गांधीजींचा अपमान करणाऱ्या तरुण मुरारी बापू यानं आता माफी मागितलीये

गेल्या काही दिवसांपासून धर्म संसदेचा मुद्दा चर्चेत आहे. या संसदे दरम्यान इस्लाम धर्माविरुद्ध आणि महात्मा गांधी यांच्याविरुद्ध भडकाऊ भाषणं देण्यात आली. ज्यामुळे देशभरात एकचं खळबळ उडाली. या प्रकरणी अनेक कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांवर आणि साधूंवर तक्रार दाखल करण्यात आलेली.

महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी तर कालिचरण महाराज यांना अटक सुद्धा करण्यात आली होती. महात्मा गांधींची हत्या केली म्ह्णून त्यांनी नथुराम गोडसेचे आभार मानले होते. दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांच्या मागणीमुळे काही वेळातचं कालिचरण यांची सुटका करण्यात आली.

कालिचरण महाराजांच्या अटकेवर भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, जे धर्मगुरू त्यांच्या मनातल्या गोष्ट बोलतात त्यांच्याशी जरा नरमाईने वागले पाहिजे. एवढंच नाही तर यानंतर राहुल गांधी यांनी स्वत: जाऊन त्यांना पाठिंबा दिला. कम्युनिस्ट आणि आप यांनीही उघड पाठिंबा दिला.

आता हा वाद इतक्या लवकर शांत होणार नव्हता, कालिचरण यांचा मुद्दा बातम्यांमाहून बाहेर होत नाही तर आणखी एका साधूनं महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले होते. मध्य प्रदेशातील नरसिंहपूरमध्ये सोमवारी भागवत कथा वाचक तरुण मुरारी बापू यांनी महात्मा गांधींना देशद्रोही म्हटले. ज्यामुळे वातावरण आणखीनचं चिघळले. 

नरसिंहपूर येथील छिंदवाडा रोडवरील वीरा लॉनच्या भागवत पंडालदरम्यान भागवत कथा सांगताना तरुण मुरारी बापू म्हणाले होते की, “ज्या व्यक्तीने देशाचे तुकडे केले, तो राष्ट्रपिता कसा असू शकतो. तो देशद्रोही आहे, महात्मा गांधी ना महात्मा होऊ शकत ना राष्ट्रपिताही. ” यानंतर नरसिंगपूर पोलिसांनीही त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.”

या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी तरुण मुरारी बापूविरोधात काँग्रेसने एफआयआर दाखल केली आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी लावून धारली. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने गंज पोलिस स्टेशनमध्ये कलम १५३, ५०४, ५०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी तरुण मुरारी बापूंना त्यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, ते त्यांच्या म्हणण्यावर ठाम आहेत.

 दरम्यान, या तक्रारीनंतर  भागवत कथेदरम्यान महात्मा गांधींचा अपमान करणारे मुरारी बापू यांनी  वादग्रस्त भाषणाबद्दल माफी मागितली. एक नवीन व्हिडिओ जारी करताना, त्यांनी म्हंटले  की,

“एका पत्रकाराने भावनेच्या भरात मला असे काही बोलायला भाग पाडले, जे मी बोलायला नको होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संपूर्ण देशाला माहिती आहे. त्यांचा अपमान करणं किंवा तसं  काही बोलण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागतो.”

आता तरुण मुरारी बापू यांनी माफी मागितली खरी, पण आता त्यांच्यावर दाखल झालेल्या एफआयआरमुळे पुढे त्यांना कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय आणि अजून कोणते साधू या वादात उडी घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

हे ही  वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.