चित्रपट होता ‘प्यार मे कभी कभी’. चित्रपटात तिचा नायक होता दिनो मोरिया तर दिग्दर्शक होते राज कौशल.

सिनेमातली गाणी वो पहली बार, मुसु मुसु हासी हि गाणी गाजली पण सिनेमा सुपरफ्लॉप झाला. यानंतर तिला  दुसरा चित्रपट मिळाला त्याचा नायक गोविंदा होता. चित्रपटाचं होता ‘ जिस देश मे गंगा रहता है’ हा चित्रपट देखील व्यावसायिक दृष्ट्या अयशस्वी ठरला. यानंतर रिंकी ने चार वर्ष चित्रपटात नायिकेच्या भूमिका केल्या. 

मुझे कुछ कहना है, ये है जलवा, प्राण जाये पार शान न जाये…. पण यातील तिचा एकही चित्रपट चालला नाही. शेवटी तिने चित्रपट व्यवसायाला रामराम ठोकला आणि वेगळे करिअर करायचे ठरवले.

२००३ साली तिने समीर सरन सोबत लग्न केले आणि कलकत्याला प्रस्थान केले. आजही डिम्पल ला असे वाटते तिचे नाव रिंकलच ठेवले असते तर कदाचित तिला चित्रपटात यश मिळाले असते. पण डिम्पल हे विसरते ट्विंकल चे नाव बदलले नाही तरी ती का अपयशी ठरली?

  • धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.