एसटी स्टँडवर मिळणाऱ्या यळगुड दुधाने गेल्या ५० वर्षात स्वतःचा ब्रँड निर्माण केलाय.

नव्वदच्या दशकात सांगली कोल्हापूरकडचे लोक पाव्हन्यांच्याकडे निघाले की एसटी स्टँडवरच्या दुकानात ब्रेड घेतला जायचा.

निळ्या कागदात गुंडाळलेला तो चेरी वाला गोड ब्रेड, दुधाची घागर तोंडाला लावून पिणाऱ्या हनुमानाच चित्र आजही डोळ्यासमोर उभं राहतं.

यळगुडचा तो सहकार ब्रेड जगप्रसिद्ध होता.

कोल्हापूर जिल्हयात हातकणंगले तालुक्यात यळगुड हे छोटंसं गाव. कर्नाटक सीमा अगदी जवळ असल्यामुळे गावात कन्नड भाषिकांची देखील संख्या भरपूर. गावाच्या नावाचा कानडी अर्थ म्हणजे सात टेकड्यांचं गाव.

पूर्वी महाराष्ट्र दुधासाठी गुजरातवर अवलंबून असायचा. अमूलची निर्मिती १९४६ मध्ये झाली. अख्ख्या मुंबईला दूध अमूलकडून यायचे. तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात एकच राज्य होते.

मोरारजी देसाई सारखे गुजरातचे तत्कालीन नेते महाराष्ट्रात दुग्धउद्योग रुजू देत नव्हते.

साधारण १९५८ साली यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्रीपदी आले आणि महाराष्ट्राला दुधासाठी स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न सुरू झाले. यशवंतरावाना ठाऊक होत की,

जोवर मुंबईला दूध आपल्या ग्रामीण भागातुन पोहचत नाही तोपर्यंत आपला शेतकरी गरिबीतून बाहेर येणार नाही.

१ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यावर तर या गोष्टीला वेग आला. यशवंतराव चव्हाणांच्या आग्रहामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अद्यावत शासकीय दुग्धालयाची निर्मिती १९६३ साली झाली.

कृष्णापंचगंगेच्या पाण्यामुळे कोल्हापूर जिल्हा सुपीक होता.

गुरांना चारापाण्याची वानवा नव्हती. शेतकऱ्यांनी जीवापाड जनावरे सांभाळली होती.

गावागावातील तरुण एकत्र येऊन जिद्दीने दूध संकलन सुरू केलं. कोणाचं दूध संकलन जास्त याच्या स्पर्धा लागल्या प्रमाणे होऊ लागलं.गोकुळ दूध पाठोपाठ तात्यासाहेब कोरे यांच्या वारणा दूधची निर्मिती झाली.

विकासाची दूधगंगा कोल्हापूर जिल्ह्यात वाहू लागली.

यळगुड गावातही दूध संकलन जोरात होतं. १४ जुलै १९६७ रोजी गावचे तरुण ग्राम दैवत हनुमानाच्या मंदिरात गोळा झाले. विषय होता सहकारी संस्था स्थापन करण्याचा.

गावचे तरुण सरपंच वसंतराव मोहिते हे कोल्हापूरच्या शेतकरी सहकारी संघात कार्यरत होते. विना सहकार नाही उद्धार हे त्यांना पटलेलं होत.

यातूनच श्री हनुमान दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्था मर्यादित यळगुडची स्थापना झाली.

१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून दूध संकलनास सुरवात केली.

अगदी सुरवातीपासूनच संस्थेचे कामकाज अत्यंत शिस्तबद्धरित्या चालवलं. उत्पादकांना त्यांनी दिलेल्या दुधाचा मोबदला अगदी वेळेवर दिला. सभासदांना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून जातिवंत जनावरे पुरविली.

दुभत्या जनावरांचा उपचार, कृत्रिम गर्भधारणा, देखभालीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक केली.

शासकीय योजना आणल्या आणि त्या काळजीपूर्वक राबवल्या. याचाच परिणाम थोड्याच कालावधीत संस्थेच्या कामात लक्षणीय प्रगती झाली. आसपासच्या खेड्यातून येणार रोजचं दूध संकलन 15000 लिटर पर्यंत पोहचल.

