बाकी काही का असेना योगींनी युपीच्या राजकारणात बाहुबलींना घरी बसवायचं काम केलं

 

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशवर खिळल्या आहेत. आणि यूपीत काय जास्त चर्चेत आहे असं विचाराल तर ते म्हणजे तिथले बाहुबली नेते.  हे बाहुबली गुन्हेगारीच्या दुनियेतून राजकारणात पोहोचले आणि नंतर घरात जाऊन बसलेत. या सगळ्यात पहिला नंबर कोणाचा असेल तर तो आहे हरिशंकर तिवारी यांचा! कारण तिथूनच तर खरं कांड सुरु झालं.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर हे शहर आहे ज्याचं एक वैशिष्ट्य यूपीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लक्षात घेतले जाते. ते म्हणजे हरिशंकर तिवारी ! 

हे शहर गेले ४५ वर्षे झाले, हे शहर या बाहुबली नेत्याच्या नावाने ओळखले जाते. ज्या लोकांना यूपीचे राजकारण आणि त्याचा इतिहास समजला माहितीये, त्यांना पूर्वांचलचे बाहुबली नेते हरिशंकर तिवारी यांचे नाव माहित नाही हे अशक्यच असते. असं म्हणलं जातं कि, या बाहुबलीने दिलेला हुकूम नाकारण्याचे धाडस ना सावकारात होते ना सरकारी नोकरांमध्ये. 

७० च्या दशकात गोरखपूर विद्यापीठातून विद्यार्थी नेता म्हणून पुढे आलेली या व्यक्तीने संपूर्ण पूर्वांचलमध्ये कधी दबदबा निर्माण केला, हे तिथल्या लोकांना कळलेही नाही. गेल्या काही वर्षांत अनेक नेत्यांनी तुरुंगात असतानाही निवडणुका जिंकल्या आहेत. पण सुमारे ३६ वर्षांपूर्वी म्हणजे १९८५ मध्ये तुरुंगाच्या आत राहून या नेत्याने एका अपक्ष उमेदवार म्हणूननिवडणूक जिंकली होती, कदाचित यूपीच्या राजकारणात असं पहिल्यांदाच घडलं होतं. त्यानंतर गोरखपूरची चिल्लुपार जागा अचानक चर्चेत आली, कारण पहिल्यांदाच एका अपक्ष उमेदवाराने तुरुंगात असताना निवडणूक जिंकली. 

हरिशंकर तिवारी यांचा हा पहिलाच विजय होता, त्यानंतर पूर्वांचलमध्ये तिवारी हे एक राजकीय ताकदीचे नेते बनत गेले.

खरं तर हरिशंकर तिवारी हे विद्यार्थीदशेतच राजकारणात आले होते. त्यांचे एक मोठे राजकीय विरोधक म्हणजे वीरेंद्र प्रताप शाही हे देखील विद्यार्थीदशेतच राजकारणात सक्रिय होते, तेलक्ष्मीपूरमधून विधानसभेत पोहोचले होते. त्या वेळी राजकीय वर्तुळापासून नोकरशाहीपर्यंत या दोन्ही  नेत्यांची ताकद पाहून त्यांना दबंग आमदाराचा दर्जा दिला गेला होता. 

या दोन्ही नेत्यांची राजकारणातली वर्चस्वाची लढाई शेवटपर्यंत सुरूच राहिली. हरिशंकर तिवारी यांची  पॉवर इतकी होती की ते केवळ सहा वेळा आमदार झाले नाहीत तर१९९७ ते २००७ या काळात तेउत्तर प्रदेश सरकारमध्ये सलग मंत्रीही राहिले आहेत. म्हणजे या दोन दशकात कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्या सरकारमध्ये ते मंत्री असायचेच ! सत्ता कुणाचीही असो तिवारी याना मंत्री बनवणे ही जणू प्रत्येक पक्षांची मजबुरीच बनली होती.कदाचित  सपा ला देखील सत्तेवर येण्यासाठी या नेत्याची मदत लागणार म्हणून हा सहकुटुंब प्रवेश घडवून आणला आहे. 

