फक्त चांगुलपणा पायी यशवंतराव चव्हाणांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी गमावली.

देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तरच्या वर वर्षे झाली तरी महाराष्ट्राच्या वाट्याला पंतप्रधानपद कधी आले नाही. अगदी केंद्रपातळीवर कधी नाव देखील ऐकलं नव्हतं असे एच.डी.देवेगौडा सुद्धा पंतप्रधान बनले मात्र देश गाजवणारे मराठी नेते या बाबतीत मात्र मागेच राहिले.

सर्वात जास्त पंतप्रधान पदाच्या खुर्चीच्या जवळ जाऊन पोहचले ते फक्त स्व. यशवंतराव चव्हाण.

संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी अतिशय कार्यक्षमतेने सांभाळलेल्या यशवंतरावांना चीनच्या युद्धावेळी मदतीसाठी संरक्षण मंत्री म्हणून नेहरूंनी त्यांना केंद्रात बोलावून घेतले. हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावून गेला असं सांगितलं गेलं. यशवंतराव चव्हाणांनी राष्ट्र पातळीवर आपली चुणूक दाखवून दिली.

नेहरूंच्या निधनानंतर त्यांचा प्रधानमंत्रीपदाचा वारसा लालबहादूर शास्त्री यांना मिळाला. त्यांच्याही मंत्रिमंडळात यशवंतराव चव्हाणांचे संरक्षण मंत्री म्हणून स्थान अबाधित राहिले. चीनच्या युद्धात मिळालेल्या पराभवाचा सखोल अभ्यास करून यशवंतराव चव्हाणांनी भारतीय लष्कराची ताकद वाढावी यासाठी अनेक प्रयत्न केले.

या प्रयत्नांचा परिणाम म्हणून भारताने १९६५ सालचं पाकिस्तान विरुद्धच युद्ध सहज जिंकलं. यशवंतरावांचे महत्व राष्ट्रीय राजकारणात प्रचंड वाढले. या युद्धाच्या नंतर तहाची बोलणी करण्यासाठी शास्त्रीजी ताश्कंद येथे गेले आणि दुर्दैवाने तिथे त्यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला.

सगळा देश या धक्क्याने स्तब्ध झाला होता. शास्त्रीजींनी पंतप्रधान पद सांभाळले याला दीड वर्षांचा देखील काळ लोटला नव्हता. त्यांच्यानंतर पंतप्रधान पद कोणाला मिळणार याच औत्सुक्य सगळ्यांनाच होते.

देशपातळीवर दोनच नावे मुख्यतः चर्चेत होती. अर्थमंत्री मोरारजी देसाई आणि संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण.

मोरारजी भाई देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत केलेल्या अत्याचारा बद्दल त्यांच्याबद्दल अनेकांचं मत चांगलं नव्हतं. काँग्रेस मध्येच त्यांचे अनेक विरोधक होते. नेहरू-शास्त्रींच्या समाजवादी धोरणांच्या विरुद्ध विचारसरणी ते देशावर लादतील अशीच अनेकांना शंका होती.

शरद पवार यांनी आपल्या लोक माझे सांगाती या पुस्तकात ही आठवण सांगितलेली आहे. त्यांच्यामते संबंध देशभरात यशवंतराव चव्हाणांनी नेतृत्व स्वीकारावं अशीच भावना होती. पण यशवंतराव त्या मनस्थितीत नव्हते. लालबहादूर शास्त्रीजींचे पार्थिव ते स्वतः रशियातून भारतात घेऊन आले. अजूनही या धक्क्यातून ते सावरत होते.

काँग्रेसमध्ये मात्र नेता निवडीची सूत्रे वेगाने फिरू लागली होती. एकदा अशाच एका संध्याकाळी यशवंतरावांच्या निवासस्थानी त्यांचे महाराष्ट्रातील समर्थक भेटायला आले. यात मुख्यमंत्री वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, आबासाहेब कुलकर्णी, किसनराव वीर आणि शरद पवार असे अनेक नेते होते.

