चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग गेल्या दीड वर्षांपासून दुनियेसमोर आलेले नाहीत

जगभरात कोरोनानं थैमान घातल्यानंतर सगळ्यांचं लक्ष चीनकडे गेलं होतं. कोरोनाचा प्रसार नक्की चीनमधून झाला की नाही? यावर बराच खल झाला. पार जगातल्या मोठमोठ्या गुप्तचर यंत्रणांनीही याचा तपास करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना ठोस काही सापडलं नाही. आता चीन पुन्हा एकदा चर्चेत आलंय आणि त्यामागचं कारण आहेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग.

आता टायटल वाचून तुम्हाला वाटलं असेल की, जिनपिंग भाऊ अंडरग्राऊंड झाले बिले काय. पण नाय नाय, तसं नाय. भाऊ आहेत, फक्त मीडियासमोर येत नाहीत. सध्या पडद्यामागून सूत्रं हलवण्यातच त्यांना जास्त इंटरेस्ट आहे.

आता नक्की विषय काय झालाय?

जागतिक नेत्यांची COP-26 परिषद नुकतीच पार पडली. त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि जगभरातले अनेक दिग्गज नेते सहभागी झाले होते. यात शी जिनपिंगही सहभागी होणार होते; मात्र ते अनुपस्थित राहिले. ते व्हर्च्युअली या परिषदेत सहभागी होतील, असं सांगण्यात आलं, मात्र तिथंही त्यांनी कल्टी दिली.

आयोजकांना वाटलं आपलं काय चुकलं-बिकलं नाही ना? म्हणून त्यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला याबाबतीत विचारणा केली. तेव्हा त्यांनी आम्हाला परिषदेसाठीची लिंकच मिळाली नाही, असं सांगितलं. पण नंतर असं लक्षात आलं की चीन रीतसर खोटं बोलतंय, कारण लिंक तर पाठवण्यात आली होती.

लास्ट टाईम बीजिंगच्या बाहेर कधी दिसले होते जिनपिंग?

१८ जून २०२० ला जिनपिंग यांनी म्यानमारला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी म्यानमारच्या लष्करी नेत्यांची भेट घेतली. तेव्हापासून जिनपिंग यांनी बीजिंग सोडले नाही. गेल्या महिन्यात सीएनएननं त्यांच्याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न मेलद्वारे केला होता, मात्र त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही.

जिनपिंग आधी फार फिरायचे का?

तर उत्तर आहे हो. बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांपेक्षा जास्त विदेश दौरे जिनपिंग यांनी केले आहेत. पण हे सगळं कोरोनाचं थैमान सुरू होण्याच्या आधी. तेव्हा जिनपिंग यांनी वर्षभरात १४ दौरे करत, जवळपास ३४ दिवस विदेशात घालवले. कोरोनानंतर मात्र त्यांच्या विदेश दौऱ्यांना ओहोटी लागली.

फोनवरून सूत्रं हलतायत भिडू

आता जिनपिंग चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत म्हणल्यावर एकदमच निवांत बसून चालणार नाही. बाहेर पडत नसले, तरी चीनचे परराष्ट्रीय संबंध मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. तालिबानसोबत संवाद साधण्यासाठी चीननं रशिया आणि पाकिस्तानच्या साथीनं भरपूर प्रयत्न केले.

युरोपियन नेत्यांसोबतच्या अनेक व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये जिनपिंग सहभागी झाले, ज्यात जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मॉर्केल, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा समावेश होता. जिनपिंग यांनी जी-20 परिषदेत व्हिडिओद्वारे संवाद साधला होता. त्यामुळं थोडक्यात जिनपिंग सध्या फोनवरून सूत्रं हलवण्यावर भर देत आहेत.

जिनपिंगना टेन्शन तरी नक्की कसलंय?

आंतरराष्ट्रीय स्टेजवर दिसत नसल्यानं जिनपिंग यांच्या प्रकृतीबाबत ही चिंता व्यक्त केली जातीये. सोबतच जिनपिंग चीनच्या इंटर्नल राजकारणात जास्त रस घेत आहेत. मेन विषय असाय की, पुढच्या वर्षी चीनच्या सत्ताधारी पक्षाची महत्त्वाची बैठक आहे. त्या बैठकीत जिनपिंग आगामी पाच वर्षांसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष असणार का नाही यावर खल होणं अपेक्षित आहे. आपली खुर्ची सांभाळण्यासाठी जिनपिंग प्रयत्नशील आहेत. त्यामुळं त्यांची सगळी एनर्जी अंतर्गत राजकारणात खर्ची होत असल्यानं ते बाहेर फारसे दिसत नाहीत, असं तज्ञांचं मत आहे.

आता जिनपिंग कधी जगासमोर येतात आणि काय सांगतात? याकडं सगळ्याच राष्ट्रांचं लक्ष लागलेलं असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.