युवराज सिंगच्या पप्पांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे?

काही लोक असतात की कायम त्यांचं काही तरी वेगळच टशन चालेलं असत. कधी समाधानी म्हणून नाही. कायम जगावर तलवार उपसून भांडायला तयार. यातच समावेश होतो युवराजच्या पप्पांचा म्हणजेच योगराज सिंग यांचा. काका कोणता नशा करतात माहित नाही पण असतात नेहमी रागाच्या नशेत. विशेषतः धोनी वर त्यांचा खास डाव असतो. पण दोन दिवसापूर्वी त्यांनी स्टेटमेंट दिलं,

“धोनी काफी वक्त से देश की सेवा कर रहे हैं वो एक महान खिलाड़ी हैं और मैं उनका फैन हूं उन्होंने जिस तरह से देश के लिए खेला है जिस तरह से कप्तानी की है और जिस तरह के फैसले टीम के हित में लिए हैं वो काबिले तारीफ है “

सुक्का पलटी मारली युवराजच्या पप्पानी. लोक म्हणाले योगराज सिंग भाजपमध्ये निघाले की काय?

काल परवापर्यंत धोनीचा नंबर एकचा शत्रू म्हणून फेमस राहिलेले योगराज सिंग आता स्वतःला धोनीचा डायहार्ड फॅन म्हणवून घेत आहेत. लांब कशाला वर्ल्डकपवेळी सुद्धा त्यांनी माही वर रोज जोरजोरात बाउन्सर मारले होते. धोनी रिटायरमेंट घेतली पाहिजे वगैरे वगैरे. वर्ल्डकप संपल्यावर सुद्धा ते मोठी पोलखोल करणार होते पण आता त्यांनी वेगळीच पोलखोल केली.

आज जनतेपुढे प्रश्न आहे योगराज सिंगचा प्रॉब्लेम काय आहे?

योगराज सिंग यांचा जन्म चंडीगडचा. पंजाबी फमिली. त्यांचे वडील सत्तर वर्षाचे असताना त्यांना हा मुलगा झाला. म्हणजे जरा जास्तच लाडात वाढला असणार. योगराज सिंगचे वडील सरदार भागसिंग हे ब्रिटीशकाळचे मोठे शिकारी म्हणून फेमस होते. जिम कोर्बेट त्यांचा मित्र होता. योगराज पाच वर्षाचा असताना त्यांनी त्याच्या डोळ्यादेखत वाघाची शिकार केली होती आणि त्याच रक्त टिळा म्हणून योगराजच्या माथ्यावर लावलं होत.

असं हे वाघाचं रक्त कपाळावर लावणार सळसळत घराण. यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा असणार?

तर योगराजला क्रिकेटचं खुळ लहानपणीचं डोक्यात शिरलं होतं. घरच्यांचा विरोध असण्याच काही कारण नव्हत. घरची परिस्थिती उत्तम होती. पोरांनी काहीही केलं तरी आईवडिलांचा फुल सपोर्ट. योगराजला पुढ जाऊन फास्टर बॉलर व्हायचं होतं. तेव्हा त्याच्या शाळेत अजून एक मुलगा होता जो सेम हेच स्वप्न बघत होता. त्याच नाव कपिलदेव निखंज.

दोघांच्यात चांगली दोस्ती झाली. कोच देशप्रेम आझाद यांच्या कडे दोघे एकत्र प्रक्टीस करायचे. एकत्रच फिरायचे. सगळे कपिलला योगराजचा छोटा भाऊ समजायचे एवढे हे दोघे जिगरी झाले. दोघेही हरयाणाच्या रणजी टीममध्ये सिलेक्ट झाले. पुढे जाऊन कपिलला भारताच्या टीमकडून खेळायची संधी मिळाली. त्यामानाने योगराजना ही संधी थोडी लेट म्हणजे १९८१ साली मिळाली.

भारताचा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड दौरा होता. कपिल तो पर्यंत भारताचा मेन फास्टर बॉलर झाला होता. जगात त्याच नाव गाजत होतं. योगराजला कपिलच्या साथीला बोलावलं होतं. पण योगराजचं म्हणण आहे की कपिलला ही गोष्ट आवडली नव्हती.

त्यांचं मत आहे की कपिल पहिल्या दिवसापासून वेगळा वागत होता. त्याला योगराजचं टॅलेंट ठाऊक होतं. पुढे जाऊन हा आपल्याला कोम्पिटीशन ठरू शकेल म्हणून त्यांनी योगराजला कुजवल. त्यांना न्युझीलंडमध्ये एकच कसोटी खेळण्याची संधी मिळाली. योगराज सिंग सांगतात,

” त्या सिरीजमध्ये नेमक काय घडलं मलाही कळाल नाही. मला जखमी असून १०-१० ओव्हर टाकायला लावण्यात आलं. मला कपिलने काहीही मदत केली नाही. त्याला वाटायचं की मी सुनील गावस्करच्या गटात गेलोय. पुढे वनडेमध्ये मला ओपनर बॉलर असूनही बॉलिंगचं दिली गेली नाही. “

योगराज सिंगनी आपल्या वडिलासाठी न्युझीलंडमधून एक सूट आणि एक दुर्बीण विकत घेतली होती. त्यांना वाटत होत की जेव्हा भारतामध्ये खेळू तेव्हा वडील हा सूट घालून येतील आणि या दुर्बीणमधून ती मॅच बघतील. पण ती वेळ आलीच नाही. 

