नेहरूंनी केलेल्या अपमानाला यशवंतरावांनी आपल्या कामातून उत्तर दिलं !!

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी स्वतः सांगितलेला किस्सा.

गोष्ट आहे पन्नासच्या दशकातली. तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वात नव्हते. गुजरात आणि महाराष्ट्र मिळून द्विभाषिक राज्याची स्थापना झाली होती. मोरारजी देसाई त्याचे मुख्यमंत्री होते. ते स्वतः गुजराती होते आणि त्यांचा मराठी भाषिकांच्या स्वतंत्र राज्याला तीव्र विरोध होता. त्यांनी केंद्राला आपली भूमिका पटवून दिली होती.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीची सुरवात झाली. मोरारजींनी तो दडपण्याचा प्रयत्न केला. यामुळे महाराष्ट्रात कॉंग्रेसविरोधात भडका उडाला. तात्पुरती मलमपट्टी म्हणून द्विभाषिक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मराठी नेत्याची नेमणूक करायचा निर्णय झाला.

महाराष्ट्रातून एक नाव पुढे आले. भाऊसाहेब हिरे.

कर्मवीर भाऊसाहेब हिरे हे महाराष्ट्रातील जुने व जाणते नेते होते. पण त्यांच्या नावाला मोरारजी देसाई यांनी मोठा विरोध दर्शवला. मोरारजी स्वतः निवडणुकीत पडले होते मात्र त्यांचं आणि गुजराती नेत्यांच विधानसभेत मोठ संख्याबळ होतं.

मोरारजी यांनी यशवंतराव चव्हाणांना मुख्यमंत्री करा असं सांगितल.

यशवंतराव तेव्हा फक्त ४२-४३ वर्षांचे होते. त्यांनीही स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिल होतं मात्र भाऊसाहेब हिरेंच्या तुलनेत ते अननुभवी होते. पण मोरारजी देसाई यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी मोठी चमकदार कामगिरी करून दाखविली होती.

अखेर त्यांचीच नियुक्ती मुंबई प्रांताच्या मुख्यमंत्री पदी करण्यात आली.

मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण मंत्रीमंडळाची यादी घेऊन दिल्लीला आले. तेव्हाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची परवानगी घेणे आवश्यक होते. ठरल्या वेळी यशवंतराव नेहरूंच्या केबिन मध्ये गेले. त्यांना आपली यादी दाखवली.

पंडीतजीनी ती यादी हातात घेऊन पाहिली. ते कधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कारभारात ढवळाढवळ करायचे नाहीत. तरी त्यांनी यशवंतरावांच्या यादीवर एका नावापुढे खून केली आणि म्हणाले,

“तुम्हाला योग्य वाटले तर हा बदल करा !”

आपल्या सारखी अननुभवी मुख्यमंत्र्याच्या यादीत कोणताही मोठा बदल न करणाऱ्या नेहरूंच्या दिलदारपणामुळे यशवंतराव भारावून गेले आणि आभार मानत उभे राहिले. त्यांनी कमरेत थोडस झुकून नेहरुंना प्रणाम केला आणि म्हणाले,

“पंडितजी मी आपला कृपाभिलाषी आहे !”

पण अचानक काय झाल काय माहित पंतप्रधान ताडकन उठून उभे राहिले आणि म्हणाले,”My blessings are not cheap !”

यशवंतरावांना धक्का बसला. आपल काय चुकलं याचा विचार करत ते प्रधानंमंत्र्याच्या दालनातून बाहेर आले. ते म्हणतात,

“मुंबईला परतण्याच्या विमानप्रवासात मी अस्वस्थ होतो! मी माझ्या शक्तीवर किंवा संघटनेवर मुख्यमंत्री बनलो नव्हतो! भाऊसाहेब हिरे नकोत म्हणून मोरारजींनी मला पुढे केले व मी मुख्यमंत्री बनलो. नेहरूंच्या दृष्टीने मी वशिल्याचा मुख्यमंत्री होतो !”

त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा आनंद ओसरला . राजकीय परिणाम घडतील म्हणून त्यांनी घडलेली घटना कुणालाच सांगितली नाही. पण नेहरूंच्यापासून अंतर राखायच ठरवल.

पंतप्रधान जेव्हा दौऱ्यावर येतात तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समवेत राहिलेच पाहिजे हा शिरस्ता आहे. जेव्हा जेव्हा नेहरू मुंबई दौऱ्यावर येत तेव्हा यशवंतराव काळजी घेऊ लागले. जेव्हा नेहरूंच्या सोबत कार मध्ये बसायची वेळ आली तर ते मुद्दामहून मागे रेंगाळू लागले. यामुळे पंतप्रधानाच्या शेजारच्या सिटवर राज्यपाल बसायचे आणि यशवंतराव ड्रायव्हरच्या शेजारी.

यशवंतरावांनी या काळात महाराष्ट्रात संघटना मजबूत व्हावी म्हणून भरपूर कष्ट घेतले. ते सांगतात,”

मी राज्यात बेरजेचे राजकरण केले. मोरारजींच्या काळात जो कडवा विरोध त्यांचं ताठर भुमिकेमुळे होता तो हळूहळू निवळला. गुणीजनांना मान दिला. गरिबांना आधार दिला. मुख्य म्हणजे विश्वासातल्या सहकाऱ्यांना उत्तेजन दिले. नवनवीन योजना आणल्या. महाराष्ट्रातील वातावरण बदलले.  कॉंग्रेसवरचा राग कमी झाला.”

यशवंतरावांच्या नेतृत्वाची प्रशंसा सुरु झालीवरच जनतेचं प्रेम वाढलं. त्यांची लोकप्रियता शिखरावर पोहचली होती.

पुढे जेव्हा नेहरू परत मुंबई दौर्यावर आले तेव्हा त्यांना महाराष्ट्रातील बदललेल्या घडामोडी जाणवत होत्या. मुख्यमंत्री आपल्याला टाळतात हे सुद्धा त्यांना दिसत होतं. एकदा असच गाडीत बसायचा प्रसंग आला. यशवंतराव नेहमीप्रमाणे मागे रेंगाळले. मात्र नेहरूंनी त्यांचा चटकन हात पकडला आणि ओढून आपल्या शेजारच्या सिटवर बसवले आणि हसून म्हणाले,

“Chief Minister, now you have my blessings! “

यशवंतराव चव्हाणांनी कर्तबगारीने आपल मुख्यमंत्रीपद सिद्ध केल होतं. पुढे यशवंतरावांवर नेहरूंचा एवढा विश्वास वाढला की त्यांनी चीनच्या युद्धातील संकटानंतर अनेक मोठ्या नेत्यांना बाजूला सारून यशवंतरावांना संरक्षण मंत्री पद सांभाळण्यासाठी दिल्लीला बोलवले. यशवंतरावांनी देखील मोठ्या मनाने ते स्वीकारलं.

सगळ्या वर्तमानपत्रात हेडलाईन होती, “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला !”

हा किस्सा जेष्ठ पत्रकार नीलकण्ठ खाडिलकर यांनी आपल्या टॉवर्स या पुस्तकात लिहून ठेवलेला आहे.

हे ही वाच भिडू.