कानडी जनतेला वाचवण्यासाठी शिवरायांच्या मावळ्यांनी रक्त सांडलं…

६ जून १६७४ रोजी राजधानी रायगडावर शिवराज्याभिषेक झाला. रयतेचे राजे छत्रपती झाले. संपूर्ण भारतभरासाठी ही क्रांतीकारी घटना होती. शेकडो वर्षांनी परकीय आक्रमकांच्या जुलमी कालखंडातून स्वातंत्र्याच्या दिशेने पहिलं पाउल पडल होतं.

गुलामगिरीत खितपत पडलेल्या गोरगरीब जनतेसाठी आशेचा किरण उगवला होता. नवे युग सुरु झाले होते.

यापूर्वी दक्षिणेतील विजयनगरचे साम्राज्य लोप पावल्यानंतर शाही राजवटीला आव्हान देऊ शकेल अशी कोणतीही सत्ता अस्तित्वात नव्हती. दिल्लीतील प्रबळ मोगलांपासून पोर्तुगीज इंग्रज यांच्या पर्यंत अनेकांना धडकी भरवणारे स्वराज्य महाराष्ट्राच्या कोपऱ्यात उगवले त्याचा आता वटवृक्ष बनत चालला होता. आता वेळ होती संपूर्ण देशभरात पाळेमुळे रोवण्याची.

छत्रपतींनी सत्ता विस्तारासाठी दक्षिणेकडे लक्ष वळवले. यासाठी एक महत्वाचे कारण ठरले म्हणजे विजापूरच्या आदिलशाहीतील राजकारण.

विजापूरमध्ये आदिलशाहीत दक्षिणी विरुद्ध पठाण असा संघर्ष त्यावेळी शिगेला पोहोचला होता. छ. शिवाजी महाराजांच्या वाढत्या बळास आवर घालण्यासाठी खवासखानाने मोगल सुभेदार बहादुरखानाशी केलेले सख्य त्याच्यावरच उलटले. राजकारणात त्याचा बळी पडला व विजापूर बहलोलखान या पठाणाच्या ताब्यात गेले.

या घटनेमुळे राजकारणाचा एकंदर नूरच पालटला.

विजापूरच्या अस्तित्वासाठी झगडा सुरू झाला.

या अस्थिर परिस्थितीत हिंदवी स्वराज्याचा ध्वज दक्षिणेत फडकवावा आणि भविष्यात अटळपणे होणाऱ्या मोगली आक्रमणाप्रसंगी दक्षिणेत संरक्षक जागा व उत्पन्न देणारा भाग स्वराज्यात असावा, असे महाराजांना वाटणे स्वाभाविक होते. गोवळकोंड्याचा कुतुबशहाचा त्यांना पाठींबा होता.

संघटित बळाच्या जोरावर दक्षिण पंथीयांची एकजूट साधून अवघ्या दक्षिणेतून मोगल निपटून काढावा, या हेतूने महाराजांनी दक्षिणेची मोहीम हाती घेण्याच ठरवलं.

अशातच छ. शिवाजी महाराजांच्याकडे कर्नाटकातून काही शेतकरी मंडळी आली.

मियाना बंधूनी आमच्या भागात उच्छाद मांडला आहे अस गाऱ्हाण सांगितलं.

आदिलशाही प्रदेशातील किल्ले कोप्पल येथे हुसेन खान मियाना नावाचा पठाण सरदार राज्य करत होता. त्याने व त्याच्या पठाणी सैन्याने शेतातील पिक लुटण्यास सुरुवात केली होती. आया बहिणींच्या अब्रूवर घाला घातला जात होता.  या जाचामुळे रयत त्रासली होती.

पठाणांचा बंदोबस्त करण्याची ताकद फक्त मराठ्यांच्यामध्ये आहे हे कानडी लोकांना माहित होत. शिवरायांनी त्यांना मदतीचे वचन दिले.

दक्षिण दिग्विजयाची मोहीम हाती घेतली गेली तेव्हा महाराजांना कुतुबशहाच्या भेटीसाठी भागानगर येथे जाणे गरजेचे होते. त्यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली दुसरी तुकडी कर्नाटकात पाठवली.

