संमेलनाला येवू नका, यवतमाळचे मांडे खायला या.

एकदा यवतमाळात एक संमेलन झालं. प्रभावी वक्ते, उकृष्ट नियोजन, सर्व लोकांचा समावेश यामुळे हे संमेलन यशस्वी ठरलं. सोबतच हे संमेलन लक्षात राहिलं ते मटन मांड्यामुळे. आता तुम्ही म्हणाल की, संमेलन आणि मांड्यांचा काय संबंध. हे म्हणजे कुंडलकर आणि यवतमाळचा जसा काही संबंध नाही तसा प्रकार वाटतो. तर याचा अगदी जवळचा संबंध आहे.

या संमेलनामुळे मांडे या खाद्यप्रकाराला पुनरुज्जीवन मिळालं व ते समतेचा एक वाहक बनलं.

मांडे म्हणजे अर्धा एक तास गव्हाचे पीठ पाण्यासोबत आपटून मडक्यावर तयार केलेल्या पोळ्या. विदर्भात काही मैलावर याचं नाव बदलत जातं. कुठे हे मांडे असतात कुठे रोट्या, लांबपोळ्या, लंब्यारोट्या, रांदण्या रोट्या. तर सर्वात आधी या मांड्यांचा आणि खानदेशात मिळणा-या मांड्यांचा विशेष असा संबंध नाही. (जसा संमेलनाच्या आयोजकांचा आणि साहित्याचा विशेष संबंध नाही अगदी तसाच) फक्त मडक्यावर बनवणे इतकंच यात साम्य आहे.

विदर्भात ही कला केवळ बौद्ध (पूर्वाश्रमीचे महार) महिलांकडे आहे असं बोललं जातं.

इतर समाजातील लोक हे खात नव्हते. मांडे बनवणारी एक आजी सांगत होती की कधी खायला बोललवे तर कच्या असतात, पोट खराब होते असं कारणं देऊन टाळायचे. मात्र भेदभाव या मागचं मुख्य कारणं. विदर्भात इतर समाजातील महिलांकडे ही कला असलेलं माझ्या तरी पाहण्यात नाही. मांडे बनवणे हे अतिशय किचकट आणि कलापूर्ण आहे. अगदी गहु निवडण्यापासून ते जाळ किती असावा यापर्यंत.

लांबपोळ्याला चिकट असा गहू हवा असतो. केवळ महागातला गहू घेतला म्हणजे मांडे होईल असं नाही. योग्य तो गहू निवडावा लागतो. पिठाला सुमारे अर्धा ते पाऊन तास पाण्यात मिसळून आपटले जाते. हे पिठ इतकं चिकट केलं जातं की या पोळ्या पोळपाट आणि लाटण्याऐवजी फक्त हातावर करता आल्या पाहिजे. या पोळ्या मडक्यावर खरपूस भाजल्या जातात. या पोळ्या इतक्या पातळ असतात की आपला न्यूजपेपरचा कागदही त्यापुढे जाड असतो.

लांबपोळ्या, मांडे बनवायची कला ही जवळपास लोप होत चालली होती. केवळ बोटावर मोजता येणा-या महिला मांडे बनवायच्या. यामागे असलेली प्रचंड मेहनत. खाणारेही एकाच समाजातील लोक होते. शिवाय एका किलोच्या पोळ्यासाठी दोन ते तीन तास वेळ देणं परवडणारं नव्हतं.

सुमारे 15 वर्षांपूर्वी यवतमाळ येथे डॉ. हर्षदीप कांबळे हे जिल्हाधिकारी म्हणून आले होते. त्यांनी समता पर्वाची सुरुवात केली. समता पर्व म्हणजे 11 एप्रिल महात्मा फुलेंची जयंती ते 14 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपर्यंत चालणारा एक महोत्सव. या महोत्सवात सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश असतो. आजही हे समता पर्व सुरू आहे.

केवळ साहित्य, विचार, नाट्य, संगीत यांचंच संवर्धन होणं हे समता पर्वाचं उद्धीष्ट नसावं तर खाद्य संस्कृती यांचंही यातून संवर्धन व्हावं हा यामागचा उद्देश होता. समता पर्व जेव्हा सूरू झालं तेव्हा तिथे पहिल्यांदाच मांड्यांना स्टॉल देण्यात आले. व्यावसायिकरित्या पहिल्यांदाच हे मांडे विकले जात होते. सुमारे 5-7 स्टॉल पहिल्या वेळी लागले. हे मांडे मांसाहारी खवय्यांसाठी मटन सोबत मिळायचे तर शाकाहारी लोकांसाठी पाटवडी, वांग्याची भाजी किंवा डाळभाजी हे ऑप्शन असायचे. उन्हाळ्यात आंब्यांचा सिजन असल्याने आमरसही मांड्यांसोबत उपलब्ध होता.

