ह्यांच्या श्रीमुखात कोण देणार..?

एका कलाकाराने केलेल्या वादग्रस्त विधानावर दुसऱ्या कलाकाराने  त्याच्या श्रीमुखात देण्याची भाषा केली. या संवेदनशील कलाकाराचा उफाळून आलेला राग पाहून, त्याची जागी झालेली अस्मिता पाहून वाटलं की हाच जोश, हीच भाषा, हाच अंगार तेंव्हा कुठं जातो,

जेंव्हा हा कलाकार, स्वतः ज्या चित्रपट/टी व्ही क्षेत्रात काम करतो, तिथे अशा अनेक गोष्टी घडत असतात की ज्या पाहून, ऐकून कुणालाही चीड यावी संताप व्हावा,

पण मग हा संवेदनशील कलाकार तेंव्हा मात्र मूग गिळून का गप्प बसतो?

काही निर्मात्यांच्या कडून कलाकारांचे पैसे बुडवले जातात, मिळाले तरी पूर्ण पैसे मिळत नाहीत अशा वेळी ज्याची रोजी रोटी याच व्यवसायावर अवलंबून आहे अशा आपल्याच क्षेत्रातील कलाकारांची होणारी आर्थिक पिळवणूक पाहून ‘सिंबा’ सारखा हा संवेदनशील कलाकार का पेटून उठत नाही?

का तो त्या निर्मात्याच्या श्रीमुखात लावून देईन असं म्हणत नाही?

का त्याला भीती वाटते आपण कशाला वाईटपणा/वाकडं घ्या, उद्या त्या निर्मात्या कडून आपल्याला काम मिळाले नाही तर, व्यक्तिगत नुकसान का करून घ्यायचं हा व्यवहारी हेतू ठेवून, रोजगार हमी योजने प्रमाणे आपला आजचा दिवस भरतोय ना मग बास.

उगाच का वाद ओढवून घ्या, अशी तटस्थ स्वतःचे आर्थिक नुकसान न होणारी भूमिका हा संवेदनशील कलाकार का घेतो ?

मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही, तेंव्हा करोडो रुपये निर्मितीसाठी खर्च केलेल्या निर्मात्याच्या बाजूने ऊभा राहत मराठी सिनेमाला थियेटर आणि चांगल्या वेळा द्या नाहीतर थोबाड रंगविन असं कुठल्या थियेटर मालकाला म्हणण्याचं धाडस का बरं संवेदनशील कलाकार दाखवत नाही?

काही अवॉर्ड फंक्शन, पुरस्कार सोहळे यामध्ये निमंत्रित केलेली मंडळी, तेच तेच चेहरे दिसतात यातील बरचसे ज्याला सध्या face value आहे असे असतात. नवीन कलाकार कितीही चांगलं काम करीत असेल आणि आपल्यालाही कधी रेड कार्पेटवर जायला मिळेल अशी आशा लावून बसला असेल तरीही त्याला ’ किस झाड की पत्ती ’ समजून अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी बोलावण्याचे टाळलं जातं.

तीच बाब ज्येष्ठ कलाकारांच्या बाबतीत. त्यांना साधं निमंत्रणही जात नाही (जीवन गौरव द्यायचा असेल तर बरोबर अशा कलाकारांची आठवण येते)

अशा वेळी हे जुने कलाकार आहे म्हणून इंडस्ट्री आहे असं सांगून आयोजकांना जाब विचारून त्यांच्या श्रीमुखात देण्याची इच्छा संवेदनशील कलाकाराची होत नाही का?

अनेकदा शूटिंगच्या ठिकाणी, कार्यक्रमात गेल्यावर तिथे ज्यांनी एक काळ गाजवला अशी ज्येष्ठ कलाकार मंडळी असतील तर आपल्यातील आत्ताच्या पिढीतील काही कलाकार स्वतःहून जाऊन त्यांची साधी विचारपूस करीत नाहीत, वाकून नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेताना त्यांच्या कंबरेत लचक भरते की पायात वात येतो? असं खडसावून विचारत संवेदनशील कलाकार,

असा अवमान करणाऱ्या कलाकारांच्या एक सणसणीत श्रीमुखात का लावून देत नाही?

नॉमिनेशन पार्ट्यांना आपलेच काही सहकलाकार फुकटची मिळाली तर घ्या मनसोक्त ढोसून या तत्त्वाने “तरुण आहे रात्र अजूनही” असं समजत पहाटे पर्यंत दारूचा आनंद घेत असतात तेंव्हा संवेदनशील कलाकार इतर कलाकारांची पिऊन झालेली दशा आणि त्यानंतरचे दशावतार पाहून त्यांच्या श्रीमुखात लावून देत   त्यांना का नाही  सल्ला देत की,

“बाबा, प्रमाणात पी जरा, जो पर्यंत आपला चेहरा, शरीर आहे तोवरच कलाकाराची किंमत आहे”.

 टी वी मालिकांसाठी ऑडिशन होतात गुणवत्ता असूनही काहींची निवड होत नाही, ऑडिशन साठी मुंबई बाहेरून आलेल्या गरजू कलाकाराला प्रवासखर्च कुणी देत नाही पण त्यांना साधा कपभर चहा, वडापाव तरी मिळावा यासाठी कधी संवेदनशील कलाकार पुढे येऊन भांडला आहे का?