थंडीचे दिवस होते. हंबीरराव मोहितेंची सेना घटप्रभा, मलप्रभा नद्या ओलांडून कर्नाटकात उतरली. या सेनेत संताजी,धनाजी, मालोजी हे घोरपडे बंधू होते. सेनापतींनी त्यांना गजेंद्रगड ताब्यात घेण्यास सांगितले. घोरपडेनी हा गड सहज जिंकला. त्याची व्यवस्था लावून संताजी परत आले.

येलबुर्गा येथे हंबीरराव मोहितेंची छावणी पडली होती.

आपल्या जहागीरीतील मोक्याचे ठाणे गेल्यामुळे हुसेनखान पठाण भडकला. त्याने रातोरात येलबुर्ग्याच्या छावणीवर चालून आला. पठान आले, पठाण आले अशी हाकाटी उठली. सगळ्या छावणीत खळबळ उडाली.

संताजी-धनाजी या तरुण सरदारांनी त्याला रस्त्यातच अडवण्याची जबाबदारी घेतली. मियाना पठाण बंधू ५ हजाराचं भलंमोठ सैन्य घेऊन निघाले होते. स्वतः हुसेनखान हत्तीवर बसून चालून आला होता. त्यामानाने मराठ्याची ताकद खूपच कमी होती. खानाला मोठा आत्मविश्वास होता.

मात्र रात्रीच्या अंधारात वीज चमकावी तसे मराठा सैन्य पठाणावर तुटून पडले.

हंबीरराव मोहितेना चकित करण्यासाठी निघालेला पठाण स्वतःचा चक्रव्युव्हात अडकला. एकीकडे संताजी धनाजी पराक्रम दाखवत होते तर दुसरीकडे टेकडीवरून दुसरी फळी गोफणीने पठाणांना टिपत होती.

बाजी जेधे यांचा तरुण मुलगा नागोजी जेधे हा तर अभिमन्युप्रमाणे शत्रूच्या सैन्यात खोलवर घुसला.

थेट  खानाच्याहत्ती पुढे उभा राहुण समशेरीने त्याने हत्तीची सोंड कापून टाकली. भेदरलेला पठाणी सैन्याला तुडवत धावू लागला. नागोजीनी खानाला मारण्यासाठी भाला उगारला इतक्यात

हुसेन खानाने आपल्या धनुष्य बाणाने नागोजी जेधे यांचे मस्तक टिपले. थेट कपाळात बाण घुसला व हनूवटीतून बाहेर आला. सोबतच्या मराठा सैनिकांनी खानाला जिवंत पकडले. नागोजींच्या कपाळातून बाण उपसून काढल्यावर त्यांनी प्राण सोडले.

नागोजींचे वडील बाजी सर्जेराव जेधे शेजारीच उभे होते. त्यांच्या डोळ्यासमोरच हा तरुण मुलगा धारातीर्थी पडला होता.

हा प्रसंग दुःख करायचा नव्हता. त्यांनीच आपल्या सहकाऱ्याना धीर दिला.

हुसेन खानाचा पाडाव झाला. दोन्ही मियाना बंधूंना जेरबंद करून हंबीरराव मोहितेंच्या समोर उभे करण्यात आले.

त्याच मोठ सैन्य, २००० घोडी, शस्त्रास्त्रे ताब्यात आली होती. दक्षिण दिग्वीजयाची सुरवात मोठ्या पराक्रमाने झाली होती. याच येलबुर्गीच्या युद्धामुळे संताजी धनाजी यांना पहिली ओळख मिळाली. पठाणांचा बंदोबस्त केला म्हणून कानडी जनतेची दुवा शिवरायांना लागली. शत्रू कितीही मोठी सेना घेऊन आला तरी त्याचा पाडाव होऊ शकतोयाचा आत्मविश्वास मराठी मावळ्यांना आला.

पण या युद्धात नागोजी जेधे यांच्या सारखा वीरपुरुष कामी आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी कळाली तेव्हा त्यांना प्रचंड दुःख झाले. भागानगरला जाताना जेधेंच्या कारी या गावी जावून त्यांच्या घरच्यांचे सांत्वन छ. शिवाजी महाराजांनी जातीनिशी केले.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.