शंभूराजे जिवंत असूनही काही दिवस येसुबाईंना विधवेचे सोंग घ्यावे लागले होते..

वीर कन्या, वीर पत्नी, वीर स्नुषा आणि वीर माता….याच उत्तम उदाहरण म्हणजे  युवराज्ञी येसूबाई या होय !

म्हणून येसुबाईंच्या कार्यकर्तृत्व फार थोर आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची सखी पत्नी येसूबाई यांचे स्वराज्यासाठी केलेल्या कार्याची अजूनही इतिहासामध्ये फारशी माहिती मिळत नाही. युवराज्ञी येसूबाईबद्दल इतिहासात अधिक माहिती उपलब्ध नाही हे दुर्दैव कोणाचे ? आपले की इतिहासाचे ?

असो याच येसुबाईंनी छत्रपती संभाजी राजांच्या सोबत येसूबाई यांनी देखील स्वराज्य संस्थापनेत हातभार लावला. स्वराज्य चालवण्याच्या काळात येसूबाईयांनी अनेक बारीक-सारीक हालचालींचा, आंदोलनांचा बरा-वाईट भार सहन केला होता.

स्वराज्य पुढे नेण्यासाठी येसूबाई यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग नोंदवला आणि योगदान दिले.  जेव्हा संभाजी राजे लढायांमध्ये व्यस्त असायचे त्या दरम्यान स्वराज्याच्या प्रशासकीय कारकीर्दीची संपूर्ण जबाबदारी येसूबाई यांनीच सांभाळली होती.

येसूबाई या मुळच्या दाभोळ प्रांतातील शिर्के घराण्याच्या. शिर्के घराणे म्हणजे नावाजलेले शूर, धाडसी आणि विद्वानांचे घराणे म्हणून ओळखले जायचे. येसुबाईंची वडील पिलाजीराव शिर्के शृंगारपुराच्या सूर्यराव राजाच्या पदरी होते. सूर्यराव सुर्वे यांची कन्या ही येसुबाईंच्या मातोश्री होत्या.

१६६१ मध्ये शिवाजी महाराज दक्षिण कोकणाच्या स्वारीवर होते. राजांचे स्वारीला घाबरून सूर्यराव पळून गेला. त्याचे राज्य महाराजांनी काबिज केले त्या वेळी सूर्यरावांच्या पदरी असणारे पिलाजीराव शिर्के स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले.

पिलाजीराव शिर्के शृंगारपुरात महाराजांना मिळाल्यावर महाराजांनी  त्यांच्याशी नाते संबंध जोडले.

शिवाजी महाराजांची कन्या राज कुंवरबाई यांना पिलाजीराव यांचा पुत्र गणोजी राव यांना देण्याचं ठरलं तर पिलाजी रावांची कन्या येसूबाई ही शिवपुत्र संभाजी राजांना देण्याचे ठरले. आता खुद्द शिवाजीमहाराजांनी येसूबाईंना आपली सून म्हणून निवडले म्हणजेच महाराजांनी तिच्यातील वेगळे गुण पाहिले हे मात्र नक्की आहे. शेवटी छत्रपतींची सून होणे आणि तशी क्षमता असणे हे साधी-सोपी गोष्ट नव्हे.

येसूबाई आणि संभाजी राजांचा विवाह साधारणपणे १६६५ च्या दरम्यान झाला असावा. येसूबाई तेंव्हा किमान पाच ते सहा वर्षांच्या होत्या. येसुबाईंचे माहेरी असतांना आणि त्यानंतर सासरी  जिजाऊसाहेबांच्या सहवासात  सुद्धा शिक्षण झाले.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि त्यांच्या शिक्षणाला शिर्के आणि भोसले या दोन्ही घराण्यांमुळे वेगळेच तेज प्राप्त झाले होते.

शिवाजीराजांसारखे महान आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांचे सासरे. शिवराय येसूबाईंवर वडिलांसारखी माया करत असत. त्यांच्याकडून कळत नकळत झालेल्या संस्काराची शिदोरी त्यांनी आयुष्यभर जपली. आणि हीच शिदोरी येसूबाईंच्या संघर्षमय वाटचालीमध्ये ताकद म्हणून पाठीशी उभी राहिली.

शिवाजी महाराजांसारखे सासरे, जिजाऊसारखी आजेसासू आणि शूरवीर संभाजी राजेसारखे पती लाभलेल्या येसू बाई मुळातच नशीबवान होत्या.

पण अशा नशीबवान व्यक्तींची देखील वेळोवेळी सत्वपरीक्षा त्यांचं नशीब घेत असतं. याची प्रचिती म्हणजे येसुबाईंचं समग्र आयुष्य. यशापयश, मानपान सुख-दुःख त्यांनी कित्येकदा पचवले आणि झेलले.

दुःख पचविण्याची ताकद त्यांच्यात निर्माण झाली ती एका घटनेमुळे…

जेंव्हा पती जिवंत असतानासुद्धा या पतिव्रतेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले. होय, जेंव्हा  संभाजीराजांना घेऊन शिवाजीराजे आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले होते. संभाजीराजे त्यावेळी अवघे नऊ वर्षाचे होते. आगऱ्याहून निसटताना संभाजी राजांचा मृत्यू झाला असे शिवाजी महाराजांनी परतल्यावर सांगितले.  आग्र्याहून सुटल्यावर शिवरायांनी  संभाजीला लपवून ठेऊन अफवा पसरवली की युवराजांचा मृत्यू झाला.

