लखनौ में कूछ बडा होनेवाला है! योगींची खुर्ची धोक्यात आहे का?

लखनौ मी कुछ तों बडा होनेवाला है! पर क्या होगा किसीको मालूम नहीं..

उत्तरप्रदेश मध्ये दिल्ली दरबारातून येणाऱ्या लोकांच्या वाऱ्या वाढल्या आहेत. चर्चा गाठीभेटींना ऊत आलाय. आणि हे सलग १० दिवसांपासून सुरुय. काही माध्यमांनी तर डायरेक्ट मोदी साहेब योगींच्या खुर्चीला सुरुंग लावणार असल्याच्या बातम्या प्रसारित केल्यात. आता या चर्चा आणि बातम्या यातून खरचं सुरुंग लागून बॉम्बस्फोट होणारे का? आणि यूपीत सत्तेचा स्फोट झालाच तर मग कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार याचा भिडून घेतलेला आढावा.

मागच्या काही दिवसांत दिल्लीत संघ आणि बीजेपी हायकमांडची बैठक झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये ऑनलाइन बैठक झाली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते परंतु, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अनुपस्थिती होती.

या बैठकीनंतर उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावलं गेलं. ३१ मे पासून बीजेपीचे राष्ट्रीय संघटक बी. एल. संतोष उत्तरप्रदेश मध्ये होते. त्यांचा लोकल कार्यकर्त्यांपासून ते आमदार खासदारांपर्यंतचा भेटीगाठींचा जोर इतका वाढला की, लखनौत राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या.

गाठीभेटीच प्रकरण नक्की आहे तरी काय 

भाजपा स्वतःला उत्तरप्रदेशचा बादशाह म्हणवून घेतो. कारण उत्तरप्रदेशात असलेली हिंदू मत. यूपीत टाचणी पडली तरी त्याचा आवाज दिल्लीत बसलेल्या प्रधानमंत्र्याला जातो. अशी खासियत असलेल्या राज्यात २०२२ च्या फेब्रुवारी, मार्च दरम्यान पार पडणाऱ्या इलेक्शन संदर्भात मिटिंगा लावल्या जात असल्याचा माध्यमांचा एक अंदाज आहे.

आगामी वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आताच पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याचं म्हंटल जातंय. सोबतच राज्यातील कोरोना संकट हाताळण्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अपयशी ठरले, आणि आता त्यांच्या जागी नवीन चेहरा येईल, अशी अटकळ देखील बांधली जात आहे .

भारतीय जनता पार्टीला उत्तरप्रदेश का महत्वाचा आहे? 

आरएसएस आणि भाजपासाठी उत्तरप्रदेश का महत्वाचा हे जर सांगायला गेलं तर अख्ख आर्टिकल संपून जाईल. थोडक्यात आवरण्यासाठी एवढंच सांगता येईल की, उत्तरप्रदेश सर्वात मोठं राज्य आहे जिथून सर्वात जास्त खासदारांची लोकसभेत आयात होते. ज्याचा पंतप्रधान पदी बसण्यासाठी मोठ्ठा फायदा होतो. त्यामुळे भाजप असो वा काँग्रेस इथल्या मुख्यमंत्र्याला सर्वात जास्त प्रमोट केलं जात.

योगी गेले तर येणार कोण? 

सध्या तरी योगी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याची शक्यता कमी आहे. योगी आदित्यनाथ हे कुशल प्रशासक म्हणून निश्चितच मागे पडलेत. उत्तर प्रदेशात कोरोना दुसरी लाट असतानाही नियम धाब्यावर बसवून पंचायत निवडणुका घेतल्या. त्यात भाजपची सुमार कामगिरी झाली. याची गंभीर दखल भाजप हायकमांडकडून घेण्यात आली आहे.

पुढील वर्षी निवडणुका असताना उत्तर प्रदेशात कोरोनाच्या प्रकोपासमोर योगी सरकार हतबल झाले. गंगेच्या पात्रावर मृतदेह तरंगू लागले आहेत. गंगेच्या किनाऱ्यावर जिथं मृतदेह पुरले गेले त्या मृतदेहांवरच्या ओढण्या काढण्यात आल्या. यावरून भाजप सरकार संपूर्ण जगभरातून ट्रोल झालं.  ही धोक्याची घंटी मानून भाजपने लवकरात लवकर उपाययोजना सुरू कराव्यात, अशी सूचना संघाने केली होती. त्यामुळं गादी सांभाळण्यासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची निवड झाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

कोण आहेत हे मौर्य?

केशव प्रसाद मौर्य यांचा जन्म अलाहाबादमधील कौशांबी जिल्ह्यातील सिराथू मधला. लहानपणी त्यांना पण मोदींसारखा चहा विकावा लागला होता. असाच चहा विकत विकत अलाहाबादच्या हिंदू साहित्य संमेलनातून त्यांनी हिंदी साहित्यात पदवी संपादन केली.

केशव प्रसाद मौर्य हे हिंदू धर्मतील कुशवाहा जातीतले आहेत. ही जात ओबीसी कॅटेगरीमध्ये येत असल्याने भाजपाचे उत्तरप्रदेशातले ओबीसी समाजाचे नेतृत्व म्हणून हे मौर्य प्रसिद्ध आहेत. 

