ज्यांनी जगनमोहन रेड्डींना जिंकून आणलं…आज त्याच केसीआर सरकारला जड जातायेत

पेपरफुटी घोटाळ्याच्या चौकशी दरम्यान वायएसआर तेलंगणा पक्षाच्या नेत्या वाय एस शर्मिला यांनी तेलंगणा पोलिसांना मारहाण केल्याची बातमी आली.

नेमकं काय प्रकरण आहे ?

१२ मार्च रोजी तेलंगणा राज्य लोकसेवा आयोग (TPSSC) द्वारे घेण्यात आलेल्या भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तेलंगणामध्ये व्यापक निषेध नोंदवण्यात आला होता.

पेपरफुटी घोटाळ्याच्या निषेधार्थ चौकशी करताना वायएसआर तेलंगणा पक्षाच्या नेत्या वाय एस शर्मिला यांनी तेलंगणा पोलिसांना मारहाण केली. अहवालानुसार, शर्मिला कथित पेपर लीक प्रकरणाची चौकशी करणार्‍या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कार्यालयाकडे जात असताना पोलिसांनी त्यांना सोमवारी दुपारी एसआयटी कार्यालयात येण्यापासून रोखले. वायएस शर्मिला वाहनातून खाली उतरल्या आणि त्यांनी एका पोलिसाशी वाद घालायला सुरुवात केली. बघता बघता त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला चापट मारली आणि ढकलण्यास सुरुवात केली. इतर पोलीस कर्मचार्‍यांनी शर्मिलाला रोखून तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तरीही वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

अशा वादात पडण्याचा वाय एस शर्मिला यांची ही पहिलीच वेळ नाही. जाणून घेऊया, वाय एस शर्मिला यांची राजकीय कारकीर्द आणि त्यातून उद्भवलेले अनेक वाद.

कोण आहेत वाय एस शर्मिला?

शर्मिला या राजशेखर रेड्डी आणि वाय.एस. विजयम्मा यांची मुलगी असून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांच्या बहीण म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी यापूर्वी वायएसआर काँग्रेस पार्टी (YSRCP) साठी पक्ष संयोजक म्हणून काम केले आहे. जून २०१२ पूर्वी शर्मिला कधीच राजकारणात आल्या नव्हत्या.

त्या वर्षी, त्यांनी त्यांच्या भावासाठी म्हणजेच जगन मोहन रेड्डी यांच्यासाठी प्रचार केला. जेंव्हा ते डझनभर मालमत्तेच्या प्रकरणांमध्ये तुरुंगात होते. जगन मोहन रेड्डी यांच्या अनुपस्थितीत शर्मिला यांनी आंध्र प्रदेशातील १८ विधानसभा आणि एका लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचार केला.

YSR काँग्रेसने त्यावेळी निवडणुकीत १५ विधानसभा आणि नेल्लोर लोकसभा मतदारसंघ जिंकले होते. त्यानंतर, त्यांनी ३००० किमीचे वॉकथॉन ‘मरो प्रजा प्रतिष्ठानम’ चालू केले होते – अशीच १६०० किमी लांबीची पदयात्रा २००३ मध्ये शर्मिला यांच्या दिवंगत वडिलांनी काढली होती. प्रचारादरम्यान, सार्वजनिक सभांमध्ये शर्मिला यांचे प्रचंड जनसमुदायाने स्वागत केले.

आपल्या वडिलांचा ट्रेडमार्क असलेल्या डावा हात वर उंचावून अभिवादन करण्याच्या स्टाईलने त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. जगनमोहन यांची तुरुंगातून सुटका झाली आणि शर्मिला यांनी यात्रा थांबवली.  जगनमोहन यांनी २०१३ मध्ये त्यांनी स्वतःची यात्रा सुरू केली.

मग आल्या २०१९ च्या विधानसभा निवडणूका. यावेळेसच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा एकदा YSR काँग्रेससाठी ११ दिवसांची बस यात्रा काढली.  त्या वर्षीच्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. वाय.एस. जगन मोहन मुख्यमंत्री पदावर बसले.

पण सत्तेत येताच बहीण -भावांमध्ये मतभेद निर्माण झाले. 

२०१९ च्या निवडणुकीत चंद्राबाबू नायडूंचा पराभव केल्यानंतर, जगन मोहन रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि शर्मिला व त्यांची आई यांचे महत्त्व कमी होऊ लागले.

फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांनी कबूल केले की त्यांच्यात आणि भाऊ जगन मोहन रेड्डी यांच्यात “राजकीय मतभेद” आहेत. नंतर, जगन मोहन रेड्डी यांचे मुख्य सल्लागार आणि YSR काँग्रेसचे सरचिटणीस सज्जला रामकृष्ण रेड्डी यांनी सांगितले की दोघांनी मतभेद सोडवले आहेत.

तरी देखील शर्मिला यांनी ८ जुलै रोजी वडील वायएस राजशेखर रेड्डी यांच्या जयंती दिनी तेलंगणात वायएसआर तेलंगणा पार्टी (YSRTP) नावाचा स्वतःचा पक्ष सुरू केला. एका वर्षानंतर, त्यांची आई विजयम्मा यांनी, तेलंगणातील शर्मिला यांच्या वायएसआर तेलंगणा पक्षाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी YSR काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

आत्ता हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं कि शर्मिला यांची चौकशी का सुरु आहे ? ते प्रकरण काय आहे ?

नोव्हेंबर २०२२ मध्ये वाय एस शर्मिला यांना पदयात्रेच्या वेळी तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात त्यांचा पक्ष आणि सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीच्या समर्थकांमध्ये संघर्ष झाला आणि त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या पदयात्रेदरम्यान शर्मिला यांनी टीआरएसचे खासदार पेड्डीरेड्डी सुदर्शन रेड्डी यांच्यावर लोकांकडून पैसे उकळणे, जमीन बळकावणे आणि कंत्राटदारांना धमकावणे असे आरोप केले होते.

पेड्डीरेड्डी सुदर्शन रेड्डी यांच्या कार्यकर्त्यांनी शर्मिला यांच्या ताफ्याला टार्गेट केले आणि शर्मिला यांच्या एका बसला आग लावली होती. त्यांच्या पक्षातील काही नेत्यांच्या गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. परिणामी दोन गटात वाद निर्माण झाले आणि पोलिसांनी वाय एस शर्मिला यांना अटक केली.

यात आणखी एक वाद म्हणजे, तेलंगणा हे अफगाणिस्तान आणि के चंद्रशेखर राव हे तालिबान आहेत असं विधान शर्मिला यांनी केलेलं त्यावरून त्या त्या अडचणीत सापडल्या होत्या.

फेब्रुवारी २०२३ मध्ये महबूबाबाद येथील ‘प्रजा प्रस्थानम’ पदयात्रेच्या वेळी बीआरएस आमदार बनोथ शंकर नाईक यांच्यावर अपमानास्पद टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली त्यांना पुन्हा अटक करण्यात आली होती. “बीआरएस आमदार बनोथ शंकर नाईक यांनी माझा अपमान केला. मी त्यांच्या बेकायदेशीर जमीन व्यवहारांची चौकशी केली. त्यांनी मला नपुंसक म्हटले.आणि जेव्हा आम्ही आवाज उठवला तर आम्हाला अटक करण्यात आली. एका महिलेने जनतेचे प्रश्न सोडवण्यास पुढाकार घ्यावा हे काही लोकांना बघवत नाही. काहींनी मला बांगड्या भेट देतो म्हणून हिणवले”, असा शर्मिला यांचा सत्ताधारी पार्टीच्या आमदारांवर आरोप आहे. हा आरोप करताना त्यांनी “तेलंगणा हे अफगाणिस्तान आहे आणि के चंद्रशेखर राव हे तालिबान आहेत असं विधान केलेलं.

आत्ताचं प्रकरण काय आहे ज्यावरून त्या अडचणीत आल्या आहेत ?

तर १२ मार्च रोजी तेलंगणा राज्य लोकसेवा आयोग (TPSSC) द्वारे घेण्यात आलेल्या भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तेलंगणामध्ये व्यापक निषेध नोंदवण्यात आला होता. त्यात शर्मिला या सर्वात समोर होत्या. पेपरफुटी प्रकरणी, तेलंगणात लोकशाही नसल्याचा आरोप शर्मिला यांनी केला. जर मुख्यमंत्री प्रामाणिक असतील तर त्यांनी पेपरफुटीच्या संदर्भात सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत, असे सूचक विधान त्यांनी केले.

थोडक्यात शर्मिला यांची अटक, त्यानंतर मिळालेला जामीन. हे संपूर्ण प्रकरण काय वळण घेते लवकरच कळेल.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.