२००५ ते २०२२, वर्ष बदलली पण सौरव गांगुलीसोबतचं राजकारण नाही…

फिक्सर्स आहेत रे हे सगळे, यांच्या मॅच बघणं सोडून दिलं पाहिजे. पुतळा जाळून टाका, पोस्टरला काळं फासा…

ही होती भारतातल्या क्रिकेट चाहत्यांची साधारण १९९९-२००० सालातली प्रतिक्रिया. मॅच फिक्सिंग प्रकरणानं भारतीय क्रिकेटला जबरदस्त हादरा दिला होता, लोकांच्या मनातली क्रिकेटची, क्रिकेटर्सची प्रतिमा डागाळली होती.

बीसीसीआयनं या सगळ्यात सचिन तेंडुलकरवर कॅप्टन्सीची जबाबदारी दिली, सचिन जागतिक क्रिकेटचा सुपरस्टार होता, इंडियन क्रिकेटचं मार्केटही त्याच्याभोवतीच फिरत होतं. पण कॅप्टन्सीचा काटेरी मुकुट सचिनला काही झेपला नाही. त्यानं स्वतःहून बाजूला व्हायचं ठरवलं, भारतीय टीमची अवस्था आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी झाली होती.

अशावेळी टीमचा तारणहार ठरला, कॅप्टन सौरव गांगुली.

महाराजा हे टोपणनाव आणि ग्राऊंडमध्ये ड्रिंक्स न घेऊन जाण्याचा टगेपणा अंगात असणाऱ्या गांगुलीची निवड कित्येकांसाठी आश्चर्यकारक होती. पण शांत संयमी द्रविडपेक्षा दादाला प्राधान्य मिळालं आणि भारतीय क्रिकेटचं रुप बदललं. २००१ मध्ये फॉर्मातल्या ऑस्ट्रेलियाला टेस्ट सिरीजमध्ये हरवणं, २००२ मध्ये नव्या पोरांना घेऊन नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकणं आणि २००३ मध्ये वर्ल्डकप फायनलमध्ये धडक मारणं, गांगुलीच्या नेतृत्वात भारतानं बरंच यश मिळवलं.

दादा माणसं उभी करणारा लीडर ठरला…

आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन दादाची ‘हकालपट्टी’ झाल्याची बातमी. मध्यंतरी एक बातमी आली की, सुप्रीम कोर्टानं नियमात शिथिलता दिल्यानं गांगुली आणखी काळ बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर राहू शकतो. त्यानंतर बातमी आली की, गांगुली आयसीसीमध्ये मोठ्या पदावर जाणार आणि अखेर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी गांगुलीला पायउतार तर व्हावं लागलंच.

पण त्याचं नाव ना बीसीसीआयच्या कुठल्या पदाच्या शर्यतीत आहे आणि ना बीसीसीआयच्या पाठिंब्यावर आयसीसीमध्ये कुठल्या पदावर जाण्याच्या. थोडक्यात सांगायचं झालं, तर बीसीसीआयमधला गांगुली इरा संपुष्टात आलाय..

यामागंची बीसीसीआयनं दिलेली कारणं बघायची झाली तर…

‘क्रिकबझ’च्या एका बातमीनुसार, ‘बीसीसीआयची नवी कार्यकारिणी ठरवण्याच्या मिटिंगमध्ये गांगुलीला सांगण्यात आलं की, तुझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीवर आम्ही नाखूष आहोत. त्यात आतापर्यंत कुठल्या अध्यक्षानं सलग दोन फुल टर्म काम केलेलं नाही.’ यामध्ये एक मुद्दा असाही होता की, बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर असताना गांगुलीनं ज्या ब्रँडचं प्रमोशन केलं, त्या ब्रँडचे स्पर्धक बीसीसीआयचे स्पॉनर्स आहेत, त्यामुळे या ब्रँड्सची नाराजी बीसीसीआयला ओढवून घ्यावी लागली.

त्यात गांगुलीला अध्यक्षपदाच्या बदल्यात आयपीएलच्या चेअरमनपदाची संधी देण्यात आली होती, पण एका पद्धतीनं हे डिमोशनच होतं जे स्वीकारायला गांगुलीनं अर्थातच नकार दिला.

आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी यांचं नाव जवळपास निश्चित झालंय, तर सचिवपदी जय शहा कायम आहेत. तर खजिनदार असणारे अरुण धुमाळ आता आयपीएलचे चेअरमन असतील आणि त्यांच्याजागी आशिष शेलार हे बीसीसीआयचे नवे खजिनदार असतील.

थोडक्यात अध्यक्षपदी रॉजर बिन्नी असले, तरी ‘जय शहा टीम’चं  वर्चस्व असल्याचं दिसून येतं.

