विखे पाटलांच्या एका मतामुळे यशवंतरावांचं विरोधी पक्ष नेतेपद हुकलं…

१९७७ ची निवडणूक. आणीबाणीच्या मुद्द्यावर लढलेली निवडणूक. कॉग्रेसविषयी लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचं पक्षचिन्ह होतं गाय-वासरू. पण विरोधकांनी त्याला इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्याशी जोडतं, प्रचाराचा मुद्दा बनवला होता. जनता पक्षाचं वारू चौफेर होतं.

या लोकसभा निवडणुकामध्ये इंदिरा गांधींच गर्वहरण करायचं म्हणत सगळे विरोधी पक्ष एकत्र आले.

मात्र इंदिरा गांधींना आपल्या लोकप्रियतेवर त्यांचा अजूनही गाढ विश्वास होता. आणीबाणी ही अपरिहार्य होती आणि जनतेने या कडू औषधाचं स्वागत केलं असं त्यांचं म्हणणं होतं. पण निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा मतदारांनी इंदिरा गांधींना त्यांच्या हुकूमशाहीच उत्तर मतपेटीतून दिलं होतं. ५४२ पैकी अवघ्या १५७ जागा मिळाल्या.

स्वतः इंदिरा गांधी आणि संजय गांधी पराभूत झाले होते, ‘गाय बी गेलं आणि वासरू बी गेलं’ म्हणतं देशभरात जनता पक्षाने गुलाल उधळला होता. 

तिकडं लोकसभेत इंदिरा गांधींच्या अनुपस्थितीत यशवंतरावांची काँग्रेसपक्षाच्या संसदीय नेतेपदी निवड झाली, आणि संख्याबळामुळे त्यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. पण ते पक्षात अस्वस्थ होते, इंदिरा गांधींचा यशवंतराव चव्हाण, ब्रम्हानंद रेड्डी, स्वर्णसिंग यापैकी कोणावरच विश्वास नव्हता. ज्या प्रकारचं संघर्षांचं राजकारण त्या करू पाहत होत्या, ते या तिघांना पटत नव्हतं.

त्याच दरम्यान इंदिरा गांधींनी कर्नाटकमधल्या चिकमंगळुर मधून पोट-निवडणुकीत विजयी होतं लोकसभेत आल्या. त्यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकारणीचे सभासदत्व सोडले आणि १ जानेवारी १९७८ ला काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारी एक राष्ट्रीय परिषद घेत २ जानेवारी १९७८ ला इंदिरा काँग्रेसची स्थापना केली. त्यांच्यासोबत शंकरदयाळ शर्मा, उमाशंकर दीक्षित, कमरुद्दीन अली अहमद, बुटा सिंग असे नेते होते.

तर काँग्रेस अर्समध्ये देवराज अर्स, ब्रम्हानंद रेड्डी, यशवंतराव चव्हाण या दिग्गजांसह ए.के.अँटोनी, शरद पवार, प्रियरंजनदास मुन्शी यांचा समावेश होता.

काँग्रेसमधल्या या फुटीमुळे यशवंतरावांचं विरोधी पक्षनेते पद गेलं.

मात्र एप्रिल १९७८ मध्ये जेव्हा विरोधी पक्षनेते पदासाठी पुन्हा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात इंदिरा गांधींनी आपल्या पक्षाकडून विरोधी पक्ष नेते पदासाठी केरळ काँग्रेसमधील दिग्गज नेते सी. एम. स्टीफन यांना उमेदवारी दिली.

नेमकं त्यावेळीच बाळासाहेब विखे पाटील यांनी स्वतःला अपक्ष म्हणून घोषित केलं, पक्षांतरबंदी कायदा नसल्यामुळे कोणावर कसलीच कारवाई होतं नव्हती. त्यावेळी यशवंतरावांनी बाळासाहेबांना सोबत येण्यासाठी आग्रह केला, पण हाडाचे काँग्रेसी असल्यामुळे ते यशवंतरावांसोबत गेले नव्हते. 

ज्यावेळी १२ एप्रिल १९७८ ला लोकसभेत पक्ष नेत्याची निवड करायची वेळ आली तेव्हा बाळासाहेबांनी यशवंतरावांच्या विरोधात मतदान केले. त्यांनी इंदिरा गांधी पुरस्कृत स्टीफन यांना मत दिले. आणि यशवंतरावांचे विरोधी पक्षनेतेपद नेमकं एका मतानं हुकलं.

बाळासाहेबांच्या मते यशवंतराव मोठे नेते असले तरी काँग्रेस व देशाच्या हिताचा विचार करता इंदिरा गांधी अधिक समर्थ नेत्या होत्या. वास्तविक विखे पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांचे घनिष्ट संबंध होते, पण विखे सांगतात त्या प्रमाणे, ते सिंडिकेटबरोबर गेल्यामुळे हा प्रॉब्लेम झाला होता.

मात्र त्यानंतर देखील दिल्लीत दोघांची कायम भेट होतं राहिली, दोघांच्या मनात एकमेकांविषयी कोणतीही कटुता नव्हती. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर बाळासाहेबांनी एका भेटीत यशवंतरावांकडे तक्रारीबाबतचा विषय काढला होता. तेव्हा यशवंतरावांनी ‘जो लोकांची कामे करतो, त्याच्याच तक्रारी होतात. असचं भेटत जा, असं सांगितलं होते.

संदर्भ : महादेव कुलकर्णी (ज्येष्ठ पत्रकार व राजकीय अभ्यासक)

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.