यशवंतरावांवर त्यांच्या माऊलीचा असलेला विश्वास पाहून वि.रा.शिंदे देखील भारावून गेले…

आपल संपुर्ण आयुष्य अस्पृश्यांचा उद्धारासाठी व समाजसेवेसाठी वाहणारे महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचा आज स्मृतिदिन. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी आपले कार्य तडीस नेले. लहानपणीची गरिबी, त्यात अनेक कौटुंबिक आपत्तींची भर, एवढं असून सुद्धा आपला स्वाभिमान न दुखवता जेवढी मदत मिळेल त्यावर त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. पुढे जाऊन त्यांनी अस्पृश्य उद्धाराचे महान कार्य मोठ्या प्रमाणात सुरू केले.

महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यामुळे गावोगावी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू होऊ लागल्या. १९३३ साली कराडमध्ये मित्रांच्या मदतीने अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करण्याचे एका २० वर्षीय युवकाने ठरवले. व ही शाळा महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आशीर्वादाने सुरू व्हावी व ते या शाळेच्या उद्घाटनासाठी यावे अशी इच्छा त्या युवकाने व्यक्त केली. तो युवक दुसरा तिसरा कोणी नसून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते.

ठरल, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांना बोलवण्याचे ठरले. पण त्यांच्यापर्यंत पोहचायचे कसे..? आणि कोणाच्या आधारे..? हा मोठा प्रश्न यशवंतरावां समोर उभा राहिला. शेवटी ते स्वतः पुण्याला महर्षि शिंदे यांना भेटायला निघाले. 

महर्षि शिंदे यांची आणि यशवंतराव चव्हाण यांची पुर्वी कोणतीच ओळख न्हवती. पुणे रेल्वे स्थानकावर पहाटे उतरून, तिथेच नळावर तोंड हातपाय धुवून, तेथूनच सकाळी यशवंतराव महर्षि शिंदे यांच्या घरी पोहचले. महर्षि शिंदे घरीच होते. त्यांनी यशवंतरावांना यायचे कारण विचारले व जास्त त्यांच्याशी काही बोलले नाही.

त्यांनी यशवंतरावांना विचारलं की, ‘तु एक साधा पोरगा, तुझ्या सांगण्यावरून मी येऊ कसा..?’

दोन तास त्यांनी यशवतरावांना बसवून ठेवले, त्यांच निरीक्षण केले, त्यांच्याशी बोलले व शेवटी ते म्हणाले की, ‘मी येईन, पण माझ्या काही अटी आहेत’. क्षणाचाही वेळ वाया न घालवता यशवंतराव म्हणाले की,

‘आम्ही सर्व अटी पाळू’. 

‘मला कोणाच्या घरी उतरवणार..?’ असा प्रश्न महर्षि शिंदे यांनी केला. यशवंतराव म्हणाले माझ्या घरी. पुन्हा ते म्हंटले की, ‘घरी विचारलं आहेस का..?’ तेव्हा यशवंतराव हो म्हणाले. पण पुढे महर्षि शिंदे म्हणाले की, ‘माझ्यासोबत जेवायला हरिजन लोकांना आणावे लागेल, त्यासाठी तुझ्या घरचे मान्यता देतील का..?’ त्यावर यशवंतराव म्हणाले की,

 ‘आई आणि मोठे बंधु नकार देणार नाहीत.’

महर्षि शिंदे म्हणाले ‘तु त्यांना विचारलं आहेस का..?’ त्यावर यशवंतराव म्हणाले की, ‘ नाही ‘…

‘मग आधी का हो म्हणालास ?’ महर्षि शिंदे.

‘माझे सर्व जातींचे मिञ माझ्या घरी येतात, आईची त्याबद्दल कधीच तक्रार नसते’ यशवंतराव.

‘पण तुझ्या घरी कधी हरिजनांची पंगत झाली आहे का ?’ महर्षि शिंदे.

‘ आपल्याबरोबर ती पंगत होईल, याची मला खात्री आहे.’ यशवंतराव

यशवंतरावांच्या बोलण्यातला ठामपणा पाहून महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी कराडला येण्यास होकार दिला.

कराडला आल्यावर कसे सारे नियोजन करावे ? कोणावर कोणती जबाबदारी द्यावी ? हे सारे प्रश्न यशवंतरावां समोर उभे राहिले. घरी आल्यावर त्यांनी आईला भीत-भीतच हे सांगितले. पण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व हरिजन मित्र यांना घरी येण्यास आईने आनंदाने लगेच होकार दिल्यामुळे यशवंतराव यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

महर्षी शिंदे कराडमध्ये आले. कराडच्या बुधवार पेठेत त्यावेळच्या महारवाड्यात नाईट स्कूल ची स्थापना महर्षी शिंदे यांच्या हस्ते झाली. महर्षी शिंदे यशवंतराव यांच्या घरी जेवायला गेले. त्यांनी यशवंतरावांच्या आईला हरिजनांबद्दल विचारले तेव्हा त्या माऊली म्हणाल्या की,

 ‘मला सारी मुलं सारखीच त्यात कसली जातपात ?’

महर्षि शिंदे यांचा यशवंतरावांनी कडील मुक्काम मोठा बहारीचा झाला. महर्षी शिंदे खूप खुश होऊन कराड मधून परतले.

  •  कपिल जाधव
Leave A Reply

Your email address will not be published.