समता पर्व हा असा कार्यक्रम होता जिथे पहिल्यांदाच सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आले.

आधी केवळ बौद्ध समाजापुरते असलेले हे मांडे या कार्यक्रमाच्या निमित्ताने इतर समाजातील लोकांपर्यंत पोहोचले. आयुष्यात कधी मटन मांडे, वांगे मांडे किंवा आमरस मांडे न खाल्लेल्या खवय्यांना हा प्रकार चांगलाच आवडला. चार दिवस रोज त्यावर उड्या पडल्या. काही लोक तर समता पर्वात केवळ मटन मांडे खाण्यासाठी यायचे असेही बोलले जायचे. तिथून मांड्यांना व्यावसायिक रूप मिळालं. समता पर्व संपल्यावरही मागणी असल्याने त्यानंतर घरून मांड्यांची विक्री सुरू झाली.

त्यानंतर काही महिन्यांनी स्मृती पर्व सुरू झालं. इथे ही मांड्यांना स्टॉल मिळाले. यावेळी स्टॉलची संख्या वाढली. आज समता पर्वात हे स्टॉल 15 च्या जवळपास असतात. यवतमाळमध्ये शेकडो महिला मांडे बनवतात. आधी बोटावर माजता येणारी लोकांकडे असलेली ही कला याला व्यावसायिक रूप मिळाल्याने पुढच्या पिढीकडे गेली. आज पाटीपुरा, अशोकनगर, उमरसरा या भागात घरून मांड्यांची विक्री केली जाते. सव्वाशे ते दिडशे रुपये किलो दराने हे मांडे विकले जाते. 

सुप्रसिद्ध कवी आणि विचारवंत आनंद गायकवाड सांगतात की,

“खाद्य संस्कृतीचंही संवर्धन व्हावं हा समता पर्वाचा एक उद्धेश होता.”

आज पाहुणचार म्हटलं मटण मांडे आलेच. हे बनवणारे लोक जरी कमी असले तरी ऑर्डर करून बोलवणारे अधिक आहेत. त्यामुळे यवतमाळात शेकडो महिलांना रोजगार मिळाला. जर समता पर्वात मांड्यांना व्यावसायिक रूप मिळालं नसतं तर हा प्रवास संपूर्ण विदर्भात पसरला नसता.

असं म्हणतात की कुणाच्याही मनात शिरण्याचा पोट राजमार्ग आहे. संस्कृतीमध्ये वेश, भाषा, सण, उत्सव इत्यादीसोबतच आहार येतो. आहाराचा संबंध केवळ पोटापुरता नसतो तर तो संस्कृतीशी जुळलेला असतो. सर्व संस्कृती एकमेकांना जुळलेली असते. संस्कृतीच्या देवाणघेवाणात एकतर संकोच असतो किंवा कुतुहल. संकोचामुळे बरेचदा आपण दुसरी संस्कृती स्वीकारात नाही, त्यामागे सामाजिक पार्श्वभूमी असते. मांडे हे न स्वीकारण्याच्या माग फक्त संकोचच नाही तर त्यामागे वर्णव्यवस्थेची नजरकैदही होती. मात्र संकोच आणि कुतुहल यात अखेर कुतुहल विजयी झालं.

आज विदर्भात प्रत्येक मोठ्या कार्यक्रमात संमेलनात मांड्यांचा स्टॉल असतो. याची सुरूवात ही समता पर्वापासून झाली. विविध बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला मांडे बनवून विकतात. व्यावसायीक रूप मिळाल्याने ही कलाही पुढच्या पिढीपर्यंत गेली आहे. आधी मागणी नव्हती त्यामुळे पुरवठा नव्हता.

केवळ एका समाजापुरतं असलेले हे मांडे आज सर्व समाजातील लोक कोणताही भेदभाव न ठेवता आवडीने खातात. समता पर्वात व्यावसायिकरित्या सुरू झालेले मांडे खऱ्या अर्थानं समाजात समता प्रस्थापित करणारे ठरले.

तुम्ही यवतमाळला साहित्य संमेलनात गेलात आणि मध्येच जर बहिष्कार टाकायचा विचार आल्यास थेट पाटीपुरा, अशोक नगर गाठा. तिथून मांडे पार्सल घ्या आणि मेडिकल कॉलेज रोडवरच्या खाऊ गल्लीत शिरा. जिथे चुलीवर जे हवे ते बनवून मिळते. तिथे मस्त मटन मांड्यांवर ताव मारायला विसरू नका….

  • निकेश जिलठे (9096133400)

हे ही वाचा.

1 Comment
  1. Suneel Induwaman Thakre says

    वेगळा विषय उत्तमरीतीने हाताळला निकेशजी. अभिनंदन….

Leave A Reply

Your email address will not be published.