यशवंतराव मोहित्यांच्या पत्नीने आयडिया सुचवली आणि बाळासाहेबांना कलानगर मिळाले

वांद्रेमधील कलानगर म्हंटल की पहिल्यांदा आठवत ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव आणि त्यांचा जुना ‘मातोश्री’ बंगला. तो जिथे आहे तिथे ‘कलानगर’ नावाचा भला मोठा बोर्ड दिसतो. मुंबईतील सगळ्यात व्हीआयपी भाग असल्यामुळे इथे पोलिसांचा सतत पहारा असतो. त्यामुळे कलानगर परिसराची ओळख मातोश्री अशीच काहीशी झाली आहे.

पण बाळासाहेब ठाकरेंशिवाय या कलानगरची अजून एक जुनी ओळख म्हणजे, कलासक्त लोकांची किंवा कोणत्या ना कोणत्या कलेची जोपासना करणाऱ्या कलाकारांची वस्ती अशी आहे. चित्रकार, शिल्पकार, साहित्यिक आणि आर्किटेक्ट अशा अनेक कलांना वाहून घेतलेल्या लोकांची घर असलेले नगर म्हणजेच कलानगर.

सुरुवातील व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे, शिवाजी पार्कवरील अश्वारूढ पुतळ्याचे शिल्पकार पानसरे आणि आजगावकर, तसेच होमी भाभा यांचे पोर्ट्रेट तयार करणारे शिल्पकार दवेरवाला अशा अनेक कलाकारांची घर या परिसरमध्ये उभी राहिली.

तर अश्या या कलासक्त लोकांच्या ‘कलानगर’ परिसराचा देखील फार जुना इतिहास आहे.

या वसाहतीची संकल्पना पुढे आली ती १९५२ मध्ये. त्यावेळी शिल्पकार पानसरे आणि आजगावकर, तसेच दवेरवाला यांनी मिळून कलाकार लोकांची कॉलनी उभी राहावी, यासाठी देवनारला मोठी जागा विकत घेतली.

पण काही कारणांसाठी सरकारला ही जागा हवी होती. त्या मोबदल्यात सरकार त्यांना ठराविक रक्कम देऊ करेल असे ठरवण्यात आले. मात्र पानसरे, दवेरवाला आणि आजगावकर यांनी सरकारकडे जमिनीच्या मोबदल्यात जमिनीचीच मागणी केली. या मागणीवर ते अडून बसले.

अखेरीस सरकारने ही मागणी मान्य करायचे ठरवले.

मग या कलाकार लोकांनी पर्यायी जागेची शोधाशोध सुरु केली. वांद्रेजवळील एक प्रशस्त जागा बघण्यात आली. आणि या जागेची मागणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मुळात शिल्पकार मंडळींकडे सामान खूप असते, त्यामुळे ते ठेवण्यासाठी त्यांना मोठी जागा आवश्यक असते. म्हणूनच या जमिनीची मागणी करण्यात आली होती.  

बाळासाहेब ठाकरे देखील मार्मिक आणि व्यंगचित्रकार म्हणून या कलाकारांसोबत आले

या सगळ्या गोष्टी जुळून येण्यासाठी १९६७ साल उजाडले. तो पर्यंत इकडे कॅबिनेटमध्ये बदल होऊन गृहनिर्माण मंत्री म्हणून यशवंतराव मोहिते आले होते. त्यांची ओळख म्हणजे अत्यंत तत्वनिष्ठ माणूस.

त्यावेळी शिवसेनेची नुकतीच स्थापना झाली होती, बाळासाहेबांना राजकीय वलय मिळाले होते. सोबतच मार्मिकमुळे राजकीय लोकांशी ओळख होती. साहजिकच या प्रस्तावाची आणि गृहनिर्माण मंत्र्यांना भेटण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर आली.

बाळासाहेब यशवंतरावांना भेटण्यासाठी जाणार त्यावेळी यशवंतराव आपल्या मूळगावी कराडजवळील रेठऱ्यामध्ये होते. 

जेष्ठ पत्रकार मधुकर भावे या भेटीदरम्यानची आठवण सांगताना म्हणतात,

बाळासाहेब ठाकरे यशवंतराव मोहित्यांच्या घरी कराडजवळील रेठऱ्याला आले. आणि वांद्रेमधील संबंधित जागेची माहिती सांगितली.

तेव्हा यशवंतरावांनी बाळासाहेबांना प्रतिप्रश्न केला, सहकारी आहे का? नाही असे उत्तर येताच, बाळासाहेबांची मागणी त्यांनी धुडकावून लावली. स्पष्ट शब्दात ‘देणार नाही’ म्हणून यशवंतरावांनी सांगून टाकले.

पुढे ‘एक सोसायटी तयार करा, तरच तुम्हाला जागा देण्यात येईल. अशी अट घातली.

इथे यशवंतरावांच्या पत्नी जाई मोहिते वनाआक्का यांनी बाळासाहेबांना माघारी बोलावून घेतले आणि म्हणाल्या,

मार्मिक मध्ये मी तुमची व्यंगचित्र खूप छान पाहते. तुम्ही यांना पण (यशवंतराव मोहिते) टोकता, आम्ही त्यांची खूप मजा घेतो. एक काम करा तुम्हीच एक ‘सहकारी सोसायटी’ स्थापन करून टाका, तुम्हाला लगेच जागा देऊन टाकतील.

पुढे सगळ्या कलाकार मंडळींनी एकत्र येऊन ‘कलानगर सहकारी गृहनिर्माण संस्था’ तयार केली. आणि त्यानंतर त्यांना ही जागा मिळाली.

सध्या पहिला भाग चित्रकार आणि शिल्पकार या मंडळींचा असून त्यात ३८ प्लॉट आहेत. तसेच पानसरे आणि दवेरवाला यांना हा परिसर पूर्णत: सांस्कृतिकदृष्ट्या विकसित करायचा होता. म्हणूनच या परिसरात लहान-मोठया समारंभासाठी एक हॉल, एक लायब्ररी, एक उद्यान असावे अशी रचना करण्यात आली होती.

यापैकी उद्यानाच्या काही भागांवर इमारती उभ्या आहेत. तिथे जे सभागृह आहे, त्या ठिकाणी पूर्वी तिथे विजय केंकरे यांच्या नाटकाच्या तालमी होत असत. अजूनही तिथे काही सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने होत असतात.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.