अदानी, बिर्ला ते हिरानंदानी : योगींनी युपीत 80 हजार कोटींची गुंतवणूक खेचून आणलेय..

तसं देशामध्ये सध्या सगळीकडे धार्मिक मुद्यांनी वातावरण तापवलं जात आहे. मात्र त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त धार्मिक राजकारण कुठे केलं जातं? असं विचारलं तर त्याचं एकच उत्तर अनेकांच्या तोंडी येतं ते म्हणजे…

उत्तर प्रदेश

युपी धार्मिक गोष्टीचं केंद्रबिंदू बनण्यामागे जितका वाटा तिथल्या धार्मिक स्थळांचा आहे त्याहीपेक्षा, धार्मिक-राजकीय मुद्यांचं केंद्र बनण्यामागे त्यांच्या मुख्यमंत्र्यांचा हात आहे, याला कुणी नाकारू शकत नाही. असं होणारही का नाही, मुख्यमंत्र्यांच्या नावातच याचं उत्तर आहे – योगी

धार्मिक गोष्टींमध्ये गुंतलेल्या व्यक्तींचा राजकारण आणि व्यवहाराशी काही संबंध नसतो, या प्रचलित वाक्याला योगी सपशेल खोडून काढतात. 

राजकारणात ते चतुर आहे हे काही नवीन सांगायची गरज नाही. आजवरचा त्यांचा प्रवास काही लपून राहिलेला नाही. धार्मिक मुद्याची कास धरून फक्त उत्तर प्रदेशातील नाही तर देशभरातील राजकारण ढवळून काढण्याची त्यांची खेळी राजकारणावरील पकड दाखवते.

तर युपीचा वाढता आर्थिक आलेख त्यांची व्यवहारावरची पकड दाखवत आहे.

योगींच्या स्ट्रॅटेजीमुळे उत्तर प्रदेश देशातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे. हे सगळं होतंय त्यांनी राज्यात आणलेल्या मोठमोठ्या गुंतवणुकीमुळे.

काल योगींच्या राज्यात उत्तर प्रदेश इन्व्हेस्टर्स समिट २०२२ ची सुरुवात झाली. या समिटमध्ये राजकारणापासून ते उद्योग क्षेत्राच्या देशभरातील मोठमोठ्या लोकांनी हजेरी लावली. 

याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८० हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या १४०६ प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आलं. 

यामध्ये देशातील सगल्यात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानींपासून, मॅथ्यू एरिस, निरंजन हिरानंदानी, कुमार मंगलम बिर्ला अशा सगळ्यांनी नक्की उत्तर प्रदेशमध्ये कोण आणि किती गुंतवणूक करणार आहे? याची आयडिया दिलीये.

सुरुवात करूया गौतम अदानींपासून…

अदानी समूहातील कंपन्या उत्तर प्रदेशात ७०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, असं अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितलंय. त्यांच्या या गुंतवणुकीमुळे राज्यात सुमारे ३०,००० रोजगार निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

मोदींच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या प्रकल्पांत अदानी समूहाच्या २४१६ कोटींच्या प्रकल्पाचा समावेश आहे. गौतम बुद्ध नगरमध्ये हा प्रकल्प सुरु केला जाणार आहे. प्रकल्प २४ जून २०२४ पर्यंत पूर्ण होऊन ११०० जणांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा आहे.

यावेळी “जेव्हा यूपी यशस्वी होईल तेव्हाच देश पुढे जाईल” असं सुद्धा अदानी म्हणाले आहेत.

मग आले कुमार मंगलम बिर्ला

कुमार मंगलम बिर्ला यांचा आदित्य बिर्ला समूह उत्तर प्रदेशात ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. ज्यातून सुमारे ३५ हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, अशी घोषणा करण्यात आली आहे.

“उत्तर प्रदेश हे आज गुंतवणुकीचे सर्वात महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. उत्तर प्रदेशने गुंतवणुकीच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे, निवेश मित्रच्या माध्यमातून सिंगल विंडो सिस्टिम सुरू केल्यामुळे गुंतवणुकीसाठी खूप मदत झाली आहे.” असं यावेळी बिर्ला म्हणालेत.

हिरानंदानी ग्रुप

हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी यांनी आपल्या डेटा सेंटरसह यूपीमध्ये दरवर्षी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. या ऑगस्टपासून हिरानंदानी डेटा सेंटर सुरु करत आहे.

“मी ४० वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात आहे, पण असा बदल मी कधीच पाहिला नाही… उत्तर प्रदेश व्यवसायाच्या बाबतीत बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे जात आहे” असं ते यावेळी म्हणाले.

उद्योग क्षेत्रातील महारथी ज्या ठिकाणी उपस्थित असतात, तिथे गुंतवणूक फक्त देशापुरती असेल, हे जवळजवळ अशक्यच. त्यानुसार योगींच्या या सभेत फ्रान्सच्या उद्योगपतींनी देखील उपस्थिती लावली होती. आणि इव्हेस्ट देखील केलंय. 

