भिवंडी दंगलीवरून पत्रकारांवर खटले टाकले, तर यशवंतरावांनी थेट मुख्यमंत्र्याना खडसावलं

गोष्ट आहे साठ-सत्तरच्या दशकातली.  भिवंडीमध्ये भयंकर जातीय दंगली पेटलेल्या होत्या. दोन समाजामध्ये एका विशिष्ट कारणावरून तेढ निर्माण झाला होता. त्याचे पर्यावसन हिंसक दंगलीत झाले होते. दोन्ही बाजू आक्रमक होत्या. भिवंडी दंगलीत जळत होती.

मुंबईत नवाकाळ वर्तमानपत्र तेव्हा प्रचंड गाजायचं. त्याचे संपादक होते निळकंठ खाडिलकर. त्यांना अग्रलेखांचा बादशाह अशी उपाधी मिळाली होती.  निष्पक्ष बातमीदारी करणारे वर्तमानपत्र म्हणून नवाकाळला ओळखलं जायचं. 

भिवंडीमध्ये दंगल सुरु होती तेव्हा बरेचसे पत्रकार तिथे जाण्यास धजावत नव्हते. मात्र खाडिलकर यांनी आपल्या नवाकाळच्या बातमीदारांना घटनस्थळी पाठवलं होतं. दंगली दरम्यान काय घडत आहे वयाची उत्सुकता जनतेला होती आणि त्याचे पारदर्शी चित्र मांडणे हे वर्तमानपत्राचे काम आहे असं निळकंठ खाडिलकर यांचं मत होतं.

त्यांनी भिवंडीची हेडलाईन देणे सुरु  केले.मात्र त्यांच्या बातमीत जातीय विचार कुठे नव्हता. या वाचण्यासाठी नवाकाळवर लोकांच्या उडया पडू लागल्या.  कोणाचीही बाजू न घेता बातमी जशी घडली तशी छापणे हे धोरण खाडिलकर यांनी राबवलं होतं.

असच एकदा दिवस त्यांच्या ऑफिस चा फोन खणखणला. मुख्यमंत्री वसन्तराव नाईक त्यांच्याशी बोलणार होते. खाडिलकरांना हे अनपेक्षित होतं , स्वतः मुख्यमंत्र्यांचं आपल्याकडे कुठलं काम  हा विचार करत त्यांनी फोन घेतला. 

खाडिलकर म्हणतात वसंतनराव नाईकांसारखा अत्यंत रुबाबदार, खंडणी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री गेल्या पन्नास वर्षात झाला नाही. फोनवर आपल्या सुपरिचित आर्जवी शैलीत मुख्यमंत्री खाडिलकरांना म्हणाले,

“तुमच्याकडे भिवंडीची बातमी खूप सविस्तर येते ! मुख्य हेडिंगच असते ! मला वाटते कि हि बातमी अगदी कमी आणि दुय्य्म स्थानावर द्यावी. हि दंगल म्हणजे काळजीचा विषय आहे! अमुक वृत्तपत्रात हीच बातमी कशी तळात छापतात हे पहा.”

खाडिलकरांची बातम्यांबाबतची भूमिका पहिल्यापासून पक्की होती. वाचक सकाळी वृत्तपत्र ज्या बातमीसाठी हातात घेतो तीच हेडलाईन ! याच भूमिकेने संपादक वसंतराव नाईकांना म्हणाले,

“सर्वांचे लक्ष भिवंडीकडे आहे ! यामुळे हि बातमी ठळकपणे सविस्तर द्यावीच लागेल. अन्यथा अफवांचे पीक अनेकपट येईल ! शिवाय नवाकाळ च्या बातमीत जातीयवादी शब्दही नसतो. त्याचा धिक्कारच असतो.”

वसंतराव म्हणाले,

तरीही बातमीची हेडलाईन देऊ नका. बातमी तळात घ्या.

खाडिलकरांनी त्यांना सांगितलं,

“मला तसे करणे शक्य नाही. मात्र बातमीत जातीयवादाला चिथावणी मिळेल असे एकही वाक्य येऊ देणार नाही याचे वचन देतो!”

वसंतराव पुन्हा तळात बातमी दिल तर योग्य होईल म्हणाले आणि फोन ठेवून दिला.

