याह्या खानने गाडीचे १००० रुपये दिले नाहीत आणि त्याला अर्धा देश देऊन किंमत चुकवावी लागली..

सॅम बहादूर उर्फ भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ. गोरापान शिडशिडीत देह, चेहर्‍यावर पिळदार मिश्या अणि प्रसन्न भाव. हा रूबाबदार मिलिटरीचा अधिकारी भेटेल त्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव टाकत असे. त्यांच्यात हजरजबाबीपणा ही कमालीचा होता. त्यांना कोणीतरी विचारले तुम्ही फाळणीत पाकिस्तानात गेला असता तर काय झाले असते? ते म्हणाले,

” मग १९७१ चं युद्ध पाकिस्तानने जिंकले असते .”

अशक्य हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नव्हता. ते रणांगणात निडर सेनानी तर होतेच पण रणांगणाबाहेर देखील त्यांचं धाडस आणि दिलदार वृत्ती  खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी यांना बांगलादेश युद्धावेळी आपली कठोर मते सुनवायला ते मागे पुढे पाहत नसत.

एका उच्चशिक्षित सुसंस्कृत पारशी कुटूंबात सॅम माणेकशॉ यांचा जन्म झाला. त्यांचे वडील ब्रिटिश आर्मीमध्ये डॉक्टर होते. सॅम लहानपणापासून खेळात व अभ्यासात सर्वात पुढे तर होतेच पण शाळेतील सर्वात दंगेखोर मुलांमध्ये त्यांचा समावेश असायचा.सॅम माणेकशॉ यांना केंब्रिज विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती पण वडिलांच्या सांगण्यानुसार ते भारतात थांबले व अत्यंत कमी वयात आर्मी जॉईन केली.

भारतीय मिलिटरी अकॅडमी मधून पास होणारे ते पहिल्या बॅचचे विद्यार्थी.

सॅम माणेकशॉ दुसऱ्या महायुद्धात कॅप्टनच्या हुद्यावर असताना बर्मा येथील सिटांग नदीच्या मोहिमेवर होते. येथे झालेल्या लढाईत ब्रिटीश लष्कराने नुकसान सोसूनही मोहिम फत्ते पाडली. येथे असलेल्या पॅगोडा हिल्सवर ब्रिटीश सेना ताबा मिळवताना माणेकशॉ गंभीर जखमी झाले. त्यांची जगण्याची शक्यता कमीच होती मात्र तरीही तीव्र इच्छा शक्तीच्या बळावर ते वाचले.

रॉयल इंडियन आर्मीमध्ये असताना पासूनच त्यांच्या पराक्रमाचा दबदबा सर्वत्र पसरला होता.

दुसऱ्या महायुद्धानंतर भारतातील स्वातंत्र्याची चळवळ तीव्र झाली. ब्रिटिशांना जाणीव झाली की हा देश सोडायची वेळ जवळ आली आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जाऊ लागली.

त्यावेळी ब्रिटिश आर्मीचे भारतातले प्रमुख होते जनरल क्लॉड जॉन आयर ऑचिनलेक. ब्रिटनचे सेनापती म्हणून त्यांनी अनेक युद्धे गाजवली होती. अशा या अनुभवी योद्ध्याकडे भारताच्या स्वातंत्र्यावेळी लष्कर सोपवण्यात आलं होतं. तेव्हा त्यांच्या ऑफिस मध्ये दोन तरुण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.

एक होते सॅम माणेकशॉ आणि दुसरे होते आघा मोहम्मद याह्या खान. दोघेही मेजर दर्जाचे अधिकारी. पुढे जाऊन आपल्या आर्मीच नेतृत्व करण्याची क्षमता दोघांमध्ये देखील होती. त्यांना लेफ्टनंट कर्नल पदी बढती देण्यात आली होती आणि ऑचिनलेक यांच्या हाताखाली रणनीती शिकायची संधी त्यांना मिळाली.

दोघेही या काळात चांगले मित्र झाले. कुठेही जाताना ते एकत्रच असायचे. त्याकाळात सॅम माणेकशॉ यांच्याकडे एक लाल रंगाची जेम्स मोटरबाइक होती. ती गाडी दिसायला प्रचंड देखणी होती. त्या गाडीवर बसून आपल्या कडक मिलिटरी युनिफॉर्ममध्ये ऑफिसला येणाऱ्या माणेकशॉ यांचा रुबाबच काही और असायचा.