तेंव्हा येसूबाई वयाने खूप लहान होत्या. संभाजी राजांचा मृत्यू झाला हे दुःख पचविण्याची ताकद येसूबाई मध्ये इथपासूनच निर्माण झाली होती. नंतर संभाजी राजे सुखरूप परतले पण ते माहित होण्याआधी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

हिंदवी स्वराज्याचे संभाजीराजे युवराज झाले आणि येसूबाई युवराज्ञी बनल्या !

पण राज्याभिषेकाच्या अवघ्या अकराच दिवसानंतर जिजाऊ मासाहेब यांचं निधन झालं.  शिवाजी महाराजांचे मातृछत्र हरपले आणि संभाजी राजे देखील पोरके झाले. जिजाऊंच्या जाण्यामुळे संभाजीराजांचा आधार तुटला आणि मग येसूबाई संभाजी राजांच्या आधार बनल्या त्या आयुष्याच्या शेवटपर्यंत. छत्रपती संभाजी महारांजांसारख्या शुर-वीरासोबत केवळ नऊ वर्षांचा संसार केला.

आपल्या पतीचे हाल-हाल करून मारले याचं दुख बाजूला ठेवले आणि स्वराज्याची जबाबदारी हाती घेतली.

संभाजी राजे गेल्यानंतर या शूर माऊलीने एकोणतीस वर्षे मोगलांच्या कैदेत असून शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले. यावरूनच त्यांच्या राष्ट्रसेवेचा अंदाज येतो. पण…त्यांचा त्याग इथेच संपत नाही तर त्या त्यागाची व्याप्ती वाढतच जाते.

कारण शंभुराजे गेल्यानंतर औरंगजेबाची नजर स्वराज्यावर होती. स्वराज्यावर कब्जा करण्यासाठी त्याने प्रयत्न चालू केले. नंतर रायगडाला वेढा दिला.  स्वराज्याची राजधानीच काब्ज्यात गेल्यावर कोण काय करणार, म्हणून औरंगजेबाला तोंड देता येत नव्हते. मात्र येसूबाईंनी त्यावर उपाय काढला.  त्यांनी राजाराम महाराजांना असं सुचवलं कि, त्यांनी रायगडच्या वेढ्यातून पडायचं आणि जिंजीच्या किल्यात जाऊन तळ ठोकायचा आणि संपूर्ण राजधानीच जिंजीला हलवायची.

यामाघे येसूबाईंचा विचार असा होता कि, राजधानी दुसरीकडे हलवली कि, रायगडचे महत्व कमी होते. आणि औरंगजेबाने घातलेला वेढा अयशस्वी ठरेल. आणि तिकडे जिंजीला स्वराज्याचा कारभार व्यवस्थित हाकता येईल.

स्वतः कैदेत राहिल्या आणि स्वराज्य अबाधित ठेवलं. स्वराज्य राखण्यासाठी त्या स्वतःला तोफेच्या तोंडी द्यायला तयार होत्या.  पण आपल्या वहिनीला आणि छोट्या शाहूला शत्रूंच्या वेढ्यात एकटे सोडायला  राजाराम महाराज तयार नव्हते. पण येसूबाईंनी राजाने नात्यांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे तरच राज्य चालते हे त्यांना पटवून दिले आणि राजाराम महाराजांना पुढच्या मोहिमेवर पाठवून दिले.

इकडे औरंगजेबाने रायगडासाठी आठ महिने तळ ठोकला शेवटी हाती काहीच न आल्याने शेवटी  त्याने रायगडावरील भगवे निशाण उतरवले व येसूबाईना शाहू महाराजांसहीत अटक केली.

येसूबाईंना शिवरायांची शिकवणच होती की प्रसंगी गड किल्ले शत्रूला द्यावेत पण स्वराज्य राखावे.

अशाप्रकारे या शूर महिलेने आयुष्याची एकोणतीस वर्षे कैदेत काढली. पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्या दोघांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्षे परमुलाखत वनवास सहन करावा लागला होता.

त्यांचं अवघं आयुष्यच स्वराज्यासाठी त्यागमय राहिलं आहे…त्यांची हे स्वराज्यनिष्ठा आमच्यासाठी कायम प्रेरणादायी राहतील !

हे हि वाच भिडू :

 

 

1 Comment
  1. DATTA BHOSALE says

    सकल सौभाग्यवती महाराणी येसूबाई . आईसाहेब …. स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींच्या सौभाग्यवती महाराणी येसूबाई म्हणजे त्यागाची मूर्ती . शंभूछत्रपतींच्या क्रूर हत्येनंतर रायगडाला मोगली वेढा पडला . या वेढ्यातून छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी महाराणी येसूबाई रायगडावर थांबल्या आणि पुढे मोगलांनी महाराणी येसूबाई , थोरले शाहू छत्रपती आणि काही मावळ्यांना अटक केली . पुढे २ ९ वर्षांनी महाराणी येसूबाई यांची सुटका झाली . मोगली वेढ्यातून स्वराज्याच्या भविष्याला सुखरूप बाहेर काढणाऱ्या स्वराज्य लक्ष्मीच्या चरणी नवरात्रीची चौथी माळ अर्पण ….

Leave A Reply

Your email address will not be published.