मराठ्यांतर्फे इंग्रजांशी शेवटचा लढा यशवंतराव होळकरांच्या लेकीने दिला होता..

असं म्हणतात की मराठ्यांना हरवून इंग्रजांनी भारत ताब्यात घेतला. अनके इतिहासकार या दाव्याला खरे मानतात. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात उत्तरेत मुघल शीख राजपूत अशा सर्व राजांचा पाडाव झाल्यावर दक्षिण भारतात सर्वात प्रबळ सत्ता मराठ्यांचीच होती.

इंग्रजांना भारत जिंकायचं असेल तर मराठ्यांना हरवणे भाग होते.

त्याकाळी मराठी सत्तेची सूत्रे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या हातात होती. शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला छत्रपती शाहू महाराजानी मराठा साम्राज्य बनवलं. पहिले बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर अशा अनेक वीर योध्दे मुत्सद्यांमुळे हि सत्ता अटकेपार पोहचली.

पण दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या संशयी स्वभावामुळे सरदारांच्यात दुही पाडण्याच्या धोरणामुळे या साम्राज्याला घरघर लागली.

इंग्रजांनी उत्तर भारतात आपले आसन स्थिर केल्यानंतर त्यांनी दक्षिण भारतातही प्रदेश मिळविण्यास सुरुवात केली. इंग्रज व मराठे ह्यांच्यात झालेल्या तीन युद्धानंतर मराठी सत्तेचा शेवट होऊन जवळजवळ संपूर्ण भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला, म्हणूनच भारतीय इतिहासात या युद्धांना महत्त्वाचे स्थान आहे.

अठराव्या शतकात इंग्रजांना पळताभुई करणारा वीर योद्धा होता यशवंतराव होळकर. त्यांनी संपूर्ण भारतभरात इंग्रज सत्तेविरुद्ध आघाडी उघडली होती. मात्र दुर्दैवाने यशवंतराव होळकरांना दीर्घायुष्य लाभलं नाही. वयाच्या पस्तिसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं. मराठा साम्राज्यातल्या शेवटच्या प्रभावी योद्ध्यांपैकी एक होते. त्यांच्या जाण्याने इंग्रजांना दक्षिण भारत खुले मैदान वाटू लागले.

पण मल्हारराव अहिल्याबाई यशवंतराव यांची परंपरा सांगणाऱ्या होळकरी सैन्याने हार मानली नाही. यशवंतरावांच्या पत्नी तुळसाबाई यांच्या नेतृत्वाखाली आपला लढा सुरूच ठेवला.

इंदौरला तेव्हा बारा वर्षांचे दुसरे मल्हारराव गादीवर बसले होते. अल्पवयीन मल्हाररावांना आपल्या दबावात आणण्यासाठी  इंग्रज रेसिंडेटने लुडबूड वाढवली होती तेव्हां मल्हाररावानी आपली बहीन भीमाबाईचा सल्ला घेतला.

भीमाबाई यांचा विवाह बुळे सरकार यांच्यांशी झाला होता पंरतु काही दिवसातच त्यांना वैधव्य आल्याने त्या आपल्या माहेरी पित्याकडे येवुन राहिल्या. याच काळात त्या शस्त्र चालवण्यात व घोडेस्वारीत निपुण झाल्या अंत्यत स्वाभीमानी शुर व धाडसी पराक्रमी पुरुषा सारख्या त्या युद्धकलेत पारगंत होत्या.

भीमाबाईनी मल्हाररावांना स्पष्टपणे सांगीतले,

“आपल्या राज्यकारभारात लुडबुड करण्याचा इंग्रजांना कुठलाही अधिकार नाही म्हणुन त्यांच्यासोबत आपण युध्द करुन त्यांच्या या कारवाया थांबवल्याच पाहीजे”

मल्हाररावांनी तुळसाबाईंच्या नेतृत्वाखाली गुप्तपणे युध्दाची तयारी सुरु केली. सैन्यभरती करुन नव्या सैनिकांना राज्यात ठिकठिकाणी प्रशिक्षण दिले जावु लागले शस्त्रास्त्रांची खरेदी सुरु केली. तुळसाबाई मोठ्या वीर योद्ध्या होत्या. त्यांचा दरारा मोठा होता.

मल्हाररावांच्या सैन्यात दहा हजार पायदळ ,पंधरा हजार घोडेस्वार होते ल शेकडो चांगल्या तोफा होत्या आपले सैन्य घेवुन मल्हाररावांनी तुळसाबाई भीमाबाईसह महिदपुरला तळ ठोकला. स्वत: भीमाबाईनी सैनिकी वेश धारण करुन सैन्याला प्रोत्साहीत होत्या. 

इंग्रज अधिकारी हिस्लॉप आणि हंट यांना हे समजताच ते महिदपुरला आपले सैन्य घेवून आले त्यांच्या सैन्यात थोडे गोरे व देशी सैनिक होते हिस्लॉप व हंट हे दोघेही अनुभवी सेनाधिकारी होते त्यास रणकुशलतेचा गर्व होता. इंग्रजांनी महाराणी तुळसाबाईंना क्षिप्रा नदीच्या तीरावर तह करतो असे सांगून  कपटाने बोलावून घेतले. त्या प्रसंगी काही तरी गैरसमज झाला व तुळसाबाईंचा खून करण्यात आला.

तुळसाबाईंच्या नंतर होळकरी सैन्याची सूत्रे भीमाबाई यांनी हातात घेतली.

दिनांक २१ डिसेंबर १८१७ ला इंग्रज अधिकारी थॉमस हिस्लोपच्या सैन्यावर होळकर सैन्य तुटुन पडलं. होळकर सैन्याचं नेतृत्त्व २२ वर्षाच्या भीमाबाई होळकर करत होत्या. होळकरांच्या तोफखान्याचा मारा सुरू झाला आणि इंग्रजांना पळता भूई थोडी झाली. माहिदपूरच्या लढाईत इंग्रजांचा पराभव होणार हे निश्चीत होतं.

फितूरानं केला घात.

लढाई निर्णायक वळणावर आली होती. होळकर सैन्य जिंकणार हे निश्चीत असतानाचं. होळकरांच्या बाजूने लढणाऱ्या गफूरखानाने गद्दारी केली. त्याची फौज त्यानं युद्धातून मागे घेतली. होळकरांचा पराभव झाला. त्यानूसार झालेल्या करारात होळकारांनी मोठा प्रांत गमावला. ज्यात संपूर्ण खानदेश आणि सातपूडा प्रदेशातील भाग हातचा सोडावा लागला.

मराठ्यांतर्फे दिलेल्या शेवटच्या लढ्यांपैकी हा एक. तिसरे इंग्रज मराठा युद्ध तिथे संपले. १ जानेवारी १८१८ रोजी बाजीराव पेशव्यांचा कोरेगाव भीमा येथे पराभव झाला आणि भारत पूर्णपणे पारतंत्र्यात गेला. 

भीमाबाई होळकर यांनी दिलेला लढा पुढे झाशीच्या राणींसारख्या विरांगनांना प्रेरणा देणारा ठरला. आजही मध्यप्रदेशमध्ये भीमाबाई होळकर यांच्या गाथा सांगितल्या जातात. एक कवी म्हणतो,

” वीर,शेरनी लडणेवाली, रण से हुई सगाई थी ! खुब लडी मर्दानी रन मे, वह तो भीमाबाई थी”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.