योगेंद्र यादव यांना संयुक्त किसान मोर्चाने सस्पेंड केले आहे, पण का ?

लखीमपूर खेरी हिंसाचार गेल्या बऱ्याच काळापासून मोठा वाद घेऊन आला आहे. आत्तापर्यंत लखीमपूर खेरी हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने किसान मोर्चा आक्रमक होऊन भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलावर कारवीची मागणी करत आला आहे. मात्र आता या सर्व विषयाला एक अनपेक्षित वळण लागलं आहे.

ते म्हणजे शेतकरी नेते आणि कार्यकर्ते योगेंद्र यादव. हो हे सद्या मोठ्याच वादात सापडले आहेत. कारण योगेंद्र यादव यांना संयुक्त किसान मोर्चाने एक महिन्यासाठी निलंबित केले आहे. सर्व शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने योगेंद्र यादव यांना त्यांच्या ९ सदस्यीय कोअर कमिटीतून सस्पेंड केले आहे.

सस्पेंड करण्याएवढं काय घडलं ?

३ ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरीच्या तिकोनिया येथे निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांना निर्दयीपणे चिरडण्यात आले, त्यात चार शेतकरी आणि एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. या घटनेतील मुख्य आरोपी, केंद्रीय गृह राज्यमंत्र्याचा मुलगा, ज्याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेपासून शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष अजय मिश्रा यांना पदावरून हटवण्याची मागणी करत आहेत.

अन त्यात आणखी एक भर म्हणजे, योगेंद्र यादव यांनी लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेनंतर आणि आंदोलकांकडून मारहाण झालेल्या एका भाजप कार्यकर्त्याच्या घरी भेट दिली.  लखीमपूर खेरी हिंसाचारात जेंव्हा त्या चारचाकी गाडीने शेतकऱ्यांना चिरडले होते तेंव्हा आंदोलकांनी त्या भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. आणि त्या मारहाणीत भाजप कार्यकर्त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते असे सांगण्यात आले आहे. योगेंद्र यादव यांची ही खेळी पंजाबच्या शेतकरी संघटनांना आवडली नाही.

यामुळे संयुक्त किसान मोर्चा संतप्त झाला आणि यादव यांना हटवण्याची मागणी करण्यात आली. पंजाबच्या शेतकरी संघटनांनी केलेल्या मागणीनंतर गुरुवारी संध्याकाळी झालेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सूत्रांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार,  बैठकीत योगेंद्र यादव यांनी दु:ख व्यक्त केलं की, त्यांनी लखीमपूर खेरी येथे मारल्या गेलेल्या भाजप कार्यकर्त्याच्या घरी जाण्यापूर्वी संयुक्त किसान मोर्चाच्या इतर नेत्यांशी सल्लामसलत केली नाही ना कसली कल्पना दिली नाही.

योगेंद्र यादव यांनी याबद्दल खेद जरूर व्यक्त केला मात्र यासाठी त्यांनी माफी मागितली नाही.

योगेंद्र यादव यांनी नंतर एक व्हिडिओ पोस्ट करून, त्यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तसेच मृत भाजप कार्यकर्त्याच्या शोकग्रस्त कुटुंबाला भेटून काहीही चुकीचे केले नाही. पीडित कुटुंबांमध्ये कोणताही भेदभाव नसावा. दुसरीकडे, संयुक्त किसान मोर्चा या निष्कर्षापर्यंत पोहोचला की योगेंद्र यादव यांनी मृत भाजप कार्यकर्त्याच्या घरी जाऊन लखीमपूरमध्ये चिरडलेल्या शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा एकप्रकारे अपमानच केला आहे.

ही कारवाई का होत आहे?

अशा परिस्थितीत संयुक्त किसान मोर्चाने गुरुवारी आपली अंतर्गत बैठक बोलावली आणि त्या बैठकीत हा मोठा निर्णय घेतला. आता त्या बैठकीपासून योगेंद्र यादव यांच्यावर कारवाई करण्याची चर्चा होत होती. पण आता योगेंद्र यादव यांना संयुक्त किसान मोर्चाने एका महिन्यासाठी निलंबित केले यावर शिक्कामोर्तब झाला आहे. योगेंद्र यादव यांना माफी मागण्याची संधी देण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. पण यादव यांनी माफी मागण्याची तयारी दाखवली उलट माफी मागण्यास नकार दिल्याने त्याच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली.

कोण आहेत हे योगेंद्र यादव ?

योगेंद्र यादव यांचा जन्म ५ सप्टेंबर १९६३ रोजी झाला. त्यांच्या पत्नीचे नाव मधुलिका बॅनर्जी आहे. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, पंजाब विद्यापीठ आणि राजस्थान विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. योगेंद्र यादव हे एक भारतीय सामाजिक शास्त्रज्ञ आणि निवडणूक विश्लेषक आहेत. तसेच ते  राजकारणाच्या क्षेत्रात अनुभवी खेळाडू आहेत. त्यांचे राजकीय विश्लेषण अतिशय अचूक असते. त्यांना सुरुवातीपासूनच राजकारण आणि समाजशास्त्रात प्रचंड रस होता.

योगेंद्र यादव सीएसडीएस, दिल्लीचे वरिष्ठ संशोधन फेलो देखील राहिले आहेत. योगेंद्र यादव २०१५  पर्यंत आम आदमी पक्षाचे सदस्य होते. २०१५  मध्ये त्यांनी आम आदमी पार्टी सोडली. यानंतर त्यांनी स्वराज इंडिया नावाच्या पक्षाची स्थापना केली. स्वराज अभियान भारतीय शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांवर आवाज उठवत असते.

आप’ ला मजबूत करण्यामध्ये यादव यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. 

योगेंद्र यादव यांची आम आदमी पार्टी मजबूत करण्यात महत्वाची भूमिका होती. योगेंद्र यादव यांच्याच  योगदानामुळे पक्षाने २०१३ मध्ये प्रचंड विजय मिळवला होता. यानंतर, २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या. दिल्लीच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं होतं. पण २०१५ मध्ये पक्षप्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आणि यादव यांच्यात खटके उडू लागले आणि मग यादव यांनी आप पक्ष सोडला आणि स्वराज अभियान हा पक्ष स्थापन केला.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.