यशवंतराव मोहिते फिक्सिंग करून मुख्यमंत्रीपदाची निवडणूक लढवायला उतरले होते….

हल्लीच्या काळी पक्ष कोणताही असो मुख्यमंत्री कोण होणार हे दिल्लीत फायनल होते. पक्षश्रेष्ठींचा आदेश येतो आणि मुख्यमंत्री महोदयांचं नाव जाहीर होते. मात्र राजकारणात काहीस मागे जाऊन बघितले तर आधी मुख्यमंत्रीपदासाठी राज्यातचं काही इच्छुकांची नाव फायनल व्हायची, त्यांच्यात निवडणूक व्हायची आणि आमदारांच्या मताने निवड व्हायची.

मात्र यातील देखील एका निवडणुकीत यशवंतराव मोहिते फिक्सिंग करून उतरले होते. खुद्द अकलूजच्या शंकरराव मोहिते पाटील यांनी याबाबतचा किस्सा सांगितला आहे.

आणीबाणीनंतरचा काळ होता. कॉंग्रेसची केंद्रात चांगलीच पिछेहाट झाली होती. तर त्याचवेळी महाराष्ट्रात देखील दोन शकले झाल्याने कॉंग्रेस विभागली होती. विधानसभा निवडणूकीच्या निकालात देखील कॉंग्रेसला दोन आकडी जागांवरच समाधान मानायला लागले होते. कॉंग्रेसची अशी दयनीय अवस्था बघून कृष्णेचा वाघ म्हणजे वसंतदादा आपली राजकीय संन्यासाची घोषणा गुंडाळून पुन्हा राजकारणात सक्रीय झाले होते.

पुढे दोन्ही कॉंग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी शंकरराव चव्हाण यांच्यानंतर नेतृत्व बदलाची खलबते सुरू झाली होती. यात अनेक इच्छुकांनी आपापल्या परीने रान बांधयला सुरुवात केली. वसंतरावदादा पाटील स्वतः इच्छूक नव्हते पण त्यांचे नाव मात्र मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर होते. सोबतचं संघटनेतील काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळून देखील वसंतदादांच्या मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न सुरु केले होते.

यात सगळ्यात आघाडीवर नाव होतं ते म्हणजे अकलूजच्या शंकरराव मोहिते यांचं. शंकररावांसारख्या संघटनेतील इतर नेत्यांना देखील वसंतदादाच मुख्यमंत्री व्हावेत असं तीव्रतेने वाटत होते. शंकररावांनी तर सांगलीच्या भर सभेत तशी प्रतिज्ञाच केली होती. नेतृत्व बदलाची ही संधी सोडायची नाही या निर्धाराने ते कामाला लागले.

वसंतदादांना मुख्यमंत्रिपदावर बसवण्यासाठी शंकररावांनी मोर्चेबांधणी सुरु केली. प्रत्येक आमदाराला त्यांनी वैयक्तिक भेटायला सुरुवात केली. गोंधळलेल्या मनःस्थितीतील अनेक आमदारांशी त्यांनी चर्चा करून त्यांचे मन वळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आणि वसंतदादाच्या बाजूने बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा मिळवण्यात शंकरराव यशस्वी झाले होते.

इकडे दादा देखील तो पर्यंत मुख्यमंत्री पदाची जबाबदारी संभाळण्यासाठी तयार झाले होते. सोबतचं शंकररावांसारख्या माणसांचा देखील आग्रह दादांनी मोडला नाही. बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा मिळाल्यामुळे आता दादांची मुख्यमंत्री होण्याची केवळ औपचारिकताच बाकी उरली होती. दुसऱ्या दिवशी रीतसर राज्यपालांकडे जाऊन पुढील बाबींची पूर्तता करायची असे ठरवून शंकरराव आपल्या मुक्कामी आले.

मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच फोनवरून धक्का देणारी एक बातमी शंकरराव मोहित्यांना समजली. यशवंतराव मोहिते हे राजारामबापू पाटील यांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदाच्या मैदानात उतरल्याची ती बातमी होती. शंकरराव मोहित्यांना आश्चर्याचा धक्का बसला. यशवंतराव कित्येक वर्षांपासूनचे जिवाभावाचे मित्र असूनही त्यांनी अचानकपणे आपल्याला कल्पना न देता असे कसे काय केले? असा प्रश्न त्यांना पडला.

शंकररावांनी तडक यशवंतरावांच घर गाठलं. तिथं गेल्यावर दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. शंकररावांनी घडल्या प्रकाराबद्दल विचारले असता यावर यशवंतरावांनी त्यांना आतल्या खोलीत नेले आणि सांगितले की,

“पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी हे केलं आहे, तुम्ही काही काळजी करू नका.” आणि लगेच शंकरराव बंगल्याबाहेर पडले.

पत्रकारांच्या प्रश्नांना मुत्सद्दीपणे उत्तरे देत गाडीत बसून थेट वसंतदादांकडे आले. दुसऱ्या दिवशी सर्व प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या, ‘शंकरराव मोहितेंचा यशवंतराव मोहितेंना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा.’ सारेच चक्रावून गेले. लोकांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण झाले. राजकारण्यांची चांगलीच करमणूक झाली.

इकडे काँग्रेस विधिमंडळ सदस्यांची बैठक सुरू झाली. निवडणूक पद्धतीने बहुसंख्य आमदारांनी वसंतदादांना मुख्यमंत्रिपदी निवडले होते. यशवंतराव मोहितेंनी देखील दादांचे अभिनंदन केले. १७ एप्रिल १९७७ रोजी संध्याकाळी राजभवनावर वसंतदादांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांकडून शपथ घेतली. सोबतच मंत्रीमंडळात अर्थखात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून यशवंतराव मोहितेंनीही शपथ घेतली होती.

एकूणक अखेरपर्यंत केवळ यशवंतराव मोहिते आणि शंकरराव मोहिते या दोघांनाच माहित होते की मुख्यमंत्री वसंतदादाचं होणार आहेत. मात्र केवळ पक्षात लोकशाही रहावी, आपले देखील स्पर्धक आहेत याची सातत्याने जाणीव रहावी यासाठी यशवंतराव मोहिते मुख्यमंत्री पदाच्या निवडणूकीत उतरले होते.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.