आबासाहेब कुलकर्णी यांचा देशपातळीवरील अनेक नेत्यांशी चांगला संपर्क होता. त्यांनी चाचपणी केली होती, चंद्रशेखर यांच्यासारखे कित्येकजण यशवंतरावांच्या पाठीशी राहण्यास तयार होते. पण यशवंतराव चव्हाणांनी वेगळीच भूमिका मांडली. ते म्हणाले,

“मला दिल्लीला येण्याची संधी नेहरूंच्या मुळे मिळाली. मी आलो त्यावेळी पक्षाध्यक्ष इंदिरा गांधी होत्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी त्यांच आणि माझं बोलणं व्हायचं. माझ्या सांगण्यावरूनच त्यांनी मोरारजी देसाई यांचा विरोध असतानाही नेहरूंचं मन महाराष्ट्राच्या बाजूने अनुकूल बनवलं होतं. अशा पार्श्वभूमीमुळे नेतृत्वपदासाठी इंदिराजींशी बोलून त्यांचा पाठिंबा घेऊनच पुढे जावं असं मला वाटतं.”

यशवंतरावांचे हे बोलणं तिथं जमलेल्या कोणालाही विशेष पसंत पडले नाही पण सगळे गप्प राहिले. फक्त शरद पवार तेवढे थोडंसं धाडस करून म्हणाले,

“तुम्ही जर इंदिराजींना विचारायला गेला तर त्या म्हणतील ‘मीच पंतप्रधान होते.’ त्यामुळे असं काही करू नका. “

शरद पवार तरुण होते, राजकारणात तसे नवखे होते. यशवंतराव त्यांच्या बोलण्यामुळे थोडेसे नाराज झाले,

“तू फार शहाणा झाला आहेस ” असं त्यांनी पवारांना सुनावलं.

ठरल्याप्रमाणे चव्हाणसाहेब इंदिरा गांधींना भेटायला गेले. बाकीचे नेते त्यांच्या निवासस्थानावर वाट बघत बसले. काही वेळातच यशवंतराव परत आले. सगळ्या नेत्यांना आश्चर्य वाटलं. वसंतदादा आणि किसन वीर यांनी उत्सुकतेने काय झालं असं विचारलं.

यशवंतरावांनी इंदिरा गांधींच्या सोबत झालेला संवाद सांगितला. ते त्यांना म्हणाले

“साधारणतः मी नेतृत्व स्वीकारावं असा एकंदरीत सूर आहे. पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आपले योगदान मी विसरू शकत नाही. पंडित नेहरूंनी आपल्या आग्रहामुळे मला दिल्लीला आणलं. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी माझी भूमिका आपल्या कानी घालावी यासाठी मी आलो.”

असं बोलून यशवंतराव काही क्षण थांबले. लगेच पवार व इतरांनी इंदिराजींची यावर प्रतिक्रिया काय असं विचारलं. तेव्हा ते म्हणाले,

“इंदिराजींनी त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी दहा बारा तासांचा अवधी मागितला आहे.”

शरद पवार पुन्हा न राहवून म्हणाले,

“दहा बारा तास काय, तासाभरातच इंदिरा गांधींचा मला नेतृत्व करायचं आहे असा निरोप येईल.”

त्यांचं हे बोलणं ऐकून यशवंतराव पुन्हा पवारांच्यावर रागावले. त्यांचं हे बोलणं होतंय तेवढ्यात चव्हाण साहेबांचे स्वीय सहायक डोंगरे आत आले व त्यांनी इंदिरा गांधींचा फोन आला आहे असा निरोप दिला. यशवंतराव फोन उचलण्यासाठी गेले. त्यांच्यात व इंदिरा गांधी यांच्यात काय बोलणं चालू आहे याची सगळ्यांना प्रचंड उत्सुकता लागली होती.यशवंतराव परत आल्यावर पुन्हा त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली.

यशवंतरावांनी सांगितलं,

“इंदिराजी म्हणाल्या की माझ्या वडिलांनी तुम्हाला दिल्लीला आणलं याचं व संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या माझ्या योगदानाचं तुम्ही समरण ठेवलंत याबद्दल मी आपली आभारी आहे. तुमचं सहकार्य व पाठिंबा आहे म्हणूनच मी नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला आहे.”

शरद पवार आपल्या पुस्तकात म्हणतात,

चव्हाण साहेबांमधल्या अवास्तव सौजन्यामुळे त्यांचं पंतप्रधानपद हुकलं असं माझं प्रामाणिक मत आहे.