यानंतर बरेच दिवस लोटले. दंगल शमली. एक दिवस पोलीस नवाकाळच्या ऑफिसमध्ये आले. त्याने तीन समन्स  .जातीय विद्वेषाला चिथावणी देणारा मजकूर दिल्याबद्दल संपादकांवर महाराष्ट्र सरकारने तीन खटले दाखल केले होते. निळकंठ खाडिलकरांच्या लक्षात आलं वसंतराव नाईकांचा न ऐकल्याबद्दल आपल्याला शिक्षा झाली आहे.

एरव्ही जी मोठमोठी भांडवलदारांची वृत्तपत्रे नवाकाळला खिजगणतीतही धरत नव्हती त्यांनी सर्वानी खुश होऊन खाडिलकरांवर दाखल झालेल्या खटल्याची पहिल्या पानावर बातमी दिली.

संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेवर उलटसुलट चर्चा झाली. वर्तमानपत्रांवरच्या स्वातंत्र्यापासून दंगलीत केल्या जाणाऱ्या रिपोर्टींग बद्दल बातमीदारांनी सामाजिक भान जपले पाहिजे असे दोन्ही बाजूचे सल्ले दिले जात होते. 

अशातच एकदा पत्रकारांचे संमेलन भरले आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण उपस्थित राहणार होते. यशवंतराव या विषयाबद्दल काय बोलतात याची सगळ्यांना उत्सुकता होती. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले,

“नवाकाळ जातीयवादी लिहूच शकत नाही. त्यांची परंपरा जातीयवाद विरोधी आहे आणि ती आजतागायत कायत आहे. महाराष्ट्र सरकारने नवाकाळवर भरलेले खटले मला तरी मान्य नाहीत.

यशवंतराव चव्हाणांचे उद्गार हे मुख्यमंत्री वसंतराव नाईकांच्या विरोधात आहेत म्हणून सर्व वर्तमानपत्रानी हेडलाईनला हि बातमी दिली. वसनातराव नाईकांवर दिल्ली नाराज आहे असाच संदेश यातून दिला गेला होता.

दोनच दिवसांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा नवाकाळ मध्ये पुन्हा फोन आला. त्यांनी आपल्या अभिजात शैलीत खाडिलकरांना विचारलं,

“भेटीसाठी वेळ मिळेल का?”

यावर निळकंठराव म्हणाले,

तुम्ही सांगाल त्या क्षणी मी येईन.”

वसंतराव नाईकांनी त्यांना रात्री नऊ वाजता वर्ष बंगल्यावर भेटीसाठी बोलवलं. खाडिलकर दिल्या वेळेपेक्षा १५ मिनिट आधीच जाऊन पोहचले. ठीक नऊ वाजता मुख्यमंत्र्यांचं आगमन झालं. ते म्हणाले,

“हिरवळीवर बसू या का?”

खाडिलकरांनी हो म्हणताच हिरवळीवर खुर्च्या मांडण्यात आल्या. निवांत गप्पा सुरु झाल्या. अचानक गंभीर चेहऱ्याने मुख्यमंत्र्यानी खाडिलकरांना विचारलं .

यशवंतरावांशी तुमचा खास सलोखा आहे का?

यावर खाडिलकरांनी नकार देत आपल्या व यशवंतराव चव्हाणांच्या जुन्या भेटीची हकीकत सांगितली. आजोबांच्या वेळचे नाते देखील सांगितलं मात्र त्यांनी जे नवाकाळ खटल्याबाबत जे उद्गार काढले तेही शुद्ध आपुलकीचे होते आणि त्यात कोणतंही राजकारण नसल्याचं सांगितलं.

हे ऐकून वसंतराव नाईक रिलॅक्स  झाले. त्या दिवशी त्यांनी खाडिलकरांसोबत दिलखुलास पणे गप्पा मारल्या. काही मार्गदर्शन केलं. पुढे जाऊन त्यांनी नवाकाळवरचे खटले मागे घेतले. निळकंठ म्हणतात

त्यांनी खटले मागे घेतलेच पण त्या दिवशी त्यांनी माझा स्वाभिमान आपल्या अनुभवी शैलीने असा सुखावला कि मी त्यांचा कायमचा चाहताच झालो. मला जी गोष्ट ऑफिसात परतल्यावर लक्षात आली.

हे हि वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.