फ्रान्सचे उद्योगपती मॅथ्यू एरिस यांची कंपनी आपल्या ऑक्सिजन पुरवठ्याचे पाचवे युनिट यूपीमध्ये स्थापित करीत आहे आणि यासाठी ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहेत.

मॅथ्यू एरिस यांच्या मते, ऑक्सिजन पुरवठ्याचे हे पाचवे युनिट मथुरा इथे उभारण्यात येणार आहे. आणि इथूनच संपूर्ण उत्तर भारताला त्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

यांचं तर बघितलं, पण आता मोठा विषय बघूया… ८० हजार कोटींचं गणित काय आहे ते उलगडूया… 

८० हजार कोटी रुपयांच्या गणितात डेटा सेंटर, कृषी आणि संलग्न क्षेत्र, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स, पायाभूत सुविधा, हातमाग आणि वस्त्रोद्योग, एमएसएमई अशा अनेक क्षेत्रांचा समावेश आहे.

डेटा सेंटरचे ७ प्रोजेक्ट असणार आहे, ज्यासाठी १९ हजार ९२८ कोटी रुपये निर्धारित करण्यात आले आहे.

डेटा सेंटर म्हणजे अशी जागा जिथे डेटा संग्रहित केला जातो. गुगल सर्च इंजिन, यू ट्यूब, फेसबुक अशा सोशल मीडिया नेटवर्कमुळे कोट्यवधी लोकांचा डेटा साठवला जातो. मग ते व्हिडिओ असोत, फोटो असोत, तुमच्या ईमेलशी संबंधित प्रत्येक माहिती  डेटा सेंटरद्वारे हाताळली जात असते. याचेच ७ प्रोजेक्ट युपीमध्ये असणार आहेत. 

एकीकडे केंद्र सरकार सोशल मीडिया कंपन्यांचा ताबा स्वतःकडे घ्यायच्या विचारात आहे, त्यासाठी त्यांनी नियम देखील कडक केले आहेत. अशात दुसरीकडे योगींची डेटा सेंटरमधील गुंतवणूक दाखवून देतेय की योगींनी बरोबर हवेची दिशा ओळखली आहे. 

या व्यतिरिक्त कृषी आणि संबंधित उद्योगांचे २७५ प्रकल्प युपीमध्ये उभारले जाणार आहेत, ज्यासाठी  ११,२९७ कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्सचे २६ प्रकल्प असून  ७,८७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमधील १३ प्रकल्पांसाठी  ६,६३२ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

हातमाग आणि वस्त्रोद्योगाच्या ४६ प्रकल्पांसाठी ५,६४२ कोटी रुपये, अक्षय उर्जेच्या २३ प्रकल्पांसाठी ४,७८२ कोटी रुपये, एमएसएमईच्या ८०५ प्रकल्पांसाठी ४,४५९ कोटी आणि गृहनिर्माणच्या १९ प्रकल्पांसाठी ४,३४४ कोटी, संरक्षणच्या २३ प्रकल्पांसाठी १७७४ कोटी, वखारपालन आणि रसदच्या (वेअर हाऊसिंग आणि लॉजिस्टिक)  २६ प्रकल्पांसाठी १,२९५ कोटी तर शिक्षण क्षेत्राच्या ६ प्रकल्पांसाठी १,१८३ कोटी रुपये गुंतवले जाणार आहेत.

यापाठोपाठ फार्मा अँड मेडिकल सप्लायचे ६५ प्रकल्प आहेत ज्यासाठी १०८८ कोटी रुपये असणार आहेत. पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राच्या २३ प्रकल्पांसाठी ६८० कोटी, डेअरीच्या ७ प्रकल्पांसाठी ४८९ कोटी, पशुपालन व्यवसायाच्या ६ प्रकल्पांसाठी २२४ कोटी ठरवण्यात आले आहेत. 

तर लास्ट बट नॉट लिस्ट चित्रपट आणि मीडिया क्षेत्रातील फक्त एका प्रकल्पासाठी १०० कोटी देण्यात आले आहेत. 

अशाप्रकारे जर नीट निरीक्षण केलं तर कळतं योगींनी बरोबर उगवत्या सूर्याला गाठलं आहे. जे क्षेत्र सध्या बूस्ट होत आहे बरोबर त्या क्षेत्रातील गुंतवणूक योगींनी राज्यात आणली आहे. 

याबद्दल मोदींनी देखील म्हटलं आहे की, २१ व्या शतकात उत्तर प्रदेश भारताच्या विकासाला एक वळण देईल आणि येत्या १० वर्षात हे घडेल. 

कोरोनानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, ते राज्यातच इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करतील की, राज्यातील तरुणांना बाहेर स्थलांतर करण्याची गरज पडणार नाही. त्यानुसार बघता, या गुंवणूकीच्या माध्यमातून भरपूर रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.