चाकणमध्ये यशवंतरावांच्या गाडीवर शेतकरी आंदोलकांनी हल्ला केला होता अन्…

१९७२ हे ऐकताच तुमच्या डोक्यात पहिला काय येतं..?

दुष्काळ

बरोबर भिडू, १९७२ सारखा दुष्काळ महाराष्ट्रात कधीही झाला नव्हता असं जुनीजाणती माणसं सांगतात. शेतात पीक नाही, घरात धान्य नाही, जनावरांना पाणी नाही, हाताला काम नाही. अगदी सधनं सधन माणसं देखील या दुष्काळात कोलमडली होती तर कोरडवाहू शेतकऱ्यांच काय सांगावं.

अशातच दुष्काळातला उपाय म्हणून रोजगार हमी योजना राबवण्यात येत होती. दिवसभराच्या मजूरीसाठी १ रुपया २० पैसे मिळत. अगदी गावगाड्यातील सरंजामदार देखील रोजगार हमीच्या कामावर काम मागू लागले होते इतकी भीषण परिस्थिती होती.

आज ज्याप्रमाणे कोरोना, त्यात ओला दुष्काळ अशा संकटामुळे शेतकरी कोसळला होता तशीच किंबहुना त्याहून अधिक भयावह परिस्थिती तेव्हा होती. तेव्हा यशवंतराव चव्हाण केंद्रात अर्थमंत्री होते. परंतु राज्य सरकारच्या तिजोरीत तेव्हाही खडखडाटच होता.

आज ज्याप्रमाणे शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या समस्या पाहण्यासाठी दौरे आखत आहेत त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाणांनी देखील दुष्काळी कामांच्या पाहणीचा धावता दौरा आखला होता.

आज आखण्यात येणाऱ्या दौऱ्यांमध्ये आणि यशवंतरावांच्या दौऱ्यात मात्र एक महत्वाचा फरक होता, तोच फरक तुम्हाला आम्ही सांगणार आहोत.

विजय नहार यांनी लोकसत्तामध्ये लिहिलेल्या लेखामध्ये हे आंदोलन कशाप्रकारे झालं याचा उल्लेख केला आहे.

चाकण परिसरात हा दौरा होता. इकडे विजय नहार व सहकारी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धान्याचे प्रमाण वाढवावे, तुटपुंजी मजुरी वाढवून मिळावी, कामाचे पैसे दर आठवडय़ाच्या आठवडय़ालाच मिळावे, मिलोबरोबर गहू, साखर इ. मिळावे, धान्याचा काळाबाजार थांबावा यासाठी बैठका पार पाडत होते.

यशवंतराव चव्हाणांचा दौरा असल्याची माहिती मिळाल्यानंतर आपल्या मागण्यासंसाठी दुष्काळग्रस्तांनी रस्त्यावर उतरायाचे ठरविले.

दुष्काळी कामे लांब अंतरावर. यशवंतराव चाकणहूनच पुढे दावडी वगैरे भागातील दौऱ्यावर  जाणार होते. म्हणजे चाकणला सर्वांना जमवून आंदोलन उभा करणे सोईचे आणि आवश्यक होते. मजुरांना आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांना कळकळीचे आवाहन करण्यात आले.

मागण्यांची तड लावून घेतल्याशिवाय साहेबांची गाडी जाऊच द्यायची नाही अशा निर्धाराने ते जमणार होते.

इकडे आंदोलनाची बातमी पोलिसांच्या कानावर गेली.

त्यावेळी ग्रामीण भागाचे डीएसपी होते आर श्रीनिवासन आणि डीवायएसपी होते एस.एस विर्क. त्यांचे येणे-जाणे सुरू झाले. त्यांनी खोदून खोदून विचारले, किती निदर्शक जमतील? आंदोलकांनाही हा आकडा माहीत नव्हता. त्यांनी सांगितले कोणी येऊ अथवा न येऊ, आम्ही जे कार्यकर्ते तुमच्यासमोर बसलो आहोत एवढे तर नक्कीच असणार आहोत.

आंदोलनाची रूपरेषा विचारली तर सांगितले, आम्ही त्यांची गाडी अडवणारच आणि मागण्या-मान्य झाल्याशिवाय जाऊ देणार नाही.

अखेर दौऱ्याचा दिवस उजाडला!

आंदोलकांना निदर्शने आणि निवेदनासाठी जागा ठरवून देण्यात आली. ‘यशवंतराव चव्हाण मुर्दाबाद’ च्या घोषणा देण्याचेही ठरले.