बरं काही ऑडिशन मध्ये निवड होऊन, तसे त्या कलाकाराला होकार कळवून शूटिंगच्या काही दिवस आधी टॅलेंट असूनही त्याचा पत्ता कट केला जातो आणि मर्जीतील दुसऱ्या कुठल्या कलाकाराची निवड होते, अशावेळी धीर खचलेल्या त्या नवोदित कलाकारांसाठी कधी तू चॅनलच्या क्रियेटीव्ह हेडच्या श्रीमुखात दिली आहे का?

चॅनल मध्ये क्रियेटीव्ह म्हणून काम करणाऱ्या काही अती हुशार आणि टेबला खालून चिरीमिरी खाण्यात तज्ञ असणाऱ्या व्यक्ती खाऊन खाऊन ढेकर देऊन झाल्यावरही त्यांची खाण्याची खाज सुटत नाही आणि कालांतराने करोडो रुपयांचा घोटाळा करून ती पकडली जातात.

टीव्ही क्षेत्रातील हा मोठा घोटाळा उघड झाल्यावर संवेदनशील कलाकार या मित्र असलेल्या व्यक्तींच्या श्रीमुखात देऊन त्यांनी ज्या निर्मात्यांच्या मुंड्या पिळवटून अजीर्ण होईपर्यंत खाल्लं आहे, त्या सगळ्यांना त्यांचे पैसे परत देऊन टाक भावा. असं श्रीमुखात देऊन समजावून का सांगत नाही?

गाण्यांच्या काही रियालिटी शो मध्ये जज म्हणून संगीत क्षेत्रातील अनुभवी संगीतकार, गायक, गीतकार यांना न बसवता अभिनय करणारी काही कलाकार मंडळी बसवली जातात तेंव्हा, ज्यांच्यामुळे गाणी जन्माला येतात त्यांना श्रेय न देता, गाण्याशी संबंध नसणारी मंडळी, जज, निवेदक म्हणून प्रेक्षकांच्या माथी मारली म्हणून आणि संगीतातील योगदान असणाऱ्या मंडळींना घरीच बसवले म्हणून, शो च्या निर्मात्याच्या, चॅनल क्रियेटीव्ह च्या श्रीमुखात देऊन त्याला किमान पाच बोटांचे मिळून पाच स्वरांची तरी आठवण करून देण्याचा अभिनव प्रयोग कधी संवेदनशील कलाकाराने केला आहे का?

चित्रपट, मालिकांच्या प्रमोशनसाठी झाडून सगळीकडे मॉल, आश्रम, कॉलेजमध्ये जाऊन प्रमोशन करणारी आणि ते करताना भाड्याने आणलेले ड्रेस घालून (काहींना स्पॉन्सर ड्रेस मिळतात) ग्लॅमर चा आनंद घेणारे, आम्ही हाय प्रोफाईल आहोत हे  दाखवण्याचा प्रयत्न करणारे काही कलाकार त्यांच्यासाठी ड्रेस आणणाऱ्या त्या डिझायनर च्या हातावर फुल न फुलाची पाकळी म्हणून दोन पैसे  ठेवण्याची दानत दाखवत नाहीत अशावेळी कधी त्या कलाकाराच्या श्रीमुखात देण्याचा विचार आला नाही का संवेदनशील कलाकाराच्या मनात?

आपल्याच व्यवसायातील स्पॉट बॉय, ड्रायव्हर, हेअर ड्रेसर यासारखी मंडळी जी त्या त्या कलाकारांसाठी काम करीत असतात, ती कामानिमित्त  घरी आल्यावर स्वतः ला “बिग बॉस” समजणारे काही कलाकार आलेल्यांना साधं पाणी विचारत नाहीत, स्वतः यांच्या समोर जेवायला बसणारा कलाकार दोन घास समोरच्याला देण्याची माणुसकी दाखवत नाही, काहीजण स्टेटस साठी ड्रायव्हर ठेवतात पण पगार वेळेत देताना त्यांचा हात आखडता होतो.

त्यांच्यासाठी काम करणारे स्पॉट बॉय, ड्रायव्हर ही मंडळी रात्री उशिरा शूटिंग संपल्यावर घरी जाणार कधी आणि पुन्हा सकाळी लवकर येणार कशी,याचा विचार करून रिक्षा, टॅक्सी साठी पैसे देण्याचं जाणून बुजून विसरतो (निमात्याकडून स्पॉट बॉय, ड्रायव्हर यांच्या नावावर वेगळे पैसे घेतले जाऊन सुद्धा)

ही आणि अशी अनेक उदाहरणे या इंडस्ट्री मधील देता येतील.पण संवेदनशील कलाकार या सगळ्या गोष्टींकडे डोळेझाक करून जिथं गरज आहे तिथं श्रीमुखात लावून देण्यासाठी का पुढं येत नाही???

टीप – वरील लेखातील घटना,गोष्टी  काहींच्या व्यक्तीगत आयुष्याशी संबंधित वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजूच नये, मी आतापर्यंत चोवीस वर्षे क्षेत्रात काम करीत असताना आलेल्या अनुभवातून आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या सत्य घटना यांच्या आधारावर हे मत मांडले आहे.

 लेखक : महेश टिळेकर ( लेखक प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक आहेत.)  

52522712 1290746144399950 4769680023953080320 o
लेखक महेश टिळेकर एका कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत व रेखा यांच्यासमवेत. 
Leave A Reply

Your email address will not be published.