या बाहुबलीची दहशत ठेचून काढली आणि युपीमध्ये आदित्यनाथांचा योगीराज सुरु झाला..

भारतातलं सगळ्यात मोठं राज्य म्हणजे युपी. देशाचे कित्येक पंतप्रधान या एका राज्याने दिले. जो युपीवर राज्य करतो तोच देशावर राज्य करतो असं म्हणतात. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशाचं सगळ्यात जास्त वाटा युपी उचलतोय. म्हणूनच मोदींच्या यशाचे सर्वात मोठे भागीदार तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आहेत.

अजयकुमार बिश्त उर्फ योगी आदित्यनाथ आज तरी युपीचे एकमेव सम्राट आहेत. भाजपवाले कार्यकर्ते त्यांना आतापासूनच भारताचा भावी पंतप्रधान म्हणून ओळखतात. त्यांची सध्याची लोकप्रियता पाहता योगीजींना हे  खूप अवघड आहे असं नाही.

२००० च्या दशकाच्या काळात अशी परिस्थिती नव्हती. योगी आदित्यनाथ युपी मधले एक साधे खासदार होते. गोरखपूरच्या गोरखनाथ मठाचे हे महंत. राम मंदिराचा जोर कमी झाला होता. केंद्रात सत्ता असूनही भाजप सरकार मंदिर उभारणीच्या दिशेने पावलं टाकत नाही म्हणत यूपीतल्या त्यांच्या लोकप्रियतेला गळती लागली होती. त्यांचे मोजून पन्नास साठ आमदार निवडून येत होते.

यूपी मध्ये तेव्हा राज चालायचा सपा आणि बसपा यांचा. मुलायमसिंग आणि मायावती यांच्या फाईटमध्ये भाजप कुठेच दिसत नव्हती.

साल २००५ पूर्वांचल यूपीच्या मऊ जिल्ह्यात मोठी दंगल पेटली. हिंदू मुस्लिम आपापसात भांडत होते. रक्ताचे पाट वाहत होते, घरे जाळली जात होती. मुलायम मुख्यमंत्री होते. त्यांचं सरकार ही दंगल थांबवण्यात अपयशी ठरल होतं.

याला कारण ठरला होता एक माणूस. उघड्या जीप मधून एक माणूस हातात रायफल घेऊन फिरत होता. त्याच्या जीप मागे शेकडो गाड्यांची रांग होती. त्यांच्यामुळेच पोलीस देखील मऊमध्ये काहीही करण्यास धजावत नव्हते.

या माणसाचं नाव होतं मुख्तार अन्सारी.

सनी देओल चा घातक पाहिला आहे? त्यात डॅनीने जो कातीया व्हिलनची जशी दहशत होती अगदी तशीच दहशत मुख्तार अन्सारीची  होती. खून अपहरण मारामाऱ्या याच्याबद्दल त्याच्यावर लावण्यात आलेल्या केस तो अभिमानाने वागवायचा. यूपीमध्ये कोणतंही सरकार येवो त्यांना पूर्वांचलमध्ये अन्सारीच्या इशाऱ्यावर काम करावं लागायचं. संपूर्ण उत्तर भारतात बाहुबली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  मुख्तार अन्सारीच्या गुन्हेगारीचे किस्से अफाट फेमस होते.

पण मुख्तार अन्सारीच्या परिवाराचा इतिहास गुन्हेगारीचा नव्हता. त्याचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद देखील भूषवलं होतं. तर अन्सारीच्या आईचे वडील हे मिलिटरीमध्ये होते. त्यांनी ६५ सालच्या युद्धात पराक्रम गाजवून महावीर चक्र देखील मिळवलं होतं. मुख्तार अन्सारीचे एक काका उपराष्ट्रपती देखील होते.

अशा घरात जन्माला आलेला मुख्तार कॉलेजमध्ये एक चांगला क्रिकेटर होता. तुफान वेगाने बॉलिंग टाकणारा अन्सारी भारतीय टीम मध्ये झळकेल असं युपी मध्ये बोललं जात होतं. पण त्याच्या भाग्यात काही वेगळंच लिहिलं होतं.

पूर्वांचल मधला गाझीपूर भाग हा सुपीक समजला जातो. पण शेजारच्या बिहार मधल्या कोळसा खाणी आणि इतर गोष्टींमुळे गाझीपूर मध्येदेखील मोठ्या प्रमाणात गॅंगवॉर पाहायला मिळतं. कोळश्याच्या ठेकेदारीसाठी प्रचंड मारामार असते. मुख्तार अन्सारी देखील या ईझी मनीच्या मागे लागला आणि गुन्हेगारी विश्वाकडे ओढला गेला.

१९८८ साली मंडी परिषद ठेकेदारीच्या भांडणातून अन्सारीने सचिदानंद राय यांची हत्या केली आणि तिथून त्याच नाव पोलीस रेकॉर्ड गाजायला सुरवात झाली. गाजीपूर वाराणसी मऊ या भोजपुरी बोलल्या जाणाऱ्या भागात अन्सारीचा आतंक वाढला.

