अंदमान निकोबारवरील सेंटीनेली लोकांना एकटं सोडणं गरजेचं आहे का..?

अमेरिकन मिशनरी जॉन अॅलन चाउ यांची अंदमान निकोबार बेटावरील सेंटीनेली प्रजातीच्या आदिम संस्कृतीतील लोकांनी बाण मारून हत्या केल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर प्रथमच या द्वीपसमुहावरील अतिशय प्राचीन अशा सेंटीनेली प्रजातीविषयीची चर्चा सुरु झालीये.

यानिमित्ताने जाणून घेऊयात हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, सेंटीनेली प्रजातीचे आदिम लोक नेमके कोण आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी त्यांना एकटं सोडणं का आवश्यक आहे..?

सेंटीनेली प्रजाती.

अंदमान निकोबार बेटसमूहाच्या नॉर्थ सेंटीनल बेटावर या प्रजातीतील लोक आढळतात. भारत सरकारने ही प्रजाती संरक्षित म्हणून घोषित केलेली असून नॉर्थ सेंटीनल बेट देखील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. या लोकांचा बाह्य जगाशी कसलाही संबंध नाही.

कुणीही या बेटावर जाऊ शकत नाही किंवा त्यांच्याशी कसलाही संपर्क प्रस्थापित करू शकत नाही.

मानववंशशास्त्र अभ्यासकांच्या मते साधारणतः ५० हजार वर्षांपूर्वी हे लोक आफ्रिकेतून अंदमान निकोबार बेटांवर स्थलांतरित झालेले असावेत. पण असं असलं तरी त्यांच्याविषयीची कुठलीच खात्रीशीर माहिती मात्र सांगता येत नाही.

आज घडीला सेंटीनेली बेटांवर, साधारणतः ५० ते १५० लोकांचा रहिवास असण्याची शक्यता वर्तविण्यात येतेय.

indian coast guard/survival international

२००४ सालच्या भयंकर त्सुनामीच्या काळात देखील हे लोक सुरक्षित राहिले. भारतीय कोस्ट गार्डचं हेलिकॉप्टर ज्यावेळी सेंटीनल बेटावरून जात होतं, त्यावेळी या लोकांनी या हेलिकॉप्टरवर बाणांनी हल्ला केला होता. त्यांचा सध्या उपलब्ध असलेला जो फोटो आहे, तो भारतीय कोस्ट गार्ड आणि सर्व्हायवल इंटरनॅशनल या संस्थेने २८ डिसेंबर २००४ रोजी घेतला होता, अशी माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने दिलीये.

जॉन अॅलन चाउ बेटावर का गेले होते, पुढे काय झालं..?

अमेरिकन नागरिक असलेले मिशनरी जॉन अॅलन चाउ हे ख्रिश्चन धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी सेंटीनल बेटावर गेले होते. या बेटावरील कुठल्याही नागरिकाच्या प्रवेशास बंदी असताना देखील त्यांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बेटावर प्रवेश मिळवला होता.

जॉन यांच्या हत्येप्रकरणी काही मच्छीमारांना ताब्यात घेण्यात आलं असलं, तरी बेटावरील जॉन यांच्या ‘त्या’ मित्रांना सोडून देण्यात यावं, असं आवाहन जॉन यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलंय.

हत्येच्या आदल्या दिवशी देखील त्यांनी या बेटावर जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी देखील त्यांच्यावर बाणाने हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांच्याकडील बायबलचे २ तुकडे झाले होते.

अशा वेळी बेटावर जाण्याच्या दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळी देखील आपल्यावर पुन्हा हल्ला होऊ शकतो आणि त्यात आपला जीव देखील जाऊ शकतो, याची जॉन यांना कल्पना होतीच. बेटावर परत जाण्यापूर्वी जॉन यांनी मच्छीमारांना जी डायरी दिली होती त्यामध्ये अशाप्रकारच्या अनेक बाबींबद्दल जॉन यांनी लिहून ठेवलंय.