५० पोलीस, काही अधिकारी व पोलीस व्हॅन्स तयार ठेवण्यात आल्या. गाडय़ा जायला आणखी दोन, तीन तास तरी होते. आंदोलकांना दिलेल्या जागेपासून थोड्या अंतरावर काँग्रेसजनांचा मोठा जथ्था साहेबांच्या स्वागतासाठी हारतुरे, ढोल-लेझीम घेऊन थांबला होता!

काही वेळातच त्या चौकात चारी बाजूंनी माणसे येऊ लागली. पाहता पाहता जमावाचा आकार वाढत गेला. आंदोलनासाठी तोबा गर्दी जमली. आणि परिस्थितीचा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनाही यायला वेळ लागला नाही.

परंतु तोपर्यंत गाड्या येण्याची वेळ झाली होती. हजारो लोकांना हटविणे आता पोलिसांना अशक्य होते आणि निदर्शनाला हिंसक वळण लागले तर हा प्रश्न होताच.

काही वेळातच चव्हाणांच्या गाड्यांचा ताफा आला. निदर्शक अक्षरश: रस्त्यावर झोपले. गाड्या पुढे जाण्याचा प्रश्नच नव्हता. स्त्रिया तर अधिक आक्रमक झाल्या होत्या.

त्यांच्यापुढचे रोटी-रोजीचे, अन्न पाण्याचे प्रश्न तीव्र होते. त्यातील काहींनी यशवंतरावांच्या गाडीकडे धाव घेतली. काहींनी दरवाजाला हात घालण्याचा प्रयत्न केला. तर काही गाडीच्या बॉनेटवर चढत होते.

पोलिसांनी आपापल्या अ‍ॅक्शन घेतल्या आणि परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाईल असे दिसून आल्याक्षणीच नहारांनी घोषणा दिली,

यशवंतराव चव्हाण झिंदाबाद!’

सारेच चक्रावून गेले. ‘मुर्दाबाद!’ सोडून ‘झिंदाबाद.’ सारेच अवाक् आणि स्तब्ध झाले. यशवंतराव सावकाशपणे गाडीतून बाहेर पडले. विजय नहार एका पुलाच्या कठडय़ाजवळ उभा होते. डोक्यात लाल टोपी होती. चव्हाणांनी त्यांच्याजवळ येऊन, मागण्यांचा कागद घेत वाचला आणि म्हणाले,

‘मला थोडा वेळ लागेल, पण तुमच्या मागण्यांची तड आठच दिवसात लागेल.’

रस्ता रिकामा झाला! गाड्या पुढे गेल्या.

आजचा काळ असता तर या आंदोलनाला विरोधकांच कारस्थान म्हणून कोणत्याही राजकारण्याने पुढचा रस्ता धरला असता. मी केंद्रात आहे राज्यातील मुख्यमंत्र्यांना जाब विचारा असाही विचार केला असता पण हे सगळं घडलं नाही कारण समोरचे व्यक्ती यशवंतराव होते.

मुख्य मुद्दा होता की मागण्यांच काय झालं.

तर यशवंतरावांना आपल्या मागण्या ठामपणे सांगितल्यानंतर पुढील आठ दिवसातच बऱ्याच मागण्यांची पूर्तता करण्यात आली.

गोविंद तळवरकरांच्या पुस्तकातून माहिती मिळते की,

यशवंतरावांनी महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांनाही रब्बीची योजना आक्रमकपणे राबवावी म्हणून बजेटच्या बाहेर जाऊन २०० कोटी अधिकचे दिले. रोजगार हमी योजनेची मजूरी १ रुपया २० पैसे होती ती ३ रुपये करण्यात आली.

या घडामोंडीमध्ये बघु, पंचनामे करु, विषय राज्याचा आहे, तिजोरी रिकामी आहे, अभ्यास करावा लागेल, बैठका घ्यावा लागतील इथपासून ते विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करणे वगैरे काहीही भानगडी झाल्या नाहीत. प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे हेच एकमेव ध्येय त्यांचे होते. 

सध्याच्या राजकारण्यांना देखील या गोष्टीतून एकच सांगण आहे, आरोप प्रत्यारोप होतच राहतील. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर व्हावं पण पिचलेल्या शेतकऱ्याला मदत जाहीर करुन खुशाल आपलं राजकारण करावं.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.