पण या सगळ्या झाल्या २०२२ मधल्या घडामोडी, पण असंच सगळं सौरव गांगुलीसोबत २००५ मध्येही घडलं होतं. तेव्हाही तो असाच अलगद बाजूला झाला होता…

गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय टीमची जोरदार घौडदौड सुरू होती. पण अशातच दादाचा फॉर्म हरवला, तेव्हा ग्रेग चॅपलनं जवळपास सात दिवस त्याला मदत केली आणि दादाची गाडी पुन्हा ट्रॅकवर आली. दादानं भारतीय संघाचा नवा कोच म्हणून चॅपलचंच नाव सुचवलं. पण ही गोष्ट ना भारतीय टीमच्या पथ्यावर पडली आणि ना सौरव गांगुलीच्या.

टीमबद्दलचे निर्णय, खेळाडूंची निवड यावरुन गांगुली आणि चॅपलचे होणारे वाद चांगलेच गाजले. एकदा तर गांगुलीनं जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली होती. चॅपल आपला ऑस्ट्रेलियन खडूसपणा जपत आपण काहीच न केल्याचा दावा करत होता, पण तरीही परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं सहज लक्षात येत होतं. भरीसभर म्हणून गांगुलीचा फॉर्मही गंडत गेला. त्यानं उभे केलेले झहीर, भज्जी, युवी, धोनी असे प्लेअर्स आता भारताची बाजू सांभाळत होते आणि दादावर टीममधून बाहेर जाण्याची टांगती तलवार होती. जो कॅप्टन टीम निवडतो, त्याच कॅप्टनची टीममध्ये निवड होणार का नाही यावर शंका होती. 

ऑक्टोबर २००५ मध्ये दुलीप ट्रॉफीच्या मॅचमध्ये खणखणीत शंभर लावत दादानं आपण अजून संपलो नसल्याचं दाखवून दिलं. पण लगेचच नोव्हेंबरमध्ये एका मॅचमध्ये झहीर खाननं दादाला दोन्ही डावात शून्यावर आऊट केलं. फॉर्म, वाद आणि गांगुलीचं ‘दादा’ असणं या सगळ्याचा परिपाक म्हणून नोव्हेंबर २००५ मध्ये गांगुलीला भारताच्या टेस्ट कॅप्टन्सीवरुन हटवण्यात आलं.

त्याच्याऐवजी राहुल द्रविड भारताचा कॅप्टन झाला. नंतर गांगुली २००८ पर्यंत भारताकडून खेळत राहिला, टीममध्ये अनेकदा आत बाहेर झालं. आयपीएलमध्येही त्यानं कॅप्टन्सी केली. दादाचा रुतबा कायम होता, पण कॅप्टन्सी त्याच्याकडे नव्हती. ज्याचं कारण आजही सांगितलं जातं ते म्हणजे, दादासोबत झालेलं राजकारण.

सध्याची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती बघितली तर एका गोष्टीत साम्य आहे आणि एका गोष्टीत फरक.

पहिलं बघुयात साम्य…

भारतीय टीममधला एखादा यशस्वी कॅप्टन शक्यतो आपल्यानंतर टीमची धुरा कोण सांभाळेल, हे ठरवून रिटायर होतो. धोनीनं रिटायर व्हायच्या आधीच, कोहलीला कॅप्टन म्हणून तयार केलं होतं. पण गांगुलीच्या बाबतीत तसं झालं नाही, त्याच्या जागी द्रविड कॅप्टन झाला आणि त्यानंतर या दोघांमध्ये झालेले वादही चांगलेच गाजले होते.

आता बीसीसीआयमध्ये जुना अध्यक्ष नव्या अध्यक्षाचं नाव सभेमध्ये सुचवत असतो, पण इथं रॉजर बिन्नीचं नाव गांगुलीकडून नाही, तर मॅनेजमेंटकडून आलं. यामागचं कारण गांगुलीची नाराजी होती की दुसरं काही,हे मात्र अजून तरी स्पष्ट झालेलं नाही.

आता बघू फरक…

२००८ मध्ये दादा आपली शेवटची टेस्ट मॅच खेळला. नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या या टेस्टमध्ये भारताचा कॅप्टन धोनी होता. मॅचच्या शेवटच्या दिवशी धोनीनं दादाला आजचा दिवस कॅप्टन्सी करण्याची विनंती केली, पण गांगुली नाही म्हणला.

मॅच सुरु असताना धोनीनं पुन्हा एकदा विनंती केली आणि आपल्या शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये काही वेळासाठी का होईना, पण टीमचं नेतृत्व करुन गांगुली शानमध्ये रिटायर झाला.

‘क्रिकबझ’च्या बातमीनुसार नवे अध्यक्ष आणि पदाधिकारी ठरवण्याच्या बैठकीत गांगुली काहीसा शांतच होता, मिटिंग संपल्यानंतर रुममधून सगळ्यात शेवटचा माणूस बाहेर पडला तो गांगुली. त्यानंतर तो एकटाच आपल्या गाडीत जाऊन शांतपणे बसला आणि गाडीच्या काचाही लावून घेतल्या. दुसरीकडे होऊ घातलेल्या अध्यक्षांचं अभिनंदन आणि कौतुक सुरु होतं…   

२०१९ मध्ये बीसीसीआय अध्यक्ष म्हणून सुरु झालेला दादाचा प्रवास, आता ‘पुढे काय’ या शब्दांपुढं एक मोठं प्रश्नचिन्ह घेऊन उभा आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.