योगराजला परत कधीच भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही. काही दिवसांनी त्यांना रणजी टीममधूनही बाहेर काढण्यात आलं. योगराज सिंगच्या वडिलांसाठी हा धक्का होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. योगराज सिंग त्या दिवशी खूप रडला. त्याने आपल्या सगळ्या बॅट जाळून टाकल्या त्याबद्दल आपल्या क्रिकेटच्या भविष्याची सगळी स्वप्ने जाळून टाकली आणि निश्चय केला,

“मै मेरे बेटे को कपिलसे भी बडा चॅम्पीयन बनाउंगा!”

युवराजला लहानपणी टेनिसपटू व्हयाच होत. योगराजने त्याची रकेट मोडून टाकली. त्याला स्पष्ट बजावलं, क्रिकेट सोडून तुला काहीही करायचं नाही आहे. त्यांनी पाच वर्षाच्या युवराज साठी आपल्या घरच्या अंगणात नेट बांधून दिली व त्याला स्वतः फास्ट बॉलिंग टाकायचे. युवराजची आई आपल्या पोराचे हाल बघून रडायची, त्याची आजी योगराजला शिव्या घालायची,

“तू मेरे पोते की जान ले लेगा”

योगराजसिंगने कोणाच ऐकलं नाही. तो झपाटला होता. युवराज साठी रोज एक बॅट विकत आणली जायची. दहा बारा वर्षाच्या युवी कडे जवळपास २०० बॅट घरात पडलेल्या होत्या. मोठ्या अठरा वीस वर्षाच्या मुलांना जी मेहनत मैदानात आणि  जिममध्ये करावी लागते ती युवराजलाही करावी लागायची. युवराज म्हणतो,

” माझ्या आयुष्यातला सगळ्यात खराब काळ होता तो. माझे वडील मला ड्रगन वाटायचे, रोज माझ्यावर आग ओकणारे ड्रगन!! माझे बाकीचे मित्र जेव्हा शाळेत अभ्यास करत होते, सिनेमा बघत होते, मज्जा करत होते तेव्हा मी ग्राउंडवर वडिलांचा मार खात होतो.”

पण रडत खडत का असेना युवराजने क्रिकेटमध्ये गती पकडली. सोळाव्या वर्षीच देशाचा फ्युचर म्हणून त्याला ओळखलं जाऊ लागलं. अंडर नाईनटीन वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या टीमचा मन ऑफ दी सिरीज होता. अठराव्या वर्षी भारताच्या टीमकडून तो खेळत होता.

योगराजची सगळी स्वप्ने त्याने पूर्ण केली. सहा बॉलमध्ये सहा सिक्स मारण्याचा विक्रम केला. आपली बॅटीग, बॉलिंग, फिल्डिंगने देशाचा लाडका खेळाडू बनला. कॅन्सर असताना त्याने देशाला वर्ल्ड कप जिंकून दिला. त्याच्या सारखा लढवय्या प्लेअर कधी पाहिलाचं नाही.

युवराज एव्हढे मोठे अचिव्हमेंट करत असताना योगराज सिंग त्याच्या पासून वेगळे झालेले होते. त्यांनी त्याच्या बालमनावर काढलेले ओरखडे युवी विसरू शकत नव्हता. योगराज सिंग आणि युवीच्या आईचा डिव्होर्स देखील झाला होता. योगराज आपल्या दुसऱ्या पत्नी सोबत रहात होते. पंजाबी सिनेमामध्ये त्यांनी मोठ नाव कमावलं होतं. फरहान अख्तरच्या भाग मिल्खा भाग मध्येही त्यांनी काम केलंय. त्यांच प्रोफेशनल करीयरसुद्धा चांगलं चालेल पण त्यांच्यातला तो कडवटपणा कधी गेला नाही.

 युवराजवरच त्यांच प्रेम देखील कधी कमी झालं नव्हत.

त्यांनी त्याच्यावर छोटा जरी अन्याय झाला तर त्याच्याविरुद्ध जोरदार हल्लाबोल करायला सुरवात केली. आपल्याशी जे घडलं ते युवी बरोबर होऊ नये म्हणून ते संरक्षक भिंत बनून राहिले.पण या नादात त्यांनी केलेली अनेक वक्तव्ये युवराजला सुद्धा लाजून मान खाली घालयला लावणारी होती. त्यांना राहून राहून वाटत होते की युवी टीम मधून बाहेर गेला यामागे धोनीचं राजकारण आहे. त्यांनी त्याला घटीया इन्सान अशी उपमा देखील दिली होती. त्याच्या घरच्यांना शिव्या घातल्या होत्या.

काही दिवसापूर्वीच युवराजने रिटायरमेंट घेतली. त्यानिमित्ताने त्याने आपलं आणि क्रिकेटचं लव्ह हेटचं २० वर्षाच रिलेशनसुद्धा संपलं असं जाहीर केलं. आपल्या वडिलानासुद्धा माफ केलं. कोणाबद्दल कोणताच कडवटपणा उरला नाही असं युवी म्हणतो. नुकताच दोघांचा एक व्हिडीओ देखील आला आहे ज्यात दोघे त्यांच्या लहानपणीची घरी जातात, जुन्या आठवणीत रमतात.

वीस वर्षांनी बाप लेक एकत्र आले खुल्या मनाने मित्रत्वाच्या नात्याने गप्पा मारत होते. याचाच परिणाम योगराजसिंग यांच्यावर देखील झाला असावा. त्यांनी देखील आपला कायमचा अँग्री अॅटीट्युडला रिटायर केले आणि खिलाडू वृत्ती दाखवत धोनीला शुभेच्छा दिल्या. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.