याह्या खान यांना ही गाडी  खूप आवडायची. ते बऱ्याचदा सॅम माणेकशॉ यांना तस बोलून देखील दाखवायचे. याह्या खान यांची भुणभुण ऐकून कंटाळलेल्या सॅम माणेकशॉ यांनी त्यांना आपली बाईक विकत देऊ केली. याह्या खान तयार झाले. १००० रुपये गाडीची किंमत ठरली.

याह्या खान यांनी ती गाडी आपल्या ताब्यात तर घेतली पण त्यांनी पैसे द्यायच्या आधी भारताची फाळणी झाली. वायव्येकडील पंजाब, सिंध, बलुचिस्तान ही राज्ये आणि पूर्वे कंदील बंगालचा काही भाग हा मुस्लिम लोकसंख्येचा प्रदेश पाकिस्तान या देशात रूपांतरित होणार असं ठरलं.

१५ ऑगस्ट १९४७ साली हे दोन देश स्वतंत्र झाले, वेगवेगळ्या प्रदेशांसोबत दोन्ही देशांच्या सैन्याची देखील विभागणी झाली. याह्या खान पाकिस्तानला गेले तर सॅम माणेकशॉ यांची बटालियन पाकिस्तानच्या वाटणीला जाऊनही माणेकशॉ भारतातच थांबले.

या सगळ्या गडबडीत याह्या खान यांनी त्या लाल जेम्स मोटारसायकलीचे पैसेच सॅम माणेकशॉ यांना दिले नाहीत.

पुढे दोघेही आपापल्या देशात मिलिटरीचे आधारस्तंभ बनले. सॅम माणेकशॉ यांना १९६९ साली भारताचा लष्करप्रमुख बनवण्यात आलं. याच काळात याच्या खान देखील पाकिस्तानचे लष्करप्रमुख बनले होते. इतकंच नव्हे तर पाकचे लष्करशहा अयुब खान यांच्या निवृत्तीनंतर तिथल्या राष्ट्रपती पदाची देखील जबाबदारी घेतली.

सत्तेत आल्या आल्या त्यांनी पाकिस्तानमध्ये मार्शल लॉ पुकारला. एकप्रकारे त्यांची हुकूमशाही राजवट लागू झाली. 

त्यांच्या राजवटीमध्ये पूर्व पाकिस्तानमधील अत्याचार वाढले. तिथल्या बंगाली भाषिकांवर पश्चिम पाकिस्तानी भूमीतून दडपण्याचं धोरण राबवण्यात येत होतं. भारतात येणाऱ्या बंगाली लोंढ्यांचा दबाव वाढला. या अत्याचाराला आळा घालण्यासाठी इंदिरा गांधींनी वेगळा बांगलादेश बनवण्याचा निर्णय घेतला.

१९७१ सालचे सुप्रसिद्ध भारत पाकिस्तान युद्ध लढले. लष्कर प्रमुख सॅम मानेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जवानांनी पाकिस्तानला धूळ चाखली. तिथल्या तब्बल ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांना युद्धकैदी ताब्यात घेण्यात आलं. पाक अधिकाऱयांनी गुडघे टेकून शरणागतीच्या जाहीरनाम्यावर सही केली.

या विजयाचे शिल्पकार सॅम मानेकशॉ यांना पंतप्रधान इंदिरा गांधींनी फिल्ड मार्शल ही सर्वोच्च पदवी देऊन सन्मान केला. तर तिकडे पाकिस्तानमध्ये अपयशाचे धनी झालेले याह्या खान राष्ट्रपती पदावरून अपमानित होऊन पायउतार झाले.

निवृत्तीनंतर एकदा एका मुलाखतीमध्ये सॅम माणेकशॉ यांना याह्या खान आणि १९७१ च्या युद्धाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा हजरजबाबी असणाऱ्या माणेकशॉ यांनी आपल्या खुमासदार शैलीत उत्तर  दिलं,

“याह्या खान यांनी माझ्या मोटारसायकलीचे १००० रुपये बुडवले होते, त्यांच्या देशाचे दोन तुकडे करून त्याची किंमत चुकवली.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.