अजातशत्रू व्यक्तीमत्व असणाऱ्या यशवंतराव चव्हाणांवर खूनी हल्ला झाला होता.

यशवंतराव चव्हाण हे अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. सभ्य राजकारणाचा पाया रचणार व्यक्तीमत्व म्हणून यशवंतराव चव्हाणांकडे पाहिल जातं. मात्र अशाच शांत, संयमी यशवंतरावांवर खूनी हल्ला करण्यात आला होता. विशेष म्हणजे या हल्ल्याला राजकारणाहून अधिक किनार होती ती व्यक्तीगत बदल्याची.

साधारण एकोणीसशे सत्तेचाळीस, अठ्ठेचाळीस दरम्यानची गोष्ट. यशवंतराव चव्हाण तेव्हा मुंबई गृहखात्याचे उपमंत्री होते. याच काळात आमदार चंद्रोजी पाटील यांच्या खूनाचा आळ घेवून यशवंतरावांचे जिवलग मित्र के.डी. पाटील यांची हत्या करण्यात आली होती. खूनाच्या बदल्याच्या या राजकारणात के. डी. पाटलांचे जीवलग मित्र म्हणून यशवंतराव चव्हाण यांच नाव गोवण्याचा देखील प्रयत्न करण्यात येत होते. यशवंतरावांना देखील संपवायचं या हेतूनं लोकांनी यशवंतरावांवर खास पाळत ठेवली होती.

दरम्यान यशवंतराव चव्हाण गृहखात्याचे उपमंत्री असल्याने ते सहसा मुंबईच्या बाहेर देखील पडत नसत. त्यामुळे हल्लेखोरांना नेमकी संधी मिळत नव्हती..

अशातच एकेदिवशी यशवंतराव चव्हाणांचे मोठ्ठे बंधू आजारी असल्याची बातमी यशवंतरावांना मिळाली. यशवंतरावांनी वेळ न दवडता कराडला धाव घेतली. खाजगी मोटारीने यशवंतराव दूपारी तीनच्या सुमारास कराडला पोहचले. कराड स्टेशनच्या जवळ असणाऱ्या कल्याणी बिल्डींग येथे यशवंतरावांचे मोठ्ठे बंधू राहिले होते. आजारी असणाऱ्या आपल्या भावाबरोबर आजची रात्र थांबावं या विचाराने यशवंतरावांनी कल्याणी बिल्डींगमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला.

रात्री यशवंतराव चव्हाण बिल्डींगच्या गच्चीमध्ये सिगरेट पित उभा होते. त्यांना दूरवर असणारं कराडचं स्टेशन या गच्चीतून दिसत होतं. विचाराच्या तंद्रीत ते रेल्वेच्या फाटकाकडे पाहत असताना त्यांना लाल सिग्नल पडलेला दिसला. तो सिग्नल पाहूनच एकाएकी यशवंतरावांनी मध्यरात्री पुण्याला परतण्याचा निर्णय घेतला.

यशवंतराव आत आले आणि बॅग भरुन निघू लागले. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न त्यांच्या बहिणीने आणि भावाने केला पण यशवंतरावांनी ठामपणे पुण्याला परत जात असल्याचं सांगितलं. यशवंतरावांनी तडकाफडकी बॅग भरली आणि स्टेशनवरुन पुण्याला जाणारी गाडी पकडली.

दरम्यान मध्यरात्री दोनच्या सुमारास,

कल्याणी बिल्डींगमध्ये आठ दहा बंदूका घेतलेले, हातात कुऱ्हाड आणि काठ्या असणारे मारेकरी शिरले. यशवंतराव ज्या घरी थांबले आहेत त्या दरवाज्यावर कुऱ्हाडीचे घाव बसू लागले. दरवाजा मोडला पण आतमध्ये यशवंतराव सापडले नाहीत. मारेकरी पळून गेली. इतक्यात कल्याणी बिल्डींगवर झालेल्या हल्यात यशवंतरावांना पळवून नेल्याची अफवा संपुर्ण शहरात झाली. सर्वत्र अफरातफरी माजली. पोलिसांनी यशवंतराव पुण्यात पोहचले की नाही याची देखील माहिती घेण्यास सुरवात केली.

यशवंतराव चव्हाण पुण्याच्या इन्स्पेक्शन बंगल्यावर पोहचून झोपले होते. पुणे पोलिसांनी यशवंतराव सुखरुप असल्याची तार कराड पोलिसांना पाठवली तेव्हा कुठे यशवंतरावांच्या कार्यकर्त्यांना धीर मिळाला.

याबाबत यशवंतराव चव्हाण म्हणतात की, त्या प्रसंगाची मला जेव्हा जेव्हा आठवण होते तेव्हा मला बोलवणारा तो रेल्वेचा सिग्नल दिसू लागतो. त्या सिग्नलच्या बोलवण्याचा अर्थ समजून घेण्याचा मी खूप प्रयत्न केला. परंतु या सर्व गोष्टीचा अन्योन्यसंबध जुळवून देणारा मला अजून कोणीच भेटला नाही. एवढे मात्र खरे, की तो खुणेचा हात नियतीचा होता, असे मला नेहमी वाटते.

या घटनेच वर्णन यशवंतराव चव्हाण आपल्या ऋणानुंबध पुस्तकात करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.