मात्र गाझीपूर मध्ये असलेल्या त्याच्या हवेलीची दारे नेहमी सर्वसामान्य लोकांसाठी खुली असायची. कोणाचं लग्न आहे, कोणाला नोकरी लावून द्यायची आहे, कोणाच्या मुलीला तिच्या सासरकडेचे नांदवून घेत नाहीत अशा सगळ्यांना तो खुल्या मनाने मदत करायचा. बडा दरवाजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अन्सारीच्या घरातून कोणी खाली हात येत नाही असं म्हटलं जायचं. युपीमध्ये त्याला रॉबिनहूड बाहुबली म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

कुख्यात गँगस्टर ब्रजेशसिंग बरोबर त्याची गॅंगवॉर संपूर्ण उत्तरप्रदेशाला अस्थिर करून सोडली.

१९९६ साली अन्सारी राजकारणात उतरला. त्याचा मोठा भाऊ आमदार होताच आता अन्सारी देखील मऊ मधून निवडून आला. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाशी जोडला गेला. २००२ साली भाजपच्या उमेदवाराने अन्सारीच्या भावाला पाडलं. यात ब्रिजेश सिंगचा मोठा वाट होता. सिंगने अन्सारीवर हल्ला देखील केला पण तो कसाबसा बचावला. इथून दोघांच्या गॅंग वॉरने भयानक रूप घेतलं.

दिवसाढवळ्या मुडदे पडू लागले. फटाके फुट्ल्याप्रमाणे गोळीबार व्हायचे. पुढे या दोन गॅंग मधील भांडणाच रूपांतर हिंदू मुसलमान दंगलीत झालं. मऊ मधली दंगल याच गुंडगिरीचा परिणाम होती.

या दंगलीमध्ये हिंदू पीडितांना कोणतीही मदत मिळाली नाही असे आरोप झाले. अखेर यात गोरखनाथ मठाचे महंत योगी आदित्यनाथ यांनी उडी घेतली. आदित्यनाथ यांनी मी मऊ मध्ये जाणार बघू कोण अडवतोय ते असं म्हणत मुख्तार अन्सारीला खुलं आव्हान दिलं.

नुसता बोलले नाहीत तर योगी आदित्यनाथ आपल्या सहकाऱ्यांना १०-१२ गाड्यांमध्ये भरून गोरक्षनाथ मंदिरातून निघाले. त्यांच्या या दौऱ्याची हवा इतकी झाली कि पुढच्या ३० किलोमीटरपर्यंत पोहचेले तेव्हा त्यांच्या काफिल्यात १५० गाड्या  दिसू लागल्या.

योगींच्या या काफिल्याला मऊच्या सीमेवर अडवण्यात आलं. तत्कालीन युपी सरकारने आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका आहे असं कारण सांगून त्यांना परत पाठवलं. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या शक्तिप्रदर्शनाचा हेतू साध्य झाला होता.

मऊ दंगे झाल्याच्या तीनच वर्षानंतर २००८ साली योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा अन्सारीला ललकारलं. त्याच्या दहशती विरुद्धच हिंदू युवा वाहिनीची स्थापना केली. ७ डिसेंबर २००८ साली आझमगढमध्ये डीएव्ही कॉलेजच्या मैदानात हिंदू युवा वाहिनीची मोठी रॅली काढण्यात आली. 

आदित्यनाथ वाजत गाजत २०० गाड्यांचा ताफा घेऊन आझमगढ मध्ये दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ हजारो मोटारसायकली देखील होत्या. आदित्यनाथ सातव्या नंबरच्या लाल एसयूव्ही मध्ये बसलेले होते. तेवढ्यात एक दगड त्यांच्या दिशेने आला. प्रचंड दगडफेक सुरु झाली. रॅलीमध्ये गोंधळ उडाला. हिंसाचाराची चिन्हे बघून पोलिसांनी परिस्थिती आपल्या ताब्यात घेतली.

योगी आदित्यनाथ यांनी आपल्या हल्ल्यापाठीमागे मुख्तार अन्सारी असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,

 काफिले पर लगातार एक पक्ष से गोलियां चल रही थीं, गाड़ियों को तोड़ा जा रहा था पुलिस मौन बनी रही.

योगी आदित्यनाथ यांनी त्या दिवशी ठरवलं की मुख्तार अन्सारीच्या दहशतीला कायमच संपवायचं. त्यांनी अन्सारीला खुलेआम दिलेल्या आव्हानामुळे आणि डॅशिंग भाषणांमुळे त्यांची लोकप्रियता वाढत गेली. एक संन्यासी युपीच्या सगळ्यात मोठ्या बाहुबलीला भिडतो हे सर्वसामान्य लोकांना देखील अभिमान वाटणारं होतं.

पुढे २०१७ साली जेव्हा योगी आदित्यनाथ सत्तेत आले तेव्हा त्यांनी आल्या आल्या अन्सारीच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केली. आज मुख्तार अन्सारी जेलमध्ये आहे. एकेकाळी उघड्या जीपमधून हातात बंदुका घेऊन फिरणारा सहा फुटी अन्सारी आजकाल पोलीस बंदोबस्तात व्हीलचेअरवरून कोर्टाच्या दारात येताना दिसतो.

योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर कोणी कितीही का टीका करू देत मात्र पूर्वांचल मधील गुन्हेगारी मोडून काढण्याच श्रेय त्यांनाच जातं हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.