पुन्हा असाच प्रसंग काही वर्षांनी आला. आणीबाणी नंतरच्या जनता सरकारचा काळ. काँग्रेस फुटली होती. इंदिरा काँग्रेस व अर्स काँग्रेस असे दोन पक्ष निर्माण झाले होते. यशवंतराव चव्हाण अनेक जुन्या दिग्गज नेत्यांसह अर्स काँग्रेसमध्ये होते.

१९७९ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालचे जनता पक्षाचे सरकार अंतर्गत कलहामुळे कोसळले होते. यशवंत राव चव्हाण यांना पुन्हा पंतप्रधान पदाची संधी चालून आली होती. अनेक राजकीय घडामोडी दिल्लीमध्ये घडत होत्या.

शरद पवार तेव्हा महाराष्ट्रात वसंतदादा यांचं सरकार पाडून मुख्यमंत्री बनले होते. त्यांनी धूर्तपणे केलेला पुलोद हा प्रयोग संपूर्ण देशभरात गाजला होता. अनेकांनी त्यांच्या राजकीय खेळीवर टीका देखील केली होती मात्र पवार मागे हटले नव्हते.

जेव्हा यशवंतरावांना पंतप्रधान बनण्याची पुन्हा संधी मिळत आहे हे ऐकल्यावर शरद पवार पुन्हा दिल्लीला आले. त्यांनी तिथे गाठीभेटी घेण्यास सुरवात केली.

तेव्हाचे राष्ट्रपती होते नीलम संजीव रेड्डी.

मागे जेव्हा संजीव रेड्डी हे पहिल्यांदा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला उभे राहिले होते तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना मोठी मदत केली होती. महाराष्ट्रातील जवळपास सगळी मते संजीव रेड्डी यांना त्यांनी मिळवून दिली होती व यात शरद पवारांचाही मोठा वाटा होता. भले संजीव रेड्डी तेव्हा निवडणूक हरले असले तरी त्यांच्या मनात यशवंतरावांच्या प्रति आदराची भावना होती. याचाच उपयोग करायचं पवारांनी ठरवलं.

ते व आबासाहेब कुलकर्णी हे संजीव रेड्डी यांच्या भेटीला राष्ट्रपती भवनात गेले. या भेटीनंतर संजीव रेड्डी यांनी थेट यशवंतराव चव्हाण यांना सत्ता स्थापने साठी आमंत्रण दिलं, बहुमत सिद्ध करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी देखील दिला. ते यशवंतराव चव्हाणांना म्हणाले,

“मुझे आपण ऋण वापस करना है “

त्या दिवशी संध्याकाळी यशवंतराव चव्हाणांच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थक नेत्यांची पुन्हा बैठक भरली.

त्यावेळी झालेल्या चर्चेत यशवंतराव म्हणत होते की सत्ता स्थापने एवढं संख्याबळ आपल्याजवळ नाही. पण शरद पवार व इतरांचं म्हणणं होतं की आधी सरकार स्थापन करू मग संख्याबळ आपोआप आपल्या पाठीशी उभे राहील.

पण तत्व निष्ठ असलेल्या यशवंतराव चव्हाणांनी याला नकार दिला. त्यांना अण्णासाहेब शिंदे व इतर नेत्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण यशवंतराव बधले नाहीत. त्यांनी परस्परच राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांना आम्ही सरकार स्थापन करणार नाही असा निरोप कळवून टाकला.

राष्ट्रपतींची जेव्हा पवारांशी पुन्हा भेट झाली तेव्हा त्यांनी थोडस रागावून तुमचा नेता जबाबदारी घेण्यास का तयार नाही असं विचारलं. या वरून त्यांचा कल यशवंतरावांच्या बाजूने आहे हे कळत होतं. ते एवढ्यावर थांबले नाहीत तर तिथेच बसलेल्या एका व्यक्तीला शरद पवारांकडे बोट दाखवून म्हणाले

“जर याला हे जर सांगितलं असतं तर त्याने आधी सरकार स्थापन केलं असतं आणि मग बहुमत गोळा केलं असतं. ” 

यशवंतराव चव्हाणांची दुसरी संधी देखील हुकली. अखेर राष्ट्रपतींनी चौधरी चरणसिंग यांना सत्ता स्थापने साठी बोलावलं. त्यांच्या जवळ देखील संख्याबळ नव्हतं तरी त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारलं. काँग्रेसने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला आणि चरणसिंग यांचे सरकार तरले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.