यशवंतराव चव्हाण कॉंग्रेसमध्ये परत यावेत यासाठी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी मध्यस्थी केली होती ?

गोष्ट आहे ऐंशीच्या दशकातली. यशवंतराव चव्हाण यांच्या वैभवशाली राजकीय कारकीर्दीचा संध्याकाळ सुरु होता. काही वर्षापूर्वीच त्यांनी इंदिरा गांधी यांची साथ सोडून स्थापन झालेल्या कॉंग्रेस (उर्स) पक्षात जाण्याचा निर्णय घेतला होता. तिथे त्यांना उपपंतप्रधानपद सांभाळायला मिळाले पण हा निर्णय त्यांच्या राजकीय आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरली.

आणीबाणीच्या चुकीबद्दल इंदिरा गांधीना माफ करून जनता परत त्यांना सत्तास्थानी आणेल हे कोणालाच वाटलं नव्हत. यशवंतरावांची गणिते चुकली. उर्स कॉंग्रेसची निवडणुकीत दाणादाण उडाली. एकेकाळी देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणारे चव्हाण साहेब अडगळीत पडल्याप्रमाणे झाले होते. त्यांचे महाराष्ट्रातील समर्थक ही त्यांचं ऐकत नव्हते.

लोकनेते असलेले यशवंतराव खूप काळ सक्रीय राजकारणापासून राहणे शक्य नव्हते . त्यांनी परतीची तयारी सुरु केली. पण मतभेदामुळे त्यांच्यात आणि पंतप्रधान इंदिरा गांधींमध्ये दरी वाढली होती. ही दरी मिटवून यशवंतराव स्वगृही परतणार अशा चर्चा दबक्या आवाजात सुरु झाल्या होत्या.

अशातच एक दिवस बातमी आली,

“यशवंतराव चव्हाण कॉंग्रेसमध्ये परतावेत म्हणून इंग्लंडच्या माजी पंतप्रधानांनी मध्यस्थी केली.”

दिल्लीमध्येच नाही तर मुंबईच्या राजकारणामध्ये देखील खळबळ उडाली. जेष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी आपल्या एका पुस्तकात नेमक काय झालं होत याच वर्णन केलं आहे.

झालं असं होतं की सी. राजगोपालाचारी यांच्या स्मृतीनिम्मित दिल्लीमध्ये राजाजी स्मारक व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होत. नुकतेच इंग्लंडचे पंतप्रधान राहून गेलेले जेम्स कॅलॅहन या व्याख्यानमालेत भाषण देण्यासाठी भारतात आले होते. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय विद्याभवनने एक भोजन समारंभ आयोजित केला होता. यशवंतराव चव्हाण देखील याला उपस्थित होते.

खरं तर यशवंतराव आणि माजो पंतप्रधान कॅलॅहन यांची जुनी ओळख होती. चव्हाणसाहेब परराष्ट्रमंत्रीपदी असतानाया दोघांची अनेकदा भेट झाली होती. भोजनाच्या वेळी यशवंतरावाना पाहून कॅलॅहननी त्यांना जवळ बोलवून घेतलं आणि मनमोकळ्या गप्पांची मैफिल जमली.

बोलता बोलता विषय राजकारणाकडे वळला. यशवंतरावांनी कॅलॅहनना गमतीगमतीमध्ये  एक प्रश्न विचारला,

“आता सत्तेवर नसताना कसं वाटतय? पुन्हा पंतप्रधानपदावर येऊ शकाल काय?”

कॅलॅहनसुद्धा कच्च्या गुरुचे चेले नव्हते. त्यांनी याप्रश्नांना झकासपणे टोलवून लावले. आणि त्यांनी त्याच मूडमध्ये यशवंतरावावर बाउन्सर टाकला.

“तुमचे आणि श्रीमती इंदिरा गांधींचे संबंध कसे आहेत?”

हा अनपेक्षित बाउन्सर बघून यशवंतराव देखील काही क्षण पेचात पडले. त्यांनी उत्तर दिले,

“करेक्ट आहेत.”

पण कॅलॅहन यांचं समाधान झालं नाही. त्यांनी आणखी एक यॉर्कर टाकला,

“तुम्हाला श्रीमती गांधीनी मंत्रीपद देऊ केले तर काय कराल?”

यशवंतराव सावधपणे म्हणाले,

“मी सध्या त्यांच्या पक्षात नाही त्यामुळे मंत्रीपदाचा प्रश्नच उद्भवत नाही.”

या गप्पा चालू होत्या. कॅलॅहन यांचा आवाज थोडा वरच्या पट्टीचा होता. आपल्या राजकारणाच्या वैभवशाली परंपरेप्रमाणे कोणी तरी हे संभाषण चोरून ऐकण्याचा प्रयत्न केला होता. तुकड्या तुकड्यात ऐकू गेलेल्या संभाषणाचा अर्थ त्याने लावला की यशवंतराव परत कॉंग्रेसमध्ये जावेत म्हणून ब्रिटनचे माजी पंतप्रधान मध्यस्थी करत आहेत. यासंबंधीचं गॉसिप दिल्ली मध्ये पसरवण्यात आलं.

पत्रकार अशोक जैन यांच्या मते ही सगळी अफवा होती. दोन मित्रांच्या गप्पांचा चुकीचा अर्थ लावून वर्तमानपत्रांनी मीठमसाला टाकलेली बातमी बनवली होती. उलट यशवंतराव चव्हाण कॉंग्रेसमध्ये परतणार याची बोलणी काही महिन्यापूर्वीचं झाली होती. खुद्द इंदिरा गांधीनी यशवंतरावांची  भेट घेतली होती. यात कॅलॅहन यांच्या शिष्ठाईचा कोणताच संबंध नव्हता.  

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.