केशव प्रसाद मौर्य हिंदुत्वावादी राजकारणाचा आधार घेत पुढं आले. सुरुवातीच्या टप्प्यात विश्व हिंदू परिषदेचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. सुमारे १८ वर्षे त्यांनी विश्व हिंदू परिषदेसाठी प्रचार केला. त्यानंतर ऍक्टिव्ह पॉलिटिक्स करण्यासाठी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताफ्यात दाखल झाले. या दोन संघटनांमुळे त्यांची राजकीय पाळमुळ अगदी मजबूत झाली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असताना त्यांनी रामजन्मभूमी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला असला तरी ओबीसी या विचारसरणीला घेऊनच राजकीय कारकीर्दीची सुरुवात करावी लागली. एवढं राजकारण करुनही त्यांना २००२ आणि २००७ च्या लोकसभा निवडणुकीत सलग पराभव पत्करावेच लागले. आणि त्यानंतर २०१४ च्या मोदी लाटेत ज्यांच्या नौका पार झाल्या त्यात केशव प्रसाद मौर्य हे देखील होते.

उत्तरप्रदेशात कुशवाहा जात बर्‍याच भागात पसरली आहे. आणि भागांप्रमाणे त्यांची आडनावही बदलली आहेत. बर्‍याच ठिकाणी ते सैनी आणि सख्या या आडनावांनी ओळखले जातात. भाजपमध्ये केशव प्रसाद मौर्य यांचे वर्चस्व वाढण्याचे कारण त्यांची जात होती. भाजपामध्ये बरेच ओबीसी नेते होते पण कुशवाह या मौर्य जातीचा नेता नव्हता. उत्तर प्रदेशात मोठ्या संख्येने असणाऱ्या मौर्य जातीच्या अस्तित्वामुळे, जातीच्या राजकारणासाठी या समुदायाचा फार उपयोग होऊ शकला असता. बसपा आणि सपाच्या राजकारणाचा ब्रेक पण इथूनच लागला होता.

८ एप्रिल २०१६ मध्ये भारतीय जनता पक्षाने मौर्य यांची उत्तर प्रदेश राज्याचा पक्षप्रमुख म्हणून निवड केली.

चहाचा संदर्भ असल्याने की काय माहित नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच मौर्य यांचं समर्थन केलय. तत्कालीन उत्तरप्रदेश निवडणुकीच्या दरम्यान, उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा जिंकण्याच्या विशेष स्थितीत नव्हते आणि अशा परिस्थितीत भाजपाला असा एक नेता हवा होता जो मागासवर्गीय पण असेल आणि ज्याला हिंदुत्वाचा टच असेल. त्या परिस्थितीत भाजपकडे फक्त एकच नाव होत..आणि ते म्हणजे  केशव प्रसाद मौर्य.

मागच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका पाहता भाजपासाठी ते अत्यंत महत्वाच्या भूमिकेत  होते. आणि विशेष म्हणजे त्यांनी ही भूमिका जबाबदारीने पार पाडली. इतकी की, मुख्यमंत्री पदाचे ते प्रबळ दावेदार ठरले होते. पण या रेट्यात योगींनी बाजी मारली आणि मौर्यांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावे लागले.

बर उपमुख्यमंत्री असूनही त्यांना योगिंकडून कायम डावललंच जात. आणि या गोष्टींमुळे योगी आदित्यनाथ आणि केशव प्रसाद मौर्य यांच्यातून विस्तवही आडवा जात नाही. वेळोवेळी तस दिसूनही आलंय.

२०१७ मध्ये सरकार स्थापल्यानंतर केशव प्रसाद मौर्य यांची नेमप्लेट अ‍ॅनेक्सी मुख्यमंत्री कार्यालयातून हटवली गेली. हा वाद वाढताच दोघांचे कार्यालय सचिवालयातील विधानभवनात हलवण्यात आले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वत: केशव यांच्या अखत्यारीत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) च्या कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती. मुख्यमंत्र्यांनी विभागातील अधिकाऱ्यांशी थेट बैठक घेण्यास सुरवात केली.

मुख्यमंत्र्यांनी पीडब्ल्यूडीच्या कामकाजाचा आढावा घेण्यास सुरूवात केली तेव्हा केशव प्रसाद मौर्य मुख्यमंत्री योगी यांच्या अखत्यारीत असलेल्या लखनऊ विकास प्राधिकरणातील भ्रष्टाचाराबद्दल बोलले. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी करण्यास सुरवात केली.

असे ढीग किस्से आहेत दोघांचे मागच्या काही वर्षातले. 

निवडणुकांपूर्वी शेवटच्या क्षणी नेतृत्वात झालेला बदल याच निगेटिव्ह भांडवल होण्याची जास्त शक्यता आहे. यामुळे पक्षालाही हानी पोहचू शकते, म्हणून बाहेरून वाद उद्भवू नये याची काळजी घेण्यासाठीही भाजप प्रयत्न करीत आहे.

त्यामुळं आत्ताच एक वर्ष कार्यकाळ राहिलेलं मुख्यमंत्री पद मिळवण्यापेक्षा केशव प्रसाद मौर्य पुढच्या टर्मचा विचार करून उत्तरप्रदेशच्या राजकारणात आपलं महत्व वाढवत आहेत. योगींच्या सुमार कामगिरीमुळे पुढं येणाऱ्या विधानसभेचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार मौर्य राहतील यात काही शंका नाही.

हे ही वाचा भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.