बुलेट आणि राजदूतच्या काळातही ‘येझडी’ चा नाद करणे कोणाला जमले नव्हते.
बाईकर्सचं जग म्हणजे सगळ्यात धार्मिक. इथे लोक एका गाडीला देव मानले तर वर्षानुवर्षे त्याच देवाची पूजा करतात. यात वेगवगेळे पंथ आले, वेगवेगळे धर्म आले. पूर्वीच्या काळी तर हे क्लास अतिशय कट्टर असायचे.
सगळ्यात पहिला यायचा बुलेट वाल्यांचा पंथ.
बुलेट वाला निघाला की किलोमीटर आधी आवाज येतो. सगळ्यांना कळत कि बॉस आलेला आहे. एवढी वर्ष झाली बुलेट ही मोटारसायकल प्रचंड लोकप्रिय आहे. इतर गाडीपेक्षा तिचा आकार, रंग, आकर्षण हे खूप वेगळं आहे. तिचा आवाज सुद्धा फार हायलाईट केलेला आहे. तिच्यावर जो कुणी सवार होईल त्याचं स्टेट्सचं एकदम बदलून जातं.
कारण बुलेट आहेच तितकी हँडसम.
बुलेट नंतर मग बाकीच्या गाड्या. यात बाईकर लोकांच्या पसंतीमध्ये नंबर लागायचा राजदूतचा. बुलेटच्या ही आधी ही गाडी खूप फेमस होती. राजदूत ही गाडी आजच्या बुलेट इतकी क्रेज तयार करत होती. पैश्याने मोठी माणसं यांच्याकडेच राजदूत दिसायची. ग्रामीण भागात सुद्धा अनेकांकडे राजदूत होती. आणि आजही आहे फक्त आता तिचं इंजन म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा त्या काम करत नसल्याने राजदूत चा वापर किंचितसा झालेला आहे.
लोकांना काय आवडतं ? हे राजदूत आणि बुलेट च्या कंपन्यांना पक्कं कळलं होतं.
पण मग इतरांचं काय ? तर इतर लोकं स्कुटर , एम -८० मध्ये अडकले होते. त्यांना पण बाईक घ्यायची होती पण बुलेट झेपायची नाही आणि राजदूतशी जमायचं नाही. अशातच तिसरी गाडी आली होती येझडी.
या गाडीने क्लास, पंथ, सगळं मोडून काढलं आणि सर्वधर्मसमभावाने सगळ्यानाच प्रेमात पाडलं.
राजदूत आणि बुलेट या दोन प्रतिस्पर्धी गाड्यांना टक्कर देण्यासाठी जावा मोटासायकल ने येझडी या गाडीची निर्मिती करून बाजरात आणली. कारण ही गाडी सगळ्यांनाच आवडणारी होती. आणि झालं ही तसचं या गाडीने सगळ्यांचं मार्केट खाल्लं.
१९७० च्या दशकात जिंतेद्र अभिनित ह्मजोली आणि अमिताभ – विनोद खन्ना यांच्या पर्वरीश या चित्रपटामध्ये एक सामान्य बाब काय होती ? तर येझडी ही मोटारसायकल.
७० – ८० च्या दशकात हिंदी चित्रपट सृष्टीत येझडी काळी घोडी गाडी चित्रपटात आणि वैयक्तिक कामाकरिता वापरण्याचा मोह अनेकांना सुटला नाही. रफटफ, कच्चा, गर्जना करणाऱ्या आवाजासाठी परिचित असलेली येझडी एकदम चमकदार, खडबडीत आणि स्टाईलिश मोटारसायकल होती. कुणीही तिला सहजासहजी वापरेल अशी होती. तिचं इंजिन २५० cc चं होतं जे राजदूत आणि बुलेट च्या तुलनेत उत्तम होतं.
राजदूत ला तरुण वापरत नव्हते. बुलेट नंतर जेव्हा येझडी आली तेव्हा त्यांचं बुलेटवरील सुद्धा प्रेम कमी झालं. आणि येझडीच्या सगळेच जण प्रेमात पडले. राजदूत कडे १७५cc इंजिन होतं, बुलेट कडं ३५०cc होतं तर या दोन्हींच्या तुलनेत येझडी कडे २५०cc हे परिपूर्ण इंजिन होतं.
जावा मोटारसायकल कंपनीने १९७३ पर्यंत येझडी मोटारसायकल या नव्या ब्र्यांडची निर्मिती केली. त्या ब्र्यांड ची पंचलाईन अशी होती की, फॉरेव्हर बाईक, फॉरेव्हर व्हॅल्यू.
येझडीची जाहिरात होऊ लागली आणि लोकांच्या पसंतीस पडून विक्रमी विक्रीही होऊ लागली. येझडी इतक्यापर्यंतचं थांबली नाही. तिने भारताच्या रेसिंग क्षेत्राला एक चांगली बाईक मिळवून देऊन रेसिंग क्षेत्र विकसित करायला हातभार लावला, असंही म्हणता येईल. अनुभवी प्रसिद्ध रेसर्स सी. के चिनाप्पा, जगदीश्वर रेड्डी, तिरूमल रॉय, आणि अनिता नानजप्पा यांनी कितीतरी शर्यती याचं येझडीवर जिंकलेल्या आहेत.
त्यामुळे येझडी इतर गाड्यांच्या तुलनेत एक वेगळाच ब्र्यांड होता.
भारतातुन जावा बाईकची मागणी वाढल्यानंतर कंपनीने म्हैसूर इथं १९६१ साली कारखाना टाकला. आणि उत्पादन सुरु केलं. ६० ते ७० या दशकात आयडियल जावा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने २५० हुन अधिक प्रकार तयार केले. त्या नंतर मात्र कंपनीने येझडी नावाने बाईक तयार करून विकायला सुरुवात केली.
कामगार वाद आणि वाढत्या कर्जाला कंपनी बळी पडली. म्हणजे झालं आसं की कामगार वाद त्या कंपनीचा थांबत नव्हता. त्यात कर्ज वाढत होतं. शेवटी कंपनी बंद केल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून १९९६ साली कंपनी बंद झाली. कंपनीची बाईक निर्मिती ही कायमची थांबली.
आर्थिक अडचणीचं मोठं संकट निर्माण झाल्याने येझडी बाईक निर्मिती होणं थांबलं.
पण लोकांच्या मनामधून जायला येझडी अजूनही तयार नाही. कितीतरी जण जुनी येझडी नवी करून वापरात आणायचा प्रयत्न करतात. काहींचा प्रयत्न चांगला होतो तर काहींचा फसतो. येझडी प्रेमी अजूनही गाडीवर तितकच प्रेम करतच राहिले.
हे ही वाच भिडू.
- भावानों! जावा आली रे !!!
- आज तर माहिती करून घ्या, डुक्कर गाडी कोणत्या कंपनीची होती ?
- उद्यापासून बापाचा घोडा चार्जिंग वर पळणार. बजाज चेतक परत आली आहे.