आपल्या कुटुंबियांसाठी लिहिलेल्या पत्रावरून तर त्यांना आपण मारले जाऊ याची पूर्ण कल्पना होती हे स्पष्टच होतं. माझी जर हत्या झाली,

तर कृपा करून देवावर किंवा सेंटीनेली लोकांवर रागावू नकात, असं त्यांनी लिहून ठेवलं होतं.

आदिम संस्कृतीतील सेंटीनेली लोकांना एकटं सोडणं का आवश्यक आहे..?

दिल्ली विद्यापीठाच्या मानववंशशास्त्र विभागाचे प्राध्यापक पी.सी. जोशी हे सेंटीनेली प्रजातीचे दीर्घकाळपासूनचे अभ्यासक राहिलेले आहेत. ते जॉन यांच्या या कृत्याकडे एक ‘मूर्खपणाचं धाडस’ म्हणून बघतात.

सेंटीनल लोकांचा समूह जॉनवर बाणांचा वर्षाव करत असताना देखील त्यांनी या समूहासमोर जाण्याचा निर्णय घेऊन त्यांचा रोष ओढवून घेतला, असं ते सांगतात.

जोशी यांनी ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितल्याप्रमाणे सेंटीनेली हे भारताचे फार मौल्यवान नागरिक आहेत. आपण त्यांच्या जीविताच्या हक्काचा, त्यांच्या स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या जीवनशैलीचा देखील आदर केला पाहिजे.

माणूस ज्यावेळी त्यांच्याकडे जातो, त्यावेळी सोबत असंख्य जीव-जंतू घेऊन जातो. या जंतूमुळे त्यांना संपर्कजन्य रोग होऊ शकतात आणि साध्या तापामुळे देखील त्यांच्यावर मृत्यू ओढावला जाऊ शकतो. कारण या जंतूचा प्रतिरोध करण्यासाठीची प्रतिकार शक्तीच त्यांच्यात विकसित झालेली नाही.

अन्विता अब्बी यांनी अंदमान निकोबार बेटावरील भाषांचा अभ्यास करण्यासाठी त्याभागात साधारणतः दशकभराचा वेळ खर्ची केलाय. त्या सांगतात की,

“सध्या तिथे नेमके किती लोक राहतात, याविषयी कुणालाच काहीच माहित नाहीये. त्यांच्याविषयीची जी काही माहिती उपलब्ध आहे, ती केवळ दूरवरून किनाऱ्यावर बसून त्याचं निरीक्षण करून मिळविण्यात आलीये.”

हे लोक नेमकी कुठली भाषा बोलतात, ती कधीपासून अस्तित्वात आहे, याविषयी देखील खात्रीशीररीत्या काही सांगता येत नाही. कारण कुणीच त्यांच्याशी कसलाच संपर्क करू शकत नाही. पण अर्थात त्यांच्या संरक्षणासाठी ते तसंच असणं आवश्यक आहे, हे देखील सांगायला त्या विसरत नाहीत.

पी.सी. जोशी आणि अन्विता अब्बी यांच्या व्यतिरिक्त इतरही अनेक अभ्यासकांनी सेंटीनल लोकांना एकटं राहू देण्याविषयीचंच मत व्यक्त केलंय. त्यांच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी तेच हितकारक आहे.

भारत सरकारची देखील तशीच भूमिका राहिलेली आहे.

त्यामुळेच गेल्या वर्षीपासून सरकारने त्यांचे फोटो आणि व्हिडीओ घेण्यास देखील बंदी घातलीये. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यास शिक्षेची तरतूद करण्यात आलीये.

केवळ काही अपवादात्मक परिस्थितीत मानववंश शास्त्राज्ञांनाच सरकारच्या परवानगीने अभ्यासासाठी म्हणून या बेटावर जाणे शक्य आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.