तुम्ही एक गोष्ट विसरला नसाल तर, योगी आदित्यनाथ यांनी यूपीचे मुख्यमंत्री होताच पहिली घोषणा केली होती की ते या राज्यातून ‘माफिया राज’ पूर्णपणे नष्टकरणार. अर्थातच तिवारी यांच्यासारख्या  नेत्यांना योगींच्या सत्तेतगप्प राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.  

अर्थातच आता या नेत्यांना दुसरा पक्ष शोधणं आणि या नेत्यांच्या जोरावर आपली राजकीय सत्तेची भूक भागवणे असे दुतर्फी राजकारण या निमित्ताने पाहायला मिळतेय. हरिशंकर तिवारी आता म्हातारे झाले आहेत, पण ते एकेकाळी ते पूर्वांचलमध्ये ब्राह्मणांचा मोठा चेहरा होते आणि आताही असू शकतात.

अशाच दुसऱ्या बाहुबलीचं नाव आहे ब्रिजेश सिंह.

ब्रिजेश सिंह उर्फ ​​अरुण कुमार सिंह. या बाहुबलीचा जन्म वाराणसीचा. त्यांचे वडील रवींद्र सिंह म्हणजे वाराणसी परिसरातील प्रभावशाली व्यक्ती. राजकीयदृष्ट्याही त्यांची पोच काय कमी नव्हती. ब्रिजेश सिंह लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होता. १९८४ मध्ये झालेल्या इंटर परीक्षेत त्याने आपल्या बापाचं नाव उज्वल केलं आणि गुन्हेगारीत जाऊन बदनाम.

ब्रिजेशचे वडील रवींद्र सिंग यांच्या इच्छा होती कि ब्रिजेशने अभ्यास करून चांगला माणूस व्हावा. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळच होतं. वाराणसीच्या धरहरा गावात २७ ऑगस्ट १९८४ रोजी ब्रिजेशचे वडील रवींद्र सिंह यांची हत्या करण्यात आली. त्यांचे राजकीय विरोधक हरिहर सिंग आणि पंचू सिंग आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांची हत्या केली होती. वडिलांच्या मृत्यूने ब्रिजेश सिंगच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली. वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तो बैचेन होता.

अशातच एक दिवस त्याच्या वडिलांचा मारेकरी हरिहर सिंग ब्रिजेशच्या समोरुन जात होता. त्याला पाहताच ब्रिजेशने त्याचा जीव घेतला. आणि इथूनच ब्रिजेश सिंह गुन्हेगारीच्या क्षेत्रात बाहुबली म्हणून पुढे यायला लागला. 

ब्रिजेशने हरिहरला मारलं पण त्याचा राग गेला नव्हता. वडिलांच्या हत्येमध्ये हरिहरसोबत सहभागी असलेल्यांचा तो शोध घेत होता. ९ एप्रिल १९८६ ला गोळीबाराच्या आवाजाने बनारसच्या सिकरौरा गावात दहशत माजली. सर्वत्र घबराट पसरली. नंतर कळलं की ब्रिजेश सिंगने वडिलांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या पाच जणांना गोळ्या घालून ठार केल. ही घटना घडल्यानंतर पहिल्यांदाच ब्रिजेशला अटक करण्यात आली. या सामूहिक हत्येमुळं लोकांच्या मनात ब्रिजेशची भीती बसली. या एका घटनेनंतर त्याची इमेज माफिया डॉन अशी झाली.

यूपीमध्ये त्याने आमदारकी लढवली, तो विक्रमी मतांनी विजयी झाला. पण गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच २०१७ च्या निवडणुकीत त्याला ब्रेक लागला.

आता हा तिसरा बाहुबली धनंजय सिंह

गोष्ट आहे १७ ऑक्टोबर १९९८ ची. ठिकाण भदोही मिर्झापूर रोड. एका पेट्रोल पंपावर लूटमार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दरोड्याची योजना आखणाऱ्या ४ जणांचा पोलिसांनी एन्काउंटर केल्याची बातमी आली. या चकमकीत ५० हजारांचे बक्षीस डोक्यावर असलेला धनंजय सिंह ठार झाल्याचं सांगण्यात आलं.

