यशवंतरावांना त्यांच्या आईने जेलमध्ये जाऊ दिलं पण ब्रिटिशांची माफी मागू दिली नाही.. !

यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्रात सभ्य राजकारणाचा पाया रचणारे व्यक्तिमत्व. शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून संपूर्ण देशाने यशवंतरावांना अनुभवल आहे. मात्र त्याचवेळी देशाचे संरक्षणमंत्री म्हणून यशवंतरावांनी दाखवलेला कणखरपणा देखील देशाने अनुभवला आहे. एकूणच काय तर मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि अगदी उपपंतप्रधान म्हणून त्यांनी आपल्या कर्तृत्वावर मजल मारली.

मात्र यशवंतराव चव्हाण एवढे मोठे होऊ शकले त्यामागे त्यांच्या कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. पण त्यातही त्यांच्या आईची एक छोटी कृती यशवंतरावांचं कर्तृत्व मोठं करण्यास कारणीभूत ठरली होती. ती कृती म्हणजे एक माफी मागू न देण्याची.

यशवंतराव चव्हाण यांचं मूळ गाव म्हणजे देवराष्ट्रे. घरी आई विठामाता, वडील बळवंतराव आणि ३ भावंडे असा परिवार होता. पण १९१७ सालच्या प्लेग साथीमध्ये यशवंतरावांच्या वडिलांचे निधन झाले. मात्र त्या दुःखातुन सावरत त्यांची आई यशवंतरावांसह तीन भावंडांना घेऊन कराडला आल्या. कराडमध्ये आल्यावरचा काळ हा स्वातंत्र्य चळवळीने भारावलेला होता.

यशवंतराव देखील त्या वातावरणाने भारावून गेले, आणि शाळेत असतानाच स्वातंत्र्य चळवळीशी जोडले गेले.

असाच १९३२ च्या चळवळीच्या वेळचा एक प्रसंग. १८-१९ वर्षाचे यशवंतराव शाळेत शिकत होते. ते त्यांचं मॅट्रिकचं वर्ष होतं. त्यावेळी नगरपालिकेवर राष्ट्रीय झेंडा फडकवायचा आणि शहरात चळवळींची पत्रक चिकटवायची, असा एक बेत ठरला. त्याचे नेतृत्व यशवंतरावांकडे आले होते. बेत पक्का होताच आखणी झाली, आणि शुक्रवारी २६ जानेवारी १९३२ रोजी ‘वंदे मातरम्’च्या घोषणा देत नगरपालिकेवर राष्ट्रीय झेंडा फडकवण्यात आला.

४-६ शाळकरी मुलांच्या या कृत्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली आणि प्रत्येकाच्या तोंडी याच गोष्टींबद्दल चर्चा सुरु झाली. चळवळ मोठी होतं असलेली, लहान मुलं देखील जोडली जात असल्याचं पाहून इंग्रज सरकार चांगलंच चवताळून उठलं होतं. गावभर पत्रकं लावून सरकारच्या नाकावर टिच्चून झेंडा फडकवल्यानं यात सहभागी असणाऱ्यांची धरपकड सुरु झाली. 

दुसरा दिवस शनिवारचा होता. शाळेतील मास्तर मंडळी आता कोण कोण सापडतय या विचाराने गडबडून गेली होती. यशवंतराव त्या दिवशी वर्गात बसले असताना पकडले गेले आणि त्यांना तब्बल १८ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली. शिक्षा जाहीर झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी त्यांची येरवडा जेलमध्ये रवानगी होणार होती.

एका शिक्षकांना हे समजताच ते रविवारच्या दिवशी यशवंतरावांच्या घरी गेले आणि मुलाला भेटण्यासाठी आईला घेऊन आले. यशवंतरावांना त्यावेळी फौजदार कचेरीतून बोलावणं आल्यानं ते पोलिस-पहाऱ्यात तिथे गेले होते. फौजदार बसले होते. आई आणि मास्तरही तिथे होते.

यशवंतरावांना पाहताच आईचे डोळे पाणावले. त्यावेळी मास्तर सांत्वन करू लागले आणि बोलता बोलता यशवंतरावांना म्हणाले,

‘फौजदारसाहेब दयाळू आहेत. माफी मागितलीस, तर सोडून देईन, म्हणतात!

त्यावर यशवंतरावांच्या आई म्हणाल्या,

‘काय बोलता तुम्ही, मास्तर? माफी मागायची?’

आईंनी मास्तरांना परस्परच फटकारले, आणि यशवंतरावांकडे बघून म्हणाल्या,

‘माफी मागायचं कारण नाही. तब्येतीची काळजी घे, म्हणजे झालं. ईश्वर आपल्या पाठीशी उभा आहे.’

माय – लेकाचा संवाद संपला आणि आई उठून गेल्या. मात्र आईच्या या गुणाचा अभिमान मनात ठेऊनच त्यांनी तुरुंगात पाऊल टाकले. पुढे जवळपास १५ यशवंतराव येरवडा आणि विसापूरच्या कारागृहात होते.

त्यावेळी यशवंतराव सांगतात,

त्यानंतर मला कशाचीच फिकीर वाटली नाही. मात्र मास्तरांच्या सुराला आईने होकार भरला असता आणि आयुष्याच्या सुरुवातीलाच तो ‘माफी’ चा प्रसंग वठवावा लागला असता, तर… एक लहानशीच घटना, पण त्या घटनेने मला माझ्या भावी आयुष्याकडे केवढ्या मोठ्या शक्तीने फेकून दिले होते!

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.