संरक्षणमंत्रीपदाची शपथ घेऊ नये म्हणून पटनाईक यशवंतरावांना दिल्लीत गंडवत होते पण शेवटी….

बनवाबनवी, गंडवागंडवी आणि लयच आपल्या गावठी भाषेत सांगायचं झालं तर, या बोटाचा थुक्का त्या बोटाला लावणारी माणसं राजकारणात लय आहेत. ज्याला हे जमत नाय त्याने राजकारण करू नये असा सल्ला दिला जातो. काही लोक म्हणतात, की हे सगळे प्रकार आत्ताच्या काळात वाढले, जूनी लोकं चांगली होती.

शंभर टक्के जूनी लोकं चांगली होती पण ती गंडवागंडवी करत नव्हती, फसवतच नव्हती अस म्हणणं सपशेल चुकीचं आहे. 

यशवंतराव चव्हाण आणि बिजू पटनाईक यांचा असाच एक किस्सा, हा किस्सा वाचला तर तुमच्या लक्षात येईल राजकारणातली बनवाबनवी किती टोकाची होती. 

तर झालेलं अस की चीनचं आक्रमण झालेल. चीन ने कुरापती काढल्यानंतर तत्कालीन संरक्षणमंत्री श्रीकृष्ण मेनन यांना राजीनामा द्यावा लागला होता आणि हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला होता. नवे संरक्षणमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात येणार होती. संपूर्ण महाराष्ट्र तेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या मागे उभा राहिलेला. पक्षभेद विसरून महाराष्ट्राचा माणूस दिल्लीच्या मदतीला जातोय म्हणून विरोधी पक्ष यशवंतरावांचे कौतुक करत होता. 

खुद्द आचार्य अत्रे देखील या कौतुकसोहळ्यात सहभागी होते. नेहमी यशवंतरावांवर टिकेचे आसूड ओढणारे अत्रे यशवंतरावांच कौतुक करत होते म्हणल्यानंतर एकूण परिस्थितीचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. 

आत्ता झालं अस की,

यशवंतराव संरक्षणमंत्री पदाची धुरा संभाळण्यासाठी दिल्लीला गेले.

दूसऱ्या दिवशी त्यांचा शपथविधी होता. चीन करत असणारी आगेकुच आणि रोज मिळणारी वाईट बातमी या पार्श्वभूमीतच त्यांचा शपथविधी होणार असल्याने म्हणावं अस आनंदाच वातावरण नव्हतं. 

यशवंतराव रात्रीच्या मुक्कामासाठी मोरारजी देसाई यांच्या बंगल्यावर गेले. रात्र झालेली आणि फोन खणखणला. फोनवर बिजू पटनाईक होते. ते यशवंतरावांना म्हणाले मला तातडीने तुम्हाला भेटायचे आहे. हो नाही असं उत्तर न ऐकताच ते रात्रीचे यशवंतरावांना भेटायला आले देखील. 

बिजू पटनाईक असे अचानक भेटायला का येत आहेत याचा विचार यशवंतराव करतच होते. पटनाईक यांच्या भेटीनंतर चार उत्साहाचे शब्द ऐकायला मिळतील. उद्याची चिंता थो़डीफार कमी होईल या विचारातच यशवंतराव होते तोच समोर बिजू पटनाईक आले. 

बिजू पटनाईक यशवंतरावांना भेटताच म्हणाले, 

तुम्ही इतक्या लांब दिल्लीला कशाला आला. चीनच सैन्य झपाट्याने पुढं सरकत आहे. कदाचित मुंबईला ही धोका निर्माण होऊ शकतो. तूम्ही अशा वेळी मुंबईतच हवा होतात. 

इतकं सांगून पुढचे तासभर बिजू पटनाईक कशा प्रकारे तुम्ही संरक्षणमंत्री म्हणून नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कामगिरी केली पाहीजे इथपासून ते चीनची भिती घालू लागले. अक्षरश: एखाद्या लहान मुलाला भूताखेतांच्या गोष्टी सांगतात अशा प्रकारे रात्री ते चीनची भिती घालू लागले.

वरकरणी भितीचा आव आणून तिखट मीठ लावून ते भिती निर्माण करत राहिले. या गोष्टींचा सार इतकाच होता की यशवंतरावांनी दिल्लीत येऊन संरक्षणमंत्रीपदाची शपथ घेऊ नये. त्यांनी आल्या पावली थेट परत जावं. यासाठी शक्य ते गंडवण्याचे प्रकार पटनाईक करत होते. 

पण यशवंतरावांची निती पटनाईकांपेक्षा काकणभर जास्त ठरली.

पहिल्या पंधरा मिनिटातच यशवंतरावांना पटनाईकांची चाल लक्षात आली.  पटनाईक स्वस्त: संरक्षणमंत्री पदासाठी इच्छुक असल्याने त्यांचे हे प्रयत्न चालू होते हे यशवंतरावांनी हेरलं आणि त्यांच्या हा मध्ये हा मिसळत कार्यक्रम सुरू ठेवला.

चीन आक्रमणाला आपल्या कल्पनाशक्तीने मुंबईपर्यन्त पोहचवूनच पटनाईक परतले. बरीच रात्र झाली होती. आत्ता सकाळ होण्याच्या मार्गावर होती. काही काळ झोपावं या विचारात यशवंतराव गादीला टेकले तोच पून्हा फोन खणखणला. 

तो फोन प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या बातमीदाराचा होता. तो म्हणाला मला फक्त यशवंतरावांशीच बोलायचं आहे. यशवंतराव फोनवर आले तेव्हा त्या बातमीदाराने बातमी दिली, 

चीनने युद्धबंदी जाहीर केली, तीही एकतर्फी. युद्ध संपले…!!! 

यशवंतरावांसाठी हा सुखद धक्का होता. अगदी दोन तासांपूर्वी पटनाईक मुंबईपर्यन्त चीनचे सैन्य घेऊन चालले होते आणि आत्ता ही बातमी.  आनंदोत्सव सुरू झाला. 

दूसरा दिवस उजाडला तो २१ नोव्हेंबर १९६२ ही तारीख घेऊन.

अगदी निराशेच्या काळात यशवंतरावांचा होणारा शपथविधी आत्ता उत्साहात साजरा होणार होता. सर्व भारतात आनंदोत्सव सुरू झाला. यशवंतरावांचा पायगुणच म्हणून कौतुक होऊ लागले. इथे मात्र यशवंतरावांना राहून राहून पटनाईकांची आठवण येत असावी.

मराठी माणसाला दिल्ली का जमत नाही याचं जिवंत कारणचं यशवंतरावांना एका रात्रीत शिकायला मिळालं होतं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.