हिरोईन नाही म्हणाली पण सिन खरा दिसावा म्हणून खुद्द यश चोप्रांनी हिरोची पप्पी घेतली.

कधी कधी वाटतं रोमँटिक सिनेमाचे बादशाह म्हणून यश चोप्रा यांना ओळखलं जातं. भारतीय सिनेसृष्टीला यश चोप्रा यांनी उत्तम आणि दर्जेदार प्रेमकथा दिल्या आहेत हे अगदी खरं आहे. परंतु याच यश चोप्रांनी “काला पत्थर”, “दिवार” सारखे अजरामर आणि अगदी वेगळ्या कथानकाचे सिनेमे दिग्दर्शित केले.

कलाकार एकाच भूमिकांच्या साच्यात अडकु शकतो. तसंच दिग्दर्शक सुद्धा एकाच पठडीतले सिनेमे देण्यासाठी ओळखला जाऊ शकतो. जसं की, गुन्हेगारी जगतावर सिनेमे बनवणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये राम गोपाल वर्मा आणि अनुराग कश्यप यांना ओळखलं जातं.

Director Is The Captain Of The Ship असं म्हटलं जातं. सेटवर शूटिंग सुरू असताना अनेक माणसांची रेलचेल असते. परंतु जेव्हा दिग्दर्शक रोल, कॅमेरा, साऊंड अशा सूचना करतो तेव्हा सेटवर एकदम चिडीचूप वातावरण होतं. सगळा कोलाहल क्षणार्धात शांत होतो. सिनेमाचा छोटासा प्रसंग सुद्धा पडद्यावर सुंदर दिसावा, म्हणून दिग्दर्शक शेवटपर्यंत मेहनत घेत असतो.

या सर्व गोष्टींचं एक उत्तम उदाहरण म्हणजे यश चोप्रा यांच्या आयुष्यात घडलेला हा किस्सा.

यश चोप्रा साहीर लुधीयानवी यांची एक कविता वाचत होते. ती कविता वाचता वाचता त्यांना सिनेमाची कल्पना सुचली. आणि मग यश चोप्रांनी सिनेमा बनवायला घेतला. या सिनेमाचं नाव ‘कभी कभी’. या सिनेमाचा बहुतांश भाग काश्मीर येथे शूट झाला आहे. त्यावेळी एका मुलाखतीत यश चोप्रांनी या गोष्टीचा उल्लेख करताना सांगितलं,

‘काश्मीर मध्ये शूटिंग करताना आलेला अनुभव हा संस्मरणीय होता. आम्ही सर्वजण जणू काही काश्मीर ला हनिमून ला गेलो होतो.

कभी कभी च्या शूटिंगला सुरुवात होण्याआधी अभिनेत्री राखीने गुलजार साब शी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर राखी ने सिनेमात काम करू नये, अशी गुलजार साब ची इच्छा होती. परंतु यश चोप्रांनी गुलजार यांच्याशी बोलून त्यांची मन वळवणी केली.

आणि राखी यांचा कभी कभी सिनेमात काम करण्याचा मार्ग मोकळा झाला.

कभी कभी चं शूटिंग सुरू झालं. शशी कपूर, राखी, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, नीतू सिंग, वहिदा
रेहमान असे तगडे कलाकार या सिनेमात होते. सिनेमात एक प्रसंग असा होता जेव्हा यश चोप्रा यांना सिनेमाचं टायटल साँग शूट करायचं होतं. हा प्रसंग राखी आणि शशी कपूर यांच्यावर शूट होणार होता.

राखी आणि शशी कपूर यांच्या मधुचंद्राचा सिन होता. यश चोप्रा यांची इच्छा होती की, राखी आणि शशी कपूर यांच्यामध्ये लीपलॉक व्हावा. परंतु राखीने लिपलॉक करायला स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला. इतकंच काय, मी शशी कपूर यांच्या गालावर सुद्धा किस करणार नाही, असं राखी ने आधीच स्पष्ट केलं.

आत्ता स्वतः हिरोईन नकार देतेय म्हटल्यावर यश चोप्रांनी हा विषय जास्त ताणला नाही.

त्यांनी राखी आणि शशी कपूर यांचा मधुचंद्राचा सिन शूट केला. या सिन नंतर सकाळचं एक दृश्य होतं. या दृश्यात शशी कपूर यांच्या गालावर लिपस्टिकचा डाग असणार होता. लिपस्टिकचं निशाण सुद्धा उमटवायला राखीने नकार दिला.

लिपस्टिकचं निशाण ही प्रसंगाची गरज होती. वेळ दवडला तर शूटिंगला उशीर होईल, हे त्यांच्या लक्षात आलं. यश चोप्रांनी मेकअप आर्टिस्टला बोलावलं.

“माझ्या ओठांवर गडद अशी लाल रंगाची लिपस्टिक लाव”

असं यश चोप्रांनी मेकअप आर्टिस्टला फर्मावलं. लिपस्टिक लावून त्यांनी शशी कपूर यांना बोलावलं. आणि यश चोप्रांनी शशी कपूर यांच्या गालावर किस करून लिपस्टिकचा डाग उमटवला. यश चोप्रा यांना सिन साठी जी गोष्ट हवी होती, ती मिळाली. आणि पुढे राखी आणि शशी कपूर यांना बोलावून मधुचंद्रानंतर होणाऱ्या सकाळचा सिन शूट करण्यात आला. यासाठी कॅमेरा टेक्निक वापरून हा अगदी खरा किस वाटेल त्याप्रमाणे जिवंत केला.

या सिन मध्ये शशी कपूर यांच्या गालावर लिपस्टिकचे डाग दिसतात.

केवळ  इतरांना आज्ञा करून सिनेमा शूट करणं, हे दिग्दर्शकाचं काम नाही. तर वेळप्रसंगी अडचणीच्या वेळी पुढाकार घेऊन ती अडचण सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं, हे सुद्धा दिग्दर्शक करू शकतो.. हे यश चोप्रांनी दाखवून दिलं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.