भविष्यात जादाच्या संकलित झालेल्या दुधाच्या विल्हेवाटीचा प्रश्न येऊ नये म्हणून दुधापासून दुग्धजन्य पदार्थ व बेकरी पदार्थ उत्पादन सुरू करण्याचा दूरदृष्टीचा निर्णय मोहिते साहेबांनी घेतला.

मग निर्मिती झाली यळगुड सहकार बेकरीची.

तोवर गावोगावी सायकलवरून पाव विकणारे पठाण किंवा शहरात बेकरी उघडलेले केरळी लोक एवढेच या उद्योगात होते. यळगुडच्या सहकारी संस्थेची शिस्त या बेकरी उद्योगातही सांभाळली गेली.

यळगुडचे उच्च प्रतीचे पदार्थ कोल्हापूर व आसपासच्या शहरात प्रचंड फेमस झाले. दूध डेअरीच्या माध्यमातून बेकरी उद्योग सुरू करण्याचा प्रयोग बहुदा पहिल्यांदाच केला गेला असावा.

यळगुडचे पेढे, बर्फी, गुलाबजाम, बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड इ. दुग्धपदार्थ व मिल्कब्रेड,बिस्किटे, खारी,टोस्ट,बनपाव, नानकटाई, केक इत्यादी बेकरी प्रोडक्ट आकर्षक पॅकिंग करून विकला जाऊ लागला.

कोल्हापूर स्टँडवर संस्थेच स्वतःच विक्रीकेंद्र सुरू केलं.

ते तुफान चाललं. तिथून पश्चिम महाराष्ट्राच्या प्रत्येक मोठ्या शहरात एसटी स्टँडवर यळगुडची सहकार बेकरी सुरू झाली. प्रत्येक गावात हनुमान शिक्क्याचे प्रॉडक्ट मिळू लागले.

कोणत्याही हायवे, रेल्वेस्टेशन वर नसलेलं चारपाच हजार लोकसंख्या असलेल सीमा भागातलं अतिशय छोटंसं यळगुड गाव

महाराष्ट्राच्या नकाशावर ठळक झाल ते त्यांच्या उच्च प्रतीच्या प्रॉडक्टमूळ.

कठोर निष्ठेच्या व प्रामाणिकपणाच्या पायावर उभा असलेला सहकारी संघ असल्यामुळे कधी पैसे कमवण्यासाठी कसल्याही तडजोडी केल्या नाहीत, इतर बेकऱ्यांच्या जीवघेण्या स्पर्धेत उतरले नाहीत.

क्वालिटीची माऊथ पब्लिसिटी सोडता कधी इतर प्रकारचं मार्केटिंग करायची गरज देखील पडली नाही आणि म्हणूनच गेली पन्नास वर्षे यळगुडचे प्रॉडक्ट्स स्वतःच एक ब्रँड बनलाय.

त्यांच्या छोट्या बाटलीत मिळणाऱ्या सुगंधी दुधाची चव अमूल सोडाच पण कोणत्याही आंतरराष्ट्रीय ब्रँडला देखील मिळणार नाही.

अजूनही मध्यवर्ती बसस्थानकावर असलेल्या यळगूड शॉपीमधून मिल्क ब्रेड घेऊन पश्चिम महाराष्ट्रासह, बेळगाव, मुंबई, पुण्यात विक्री होते. रोज सहा हजारांवर ब्रेड निर्मिती होते. नानकटाई, बनपाव, केक, खारी, बटर तसेच इतर उत्पादने मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जातात.

कार्यकारी संचालक सुजितसिंह मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आज संस्थेला अन्न सुरक्षा प्रणालीअंतर्गत ‘एफएसीसी २२०००’ हे सर्वोच्च मानांकन मिळाले आहे.

शिवाय सहकारमहर्षी आणि कृषिभूषण सारखे १५ ते २० पुरस्कार या संस्थेला मिळाले आहेत.  

हे पुरस्कार तर आहेतच पण कोल्हापूर सारख्या गावात यळगुडच सुगंधी दूध पिण्यासाठी म्हणून स्टँडवर दररोज चक्कर मारणाऱ्याची संख्या ही त्यांच्या कामाची खास पावती आहे.

पुण्यामुंबईला राहणाऱ्या सांगली कोल्हापूरकरांच्या जिभेवर यळगुड दुधाच्या    नॉस्टॅल्जिक आठवणी रेंगाळत असतात हे नक्की.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.