पण हे खरं नव्हतं. धनंजय सिंह जिवंत होता.जवळपास ४ महिने आपल्या फेक एन्काउंटरवर मौन बाळगणारा धनंजय सिंह फेब्रुवारी १९९९ मध्ये समोर आला. यानंतर भदोही फेक एन्काउंटर खोटं असल्याचं आणि पोलीस हि खोटं बोलत असल्याचं समोर आलं. 

धनंजय सिंग. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता इथं जन्म. या धनंजय सिंगचं कुटुंब कोलकात्यातून उत्तर प्रदेशातील जौनपूरला गेल. ही गोष्ट १९९० मधील आहे. महर्षी विद्या मंदिरचे शिक्षक गोविंद उनियाल यांची हत्या झाली होती. धनंजय त्यावेळी हायस्कूलमध्ये होता. या खुनात धनंजयचं नाव होत. मात्र या प्रकरणात पोलिसांना त्याच्यावरचे आरोप सिद्ध करता आले नाहीत.

 या घटनेनंतर दोन वर्षांनी म्हणजे १९९२ मध्ये जौनपूरच्या तिलकधारी सिंग इंटर कॉलेजमधून बोर्डाची परीक्षा देत असलेल्या धनंजयवर एका तरुणाच्या हत्येचा आरोप लागला. पोलिसांनी त्याला अटक केली आणि धनंजय सिंहने पोलिस कोठडीत ३ पेपर दिले. 

१९९७ मध्ये अचानक पूर्वांचलच्या ठाकूरांचा गट विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाला. यात धनंजय सिंग, अभय सिंग, बबलू सिंग आणि दयाशंकर सिंग हे तरुण होते. वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आणि ठाकूरवादामुळे सर्वांना पुरुन उरला तो धनंजय सिंग. लखनौ विद्यापीठातूनचा हा बाहुबली झाला. 

आता आहे राजाभैय्या 

तर ही गोष्ट आहे उत्तर प्रदेश मधील माजी मंत्री रघुराज प्रताप सिंग उर्फ राजा भैय्याची. त्यांचा जन्म पूर्व भद्री संस्थानातील राजघराण्यातला आहे. आज जरी राजेशाही मागे पडली असली तरीही आजही राजा भैय्याच्या महालात दरबार भरतो. आजही दरबारात बोललेला त्यांचा शब्द महणजे तिथल्या लोकांसाठी कायदाच आहे. राजा भैय्याचि त्यांच्या भागात इतकी दहशत आहे कि त्यांच्या विरोधी उमेदवार स्वतःचे पोस्टर्स सुधा निवडणुकीत लावत नाहीत. राजा भैय्याचं आयुष्य म्हणजे सामान्य माणसाला न सुटलेलं एक कोडंंच आहे.

राजा भैय्याचा  जन्म १९६९ साली झाला. राजा भैय्याने शालेय शिक्षण झाल्यानंतर लखनौ विद्यापीठातून १९८७ साली वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. १९९३ साली त्यांनी वयाच्या २५ व्या वर्षी पहिल्यांदा कुंडा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणुक लढवली. त्यात संपूर्ण राज्यात  सर्वात जास्त मते घेऊन ते निवडून आले. तेव्हा पासून सलग पाचवेळा ते तेथून आमदार म्हणून निवडून आले आहेत .

राज्यात सरकार कुणाचंही असो कुंडामध्ये मात्र कायदा चालतो तो राजा भैय्याचाच.

पोलिसांच्या रेकॉर्ड्स मध्ये राजा भैय्यावर अनेक आरोप आहेत मग त्यात लुटमार ,खुनाचा प्रयत्न,अपहरण,दंगे घडवणे , खतरनाक हत्यारं बाळगणे आणि फसवणुकीचे असे सर्व मिळुन आठ हून अधिक गंभीर गुन्हे राजा भैय्यावर दाखल आहेत.त्यातच अलीकडे झालेल्या प्रतापगड च्या DSP च्या खुनात ही त्यांचे नाव आहे. राजा भैय्या दोन वर्ष तुरुंगात राहिले ते मायावतीच्याच काळात.

हे सगळं करूनसुद्धा राजा भैय्या नेहमीच कायद्याच्या कचाट्यातून  निसटताना दिसतात. त्यामागे त्यांनी वेळोवेळी घेतलेला किंबहुना त्यांना मिळालेला राजकिय आश्रय आहे . 

पुढे सन २००२ ला जेव्हा मायावती मुख्यमंत्री झाल्या तेव्हा मात्र त्यांनी राजा भैय्याची गय केली नाही. मायावतींनी राजा भैय्याला  आणि त्यांचे वडील दोघांनाही जेलमध्ये घातले. मायावतींनी तर त्यांच्यावर आतंकवादी विरोधी कायदा POTA लावला. २००३ मध्ये मायावतींच्या आदेशावरून राजा भैय्याच्या घरावर छापे मारण्यात आले. त्यात राजा भैय्याच्या घरातून अनेक बंदुका ,शेकडो गोळ्या आणि एक एके ४७ रायफल सापडली. महालाच्या मागे असलेलेल्या तलावातून पोलिसांना एक माणसाची कवटी सापडली. स्थानिक लोकांमध्ये अशी धारणा आहे कि राजा भैय्या त्यांच्या शत्रुनां मारून महालामागे असलेल्या तलावातील  मगरींना खायला टाकतात. 

‘त्याच्या डोळ्यात बघायची हिम्मत नाही होत. रक्ताळलेले त्याचे ते लालबुंद डोळे एकटक तुमच्या दिशेनं रोखलेले असतात. 

नजर तर अशी रोखतो कि तुम्ही आपोआप खाली बघायला लागता.’ असं एक पोलीस आरोपीबद्दल सांगत होता. तुम्ही म्हणाल काय पिच्चरची स्टोरी सांगय लागलायस. तुमचा पण बरोबर आहे . पिक्चरसारखीच वाटणारी हि घटना उत्तरप्रदेशमधल्या एका बाहुबली नेत्याच्या बाबतीतील आहे. त्या नेत्याचं नाव आहे अतिक अहमद अन्सारी. गुजरातमधल्या साबरमती जेलमध्ये बंद असलेल्या या नेत्याची ईडीनं आठ करोडची प्रॉपर्टी जप्त केलीय. याआधी ही याची जवळपास २०० करोडची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली होती.

१९८० चं अलाहाबाद. संगमावर बसलेलं शांत धार्मिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेलं अलाहाबाद आता कात टाकत होतं. नवीन कॉलेजेस,नवीन इंडस्ट्रीज यामुळं अलाहाबादचं रुपडं झपाट्यानं बदलत होतं. राजकारणात पण बदल घडत होते. एकेकाळी अख्या उत्तरप्रदेशच्या राजकारणात दबदबा निर्माण करणारी अलाहाबाद युनिव्हर्सिटीची विध्यार्थी चळवळ मागे पडत होती.  हे सगळं फिरोझ टांगेवाल्याचं पोरगं बघत होतं. एवढे सगळे बदल होत असताना आपल्या आयुष्यात मात्र काय बदलत नाहीए हे त्यानं ओळखलं होतं. बापाचा टांगा चालवयचा धंदा पुढे आपण घेतला तर खायचे  वांदे होतील हे त्याला कळलं होतं . आता शाळेत जाऊन अभ्यास करायचा आणि कलेक्टर बिलेक्टर बनायचं तर शाळेत पास होयचे वांदे . मग अतिकनं गुन्हेगारी आणि राजकारण यांचा मार्ग निवडला.

आता गुन्हेगारी क्षेत्रात एन्ट्री मारलेल्या अतिक अहमदला आता राजकारणातही नाव कमवायचा होतं. १९८९मध्ये त्यांनं मग आधी आमदार आणि थेट खासदारकी पर्यंत मजल मारली.कधीकाळी पंडित नेहरू ज्या फूलपूर मतदारसंघामधून निवडून जात होते त्याच मतदारसंघामधून आता अतिक अहमद २००४ मध्ये लोकसभेवर पोहचला. मात्र राजकारणात पुढे जात असतानाच त्यानं गुन्हेगारी विश्व सोडलं  नव्हतं.

अशाप्रकारे एकेकाळी उत्तरप्रदेश हादरवून सोडणाऱ्या या माफियांना गेल्या साडेपाच वर्षांत योगी आदित्यनाथांनी सळो कि पळो करून सोडलं. आता खरं काय ते  येत्या निवडणुकीत कळलेच !

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.